Friday, 3 September 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.09.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 September 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      मराठा आरक्षणप्रश्नी हस्तक्षेप करुन समाजाला न्याय देण्याची राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे मागणी

·      राज्यातल्या शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोविड कृती दलाशी चर्चा करुन घेणार

·      मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या राज्य सरकारच्या सूचना

·      राज्यात चार हजार ३४२ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात पाच जणांचा मृत्यू तर १७० बाधि

·      जालन्यात रेशीम बाजारात रेशीम कोषाला ५१ हजार रुपये प्रति क्विंटलचा विक्रमी दर

आणि

·       चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवस अखेर इंग्लंडच्या पहिल्या डावात तीन बाद ५३ धावा

****

मराठा आरक्षणप्रश्नी हस्तक्षेप करुन समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी काल राष्ट्रपतींची भेट घेऊन, मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. भारतीय जनता पक्षाकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर, शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार वंदना चव्हाण आणि काँग्रेसकडून आमदार संग्राम थोपटे यावेळी उपस्थित होते. एकशे पाचव्या घटना दुरुस्तीनं राज्यांना ५० टक्क्यांच्यावर आरक्षण नेण्याचे अधिकार दिलेले असले तरी आपण पुढे जाऊ शकत नसल्यानं आपण या संदर्भात राष्ट्रपतींना विनंती केल्याचं, खासदार संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. राष्ट्रपतींनी आपल्या सूचना सविस्तरपणे ऐकून घेतल्या. अभ्यासासाठी थोडा वेळ द्यावा, त्यानंतर पुढची दिशा काय असेल ते आपल्याला कळवतो, असं आश्वासन राष्ट्रपतींनी या शिष्टमंडळाला दिलं आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर राज्यातल्या शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोविड कृती दलाशी चर्चा करुन घेणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते काल मुंबईत माध्यम प्रतिनिधींश बोलत होते. राज्यातल्या सर्व शाळांमधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीच्या दोन मात्रा पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं पवार यांनी सांगितलं. गर्दी होणारे उत्सव घरगुती पध्दतीनं साजरे करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या सर्वाधिक रुग्ण केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रात आढळत असल्यानं, केंद्रीय आरोग्य विभागानं राज्याला काही सूचना केल्या असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचंही, उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलं. मराठवाडयात झालेल्या अतिवृष्टीनं पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं, जमिनी खरडून निघाल्या तर, काही भागात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी योग्य त्या सूचना दिल्या असून, प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्यात नुकसानाची पाहणी करत असल्याचं पवार यांनी नमूद केलं.

****

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, पूल आणि रस्त्यांच्या पुनर्बांधणी कामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत तातडीनं निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश, संबंधितांना दिले असल्याच्ं, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं. जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या काही महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यानं खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानीचे महसुल, कृषी आणि विमा कंपनी असे तिन स्तरावरचे अधिकारी संयुक्तपणे पाहणी करतील, असं मुंडे म्हणाले.

****

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं वेतन आणि इतर आवश्यक बाबींसाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात आदेश दिल्यानंतर हा निधी तातडीनं वितरीत करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी एक हजार चारशे पन्नास कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी, आठशे अडतीस कोटी रुपयांचा निधी राज्य परिवहन महामंडळाला आधीच वितरीत करण्यात आला आहे.

****

राज्यात काल चार हजार ३४२ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६४ लाख ७३ हजार ६७४ झाली आहे. काल ५५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३७ हजार ५५१ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल चार हजार ७५५ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६२ लाख ८१ हजार ९८५ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक शून्य तीन शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ५ हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल १७० नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या तीन, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात ८३ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात ४२, औरंगाबाद २१, लातूर १३, परभणी सात, नांदेड तीन, तर हिंगोली जिल्ह्यात एक नवा रुग्ण आढळला. जालना जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

यंदाच्या गणेशोत्सव काळात राज्य निवडणूक आयोगानं घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचं आयोजन केलं आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ही माहिती दिली. उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचाहा या सजावट स्पर्धेसाठीचा विषय असेल, असं त्यांनी सांगितलं. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळ आणि समाजमाध्यमांवर या स्पर्धेची नियमावली उपलब्ध करून दिली जाणार आहे.

