Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 August 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० ऑगस्ट २०२१ दुपारी १.०० वा.
****
गुजरातमधल्या
सोमनाथ मंदिर इथं ८३ कोटी रुपये खर्चांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली.
एक किलोमीटर लांबीचा समुद्रदर्शन पथ, नूतनीकरण करण्यात आलेलं अहिल्याबाई होळकर मंदिर
आणि नव्यानं बांधण्यात आलेल्या संग्रहालयाचा या प्रकल्पांमध्ये समावेश आहे. या प्रकल्पांमुळे
भारताच्या धार्मिक अस्मितेला नवी उंची देण्याचं सरदार पटेल यांचं स्वप्न पुढे नेलं
जात असल्याचं, पंतप्रधान यावेळी म्हणाले. सोमनाथ प्रदर्शन केंद्र तरुणांना समृद्ध सांस्कृतिक
वारसा समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी जोडण्यासाठी प्रोत्साहित करेल, या विविध प्रकल्पांमुळे
धार्मिक जागांशी पर्यटन जोडलं जाईल, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.
****
केंद्र
सरकारने गरीब, महिला आणि मुलांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरु केल्या असल्याचं,
केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी म्हणलं आहे. ते आज
मुंबईत जनआशिर्वाद यात्रेदरम्यान वार्ताहर परिषदेत बोलत होते. या यात्रेदरम्यान सरकारच्या
विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार असल्याचं राणे म्हणाले.
****
जम्मू
काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात ख्रिउ क्षेत्रात आज पहाटे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी
मारला गेला. लष्कर, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी राबवलेल्या
शोधमोहिमेदरम्यान ही चकमक झाली.
****
माजी
पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची आज जयंती. हा दिवस देशभरात “सद्भावना दिवस” म्हणून
साजरा केला जातो. याअनुषंगानं आजपासून ते ५ सप्टेंबर या कालावधीत “सामाजिक ऐक्य पंधरवडा”
साजरा केला जाणार आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राजीव
गांधी यांना आदरांजली अर्पण केली आहे.
****
बँकिंग
क्षेत्रात होत असलेल्या तांत्रिक सुधारणा, ग्राहकांच्या तक्रारी तसंच बँकांचे अभिप्राय
लक्षात घेत, भारतीय रिझर्व्ह बँकेनं लॉकर सुविधेबाबत नवे दिशानिर्देश जारी केले आहेत.
या संदर्भातली अधिसूचना काल मुंबईत प्रसिद्ध करण्यात आली. नवे नियम एक जानेवारी २०२२
पासून नव्या तसंच आता अस्तित्वात असलेल्या दोन्ही लॉकरना लागू होतील. नव्या निर्देशानुसार
बँकांना आपल्याकडच्या रिकाम्या लॉकरची शाखानिहाय यादी तयार करावी लागेल, तसंच भारतीय
बँकिंग असोसिएशनने तयार केलेल्या आदर्श लॉकर नीतिचा स्विकार करावा लागेल. आदर्श लॉकर
नीतीनुसार अवैध आणि धोकादायक वस्तू लॉकरमध्ये ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.
****
संरक्षण
संशोधन आणि विकास संस्थेनं, वायू दलाच्या लढाऊ विमानांचं शत्रूच्या रडारमध्ये पकडल्या
जाण्यापासून संरक्षण करण्यासाठी, आधुनिक ‘शाफ’ तंत्रज्ञान विकसित केलं आहे. संस्थेअंतर्गत
जोधपूर इथली संरक्षण प्रयोगशाळा आणि पुण्यातल्या उच्च उर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा
या संस्थांनी एकमेकांच्या सहकार्यानं हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. या महत्वाच्या
स्वदेशी तंत्रज्ञानाचं संशोधन केल्याबद्दल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी
या संस्थांचं अभिनंदन केलं आहे.
****
सर्वोच्च
न्यायालयानं आपलं म्हणणं ऐकून घेतल्यावर आपण सक्तवसुली संचालनालयाला चौकशीसाठी सहकार्य
करु, असं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. सक्तवसुली संचालनालयानं
देशमुख यांना काल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं होतं, त्यावेळी ते हजर
राहिले नाहीत. आतापर्यंत संचालनालयानं त्यांना पाच वेळा समन्स बजावलं आहे. सक्तवसुली
संचालनालयानं कठोर कारवाई करु नये याकरता देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली
होती. सर्वोच्च न्यायालयानं त्यांना उच्च न्यायालयात अर्ज करायला सांगितला असून, त्यांच्या
याचिकेवर सुनावणी अजून प्रलंबित आहे. असं असताना ईडीनं जबरदस्तीनं समन्स बजावल्याचं
देशमुख यांचं म्हणणं आहे.
****
दरम्यान,
देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या
न्यायमूर्ती चांदीवाल आयोगानं माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना २५ हजार रुपयांचा
दंड ठोठावला आहे. या आयोगानं सिंग यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं, मात्र
ते हजर न राहील्यानं हा दंड आकारण्यात आला.
****
धुळे
जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे
धरणाचे १४ दरवाजे उघडून त्यातून, ४० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी तापी नदीपात्रात
सोडण्यात येत आहे.
****
मराठा
साहित्य परिषदेच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या विविध ग्रंथ पुरस्करांचं उद्या वितरण होणार
आहे. औरंगाबाद इथं साहित्य परिषदेच्या डॉ. ना गो नांदापूरकर सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात
ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
No comments:
Post a Comment