Tuesday, 21 September 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.09.2021 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 September 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ सप्टेंबर २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      चालू आर्थिक वर्षात देशाची निर्यात क्षमता ४०० बिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्याचं उद्दीष्ट; ‘वाणिज्य उत्सव’ या दोन दिवसीय निर्यात परिषदेत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती.

·      एस टी कर्मचाऱ्यांचं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांत विलीनीकरण करावं- आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी.

·      शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय कोविड कृतीदलाशी चर्चा करून घेतला जाणार - शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून स्पष्ट.

आणि

·      येलदरी तसंच मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू.

****

२०२१-२२ या चालू आर्थिक वर्षात देशाची निर्यात क्षमता ४०० बिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्याचं उद्दीष्ट असून, या राष्ट्रीय निर्यातीत महाराष्ट्राचा वा सध्याचा वीस टक्क्यांवरून वाढायला हवा, असं मत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं आहे. ‘आझादी का अमृत महोत्सवा’चा भाग म्हणून आज मुंबईत ‘वाणिज्य उत्सव’ या दोन दिवसीय निर्यात परिषदेचं आयोजन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आता जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली असून आता देशाला पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनविण्याचं आमचं लक्ष्य आहे. कोविड महामारीच्या काळात देशाला लस, औषधं, ऑक्सिजन सिलिंडरबाबत आत्मनिर्भर बनविण्याचं ध्येय गाठण्यातही देशाला यश आल्याचं रावसाहेब दानवे यांनी यावेळी सांगितलं. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी दानवे यांच्यासह महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित होते. महाराष्ट्राच्या निर्यात क्षमतेचे दर्शन घडवण्याबरोबरच राज्यातून निर्यात वाढवण्याच्या धोरणावर यामध्ये चर्चा होणार आहेत. उपस्थित मान्यवरांनी परिषदेच्या उद्घाटनानंतर निर्यात परिषदेतील प्रदर्शनाला भेट देवून पाहणी केली.

****

राज्य निवडणूक आयोगामार्फत नवमतदारांपर्यंत निवडणूक संदर्भात माहिती पोहोचवण्यासाठी मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि सहभाग ‘स्वीप’ हा जागृतीपर कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितलं. या संदर्भात दृकश्राव्य माध्यमातून सदर कार्यक्रम राबवण्यासंदर्भात चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. नवमतदारांची नोंदणी, नाव वगळणे, नावात बदल अथवा इतर काही बदल करावयाचे असल्यास ते कशा पद्धतीने करायचे यासंदर्भात मतदार जागरूकता मंचांतर्गत जागरूकता करणं, आवश्यक असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी यावेळी सांगितलं.

****

एस टी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांचं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांत विलीनीकरण करण्यात यावं, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ते आज सांगली जिल्ह्यातील झरे इथं एस टी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी मेळाव्या नंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. युनियनच्या नावाखाली एसटीतील कर्मचाऱ्यांची लुबाडणूक केली जात असल्याचंही पडळकर म्हणाले.

****

अहमदनगर इथल्या मराठवाडा मित्रमंडळातर्फे देण्यात येणारा मानाचा ‘स्वामी रामानंद तीर्थ पुरस्कार’ ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर यांना जाहीर करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष डॉ.प्रकाश कांकरिया यांनी ही माहिती दिली. मराठवाड्यात जन्म घेतलेल्या आणि आपल्या कार्याचा ठसा मराठवाड्याबाहेरही उमटवणाऱ्या व्यक्तींना सदर पुरस्कार दिला जातो.

****

शाळा सुरू करण्याबाबतचा कोविड कृतीदलाशी चर्चा करून घेतला जाणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी इथं आज संसदरत्न पुस्तकाचं प्रकाशन पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं, त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला सातव कुटुंबीय उपस्थित होते. जिल्हा नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या नाट्यगृहाला दिवंगत राजीव सातव यांचे नाव देण्यात आलं असून जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज या नामफलकाचं अनावरण करण्यात आलं.

****

परभणी इथं नोंदणी तसंच मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी संघटनांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. पदोन्नती देणे, विभागातील पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लागू न करणं, सर्व रिक्त पदांची भरती, २०१८ पासून प्रलंबित लिपिकांच्या सेवाज्येष्ठता याद्या अंतिम करणं, कोविडमुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत, कुटुंबातील व्यक्तीस अनुकंपा तत्त्वावर नोकरी, दुय्यम निबंधक वर्ग-२ आणि दुय्यम निबंधक श्रेणी-१ या संवर्गाचे एकत्रीकरण, पदनामात बदल इत्यादी विविध २१ मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

****

परभणी जिल्ह्यातील पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयातून आज सकाळी आणखीन दोन दरवाजे अर्धा मीटरनं उचलून पूर्णा नदीच्या पात्रात पाणी सोडले जात आहे. सध्या धरणातून एकूण ११ हजार १३९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचं आवाहन येलदरी धरण, पूर नियंत्रण कक्षानं केलं आहे.

बीड जिल्ह्यातला मांजरा प्रकल्प आज १०० टक्के भरल्यामुळे, धरणाच्या उजव्या कालव्यातून आज दुपारपासून पाणी सोडण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सिल्लोड तहसील कार्यालय समोर निदर्शनं करण्यात आली. शेतमालाला योग्य दर मिळत नसल्यानं टमाटे आणि मिरच्या तहसील कार्यालयासमोर फेकून निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आलं.

****

परभणी जिल्ह्यातील वसमत रस्त्यावरील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची खाजगी विमा कंपनीकडून मदत मिळवून द्यावी तसंच साखर कारखान्यांकडून रास्त आणि किफायतशीर दराने ऊसाची देयकं वितरित करावी यासह अन्य मागण्या या आंदोलनकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे सादर केल्या आहेत.

****

No comments:

Post a Comment