Wednesday, 22 September 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.09.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 September 2021

Time 1.00 to 1.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले. त्यांची ही अमेरिका भेट विशेष महत्त्वपूर्ण आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरीस यांच्याशी पंतप्रधान प्रथमच प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. त्यानंतर क्वाड नेत्यांची पहिली वैयक्तिक बैठक होणार आहे.

या दौर्यामुळे अमेरिकेबरोबर व्यापक धोरणात्मक भागिदारी अधिक मजबूत होईल, तसंच जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांशी संबंध अधिक दृढ होतील, असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिडे सुगा यांच्यासह वैयक्तिकरित्या क्वॉड लीडर समिटमध्ये सहभागी होणार असल्याचं ते म्हणाले. यामुळे सामायिक दृष्टिकोनावर आधारित भविष्यातल्या गुंतवणूकींसाठी प्राधान्यक्रम ओळखण्याची संधी मिळणार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकट आखण्यासाठी राष्ट्रीय सुकाणू समितीची स्थापना केली आहे. भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटनेचे माजी अध्यक्ष डॉक्टर के. कस्तुरीरंगन हे या समितीचे अध्यक्ष असतील.

****

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ८२ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात ६६ लाखाहून अधिक नारीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या ८२ कोटी ६५ लाख १५ हजार ७५४ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या २६ हजार ९६४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३८३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी ३५ लाख ३१ हजार ४९८ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ४५ हजार ७६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ३४ हजार १६७ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी २७ लाख ८३ हजार ७४१ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या तीन लाख एक हजार ९८९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग सुविधेचा विचार करून पुण्यातल्या ए आर ए आय अर्थात भारतीय स्वयंचलित वाहन संशोधन संघटनेच्या वतीनं, स्वदेशी चार्जर तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे. संघटनेचे संचालक डॉक्टर रेजी मथाई यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या उपक्रमांमध्ये सहभागी होत, हे लाईट ईव्ही एसी चार्ज पॉईंट तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं असून, याद्वारे भारतीय कंपन्यांना आता या स्वदेशी चार्जरचं उत्पादन करणं शक्य होणार आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्याचा संपूर्ण वॉटर ग्रीडचा प्रस्ताव जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तयार करुन तो मंजुरीसाठी पाठवण्याचे निर्देश राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी संबंधित अधिकार्यांना दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. गंगापूर खुलताबाद मतदारसंघातल्या जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियानाचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

****

नंदुरबार जिल्ह्यात डिजीटल इंडीया अभियानाअंतर्गत बँकांनी डिजीटायझेशनचं ९८ टक्के उदिष्ट साध्य केलं आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये राज्यातून या मोहीमेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्याची निवड करण्यात आली होती. बँकांच्या कमी असलेल्या शाखा आणि त्यातच दुर्गम अतिदुर्गम भागत इंटरनेट सेवेची कमतरता, असे असूनही नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्याची वाटचाल डिजीटायझेशनकडे होत आहे.

****

नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज सकाळपासून पाऊस सुरु आहे. मालेगाव, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, दिंडोरी, पेठ सर्वत्र जोरदार पाऊस पडत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

गंगापूर धरण ९९ टक्के भरलं असून, धरणातून सहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं केलं आहे.

बीड जिल्ह्यातलं मांजरा धरण शंभर टक्के भरलं असून, आज सकाळी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून, १४९ पूर्णांक ८० घनमीटर प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता शाहुराज पाटील यांनी दिली.

****

नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. हिमायतनगर, मुखेड, अर्धापूर, कंधार, लोहा, मुदखेड, ऊमरी, नायगाव या भागात सरासरी दहा मिलीमीटर ते २९ मिलीमीटर पाऊस झाला. या पावसामुळे मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचं नुकसान होत आहे.

****

२०२१ साठीची प्राध्यापक पात्रता चाचणी परीक्षा - सेट येत्या रविवारी नांदेड जिल्ह्यात १८ परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. या परीक्षा केंद्रांच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होऊ नये आणि परीक्षा स्वच्छ सुसंगत पार पाडण्याच्या दृष्टीने या परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी जारी केले आहेत.

****

No comments:

Post a Comment