****

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या रेशीम बाजारात काल रेशीम कोषाला ५१ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. चालू हंगामतला हा सर्वात उच्चांकी दर असल्याची माहिती, बाजार समितीचे सचिव रजनिकांत इंगळे यांनी दिली. रेशीम बाजारात काल तीन टन कोष विक्री झाली. हा उच्चांकी दर मिळालेले औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातल्या धामनगाव इथले शेतकरी सोमीनाथ कनसे यांच्यासह, खरेदीदार इम्रान पठाण यांचा बाजार समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला. गत दोन महिन्यात जालना रेशीम बाजारात ११९ टन रेशीम कोषांच्या खरेदी-विक्रीतून, चार कोटी १९ लाख रुपयांची उलाढाल झाली असून, उत्तम दर मिळत असल्यानं राज्यभरातले शेतकरी जालना रेशीम बाजारात कोष विक्रीस प्राधान्य देत असल्याची माहिती, बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी दिली.

****

मराठा समाज आरक्षण मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेनं औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल धरणे आंदोलन केलं. या संदर्भात समाजाच्या संघटनांनी राज्यव्यापी बैठक घेऊन त्यात मांडलेल्या ठरावाच्या निवेदनाची प्रत यावेळी प्रशासनाला सादर करण्यात आली.

****

परभणी इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात शेकडो महिलांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. काल या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. या आंदोलनात शहरासह जिल्ह्यातल्या विविध राजकीय पक्षांच्या महिला पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना आणि संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या नुकसानीपोटी २५ टक्के अग्रीम रक्कम देण्यात यावी अशी शिफारस, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कृषी आयुक्ताकडे केली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर,

समित्यांनी आम्हाला अहवाल दिलेला आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ महसूल मंडळांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान आपल्याला निर्दशनास आलं आहे. आणि सोयाबीन पिकाच्या जोडीलाच मूग, उडीद, बाजरी, तूर, आणि काही ठिकणी कापूस, या पिकांच्या बाबतीमध्ये सुद्धा उत्पादकता ५० टक्यांनी कमी झाल्याचं आम्हाला निर्दशनास आलं आहे. आणि त्या अनुषंगानं आम्ही अग्रीमाबाबत अधिसूचना काढलेली आहे. आणि विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनाही ते अवगत करुन दिलेलं आहे. आणि यापुढची कारवाई बाबत माननीय आयुक्त कृषी यांना अवगत करुन दिलेलं आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी धरणाची काही दारं उघडून पूर्णा नदीच्या पात्रात पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या अभियंत्यांनी जिंतूर, औंढा आणि सेनगाव या तालुक्यातल्या नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या खडकपूर्णा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्यानं, धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्याचबरोबर पाणलोट क्षेत्रातूनही धरणात पाण्याची आवक होत आहे.

****

देशातल्या प्रमुख २० कुलगुरुंच्या यादीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले यांचा समावेश झाला आहे. राज्यातून केवळ त्यांचीच निवड या यादीत झाली असल्याचं विद्यापीठ प्रशासनानं कळवलं आहे. युलेकेज वॉल ऑफ फेमया आंतरराष्ट्रीय संस्थेच्यावतीनं ही यादी घोषित करण्यात आल्याचंही प्रशासनानं म्हटलं आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड ते पालम या राज्य मार्गावर केरवाडी शिवारात महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या पथकानं, स्वस्त धान्य दुकानातून काळ्या बाजारात जाणारा गव्हाचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत सहाशे १९ गव्हाचे कट्टे, असा सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्दे माल आणि ट्रक पोलिसांनी जप्त केला.

****

टोकियो इथं सुरु असलेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत यानं पुरुष एकेरीत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. प्रमोदनं `` गटातल्या दुसऱ्या सामन्यात युक्रेनच्या खेळाडूचा २१-१२, २१-९ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. महिला एकेरीत मात्र भारताच्या पारुल परमार हिचा पराभव झाला.

****

भारत आणि इंग्लंड दरम्यान ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात कालच्या पहिल्या दिवस अखेर इंग्लंडच्या पहिल्या डावात तीन बाद ५३ धावा झाल्या आहेत. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव १९१ धावांवर संपुष्टात आला. शार्दुल ठाकुरनं ५७, विराट कोहलीनं ५० धावा केल्या. भारतीय संघ १३८ धावांनी आघाडीवर आहे.

****

हवामानः

येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. याकाळात विदर्भात तुरळक ठिकाणी विजाचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

****

No comments:

Post a Comment