Wednesday, 22 September 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.09.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 September 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्यात महिलांच्या सुरक्षाबाबत कायदेशीर उपाययोजना करण्याच्या पोलिसांना सक्त सूचना देण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्राद्वारे कळवलं. दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याची सूचना नाकारली

·      राष्ट्रीय निर्यातीत राज्याचा वाटा सध्याच्या वीस टक्क्यांवरून वाढायला हवा- रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

·      शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय कोविड कृतीदलाशी चर्चा करून घेणार - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

·      जालना जिल्ह्यात पाथरवाला इथं उभारण्यात येणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या केंद्रासाठी ७१ कोटी रूपयांचा निधी

·      शिर्डीच्या साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या नवनियुक्त समितीला धोरणात्मक निर्णय घेण्यास औरंगाबाद खंडपीठाची मनाई

आणि

·      मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे अनेक प्रकल्पांमधल्या पाणीसाठ्यात वाढ

****

राज्यात महिलांची सर्वतोपरी सुरक्षा असावी, यासाठी कायदेशीर उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना पोलिसांना देण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत साकीनाका परिसरात महिलेवरील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, सरकारनं दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याचं मत मांडणारे पत्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं. या पत्राच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी, महिलेवर झालेला या अत्याचाराबाबत पोलिसांनी तातडीनं कारवाई केली असल्याचं म्हटलं आहे. संबंधित खटला जलदगतीनं चालवून आरोपींना कठोर शासन केलं जाईल, सरकार सरकारचं काम करत आहे त्यामुळे विधीमंडळाचं खास अधिवेशन बोलावून चर्चा घडवल्यानं नवा वाद निर्माण होऊ शकतो, असंही त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे. महिला अत्याचाराचा प्रश्न राष्ट्रव्यापी प्रश्न असून, अशा अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी संसदेचं चार दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी पंतप्रधानांकडे करावी, असंही मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****

२०२१-२२ या चालू आर्थिक वर्षात देशाची निर्यात क्षमता ४०० बिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्याचं उद्दीष्ट असून, या राष्ट्रीय निर्यातीत राज्याचा वाटा सध्याच्या वीस टक्क्यांवरून वाढायला हवा, असं मत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं आहे. आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून काल मुंबईत, 'वाणिज्य उत्सव' या दोन दिवसीय निर्यात परिषदेला प्रारंभ झाला, त्यावेळी दानवे बोलत होते. कोविड महामारीच्या काळात देशाला लस, औषधं, ऑक्सिजन सिलिंडरबाबत आत्मनिर्भर बनवण्याचं ध्येय गाठण्यातही देशाला यश आल्याचं, दानवे यांनी यावेळी सांगितलं.

****

शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय कोविड कृतीदलाशी चर्चा करून घेतला जाणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं काल संसदरत्न पुस्तकाचं प्रकाशन गायकवाड यांच्या उपस्थितीत झालं, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या..

आम्ही दोनदा पेड्रोयटीक लोकांशी चर्चा केली, एनजीओंशी चर्चा केली, शिक्षण तज्ञांशी चर्चा केली, आणि त्याच्यानंतर त्यांच्या काही एसओपीज आलेल्या आहेत आमच्याकडे. आमची एसओपीज होती अजून त्यांच्याकडून काही सूचना आलेल्या आहेत. त्या सूचनांचं हे करुन माननीय मुख्यमंत्र्याकडे ती फाईल पुट अप केली. त्यांनी म्हटलेलं आहे की याच्यावर पुन्हा एकदा जे पेड्रोयटीक टास्क फोर्सचं ओपेनियन घ्यावं त्याच्यानंतर याच्याबद्दल निर्णय घ्यावा. पंधरा दिवसात माहिती पडेल की नेमकी परिस्थिती काय आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं तिसऱ्या लाटेबद्दल परिस्थिती पाहूनच या गोष्टीचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून घेतला जाईल

दरम्यान, या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला सातव कुटुंबीय उपस्थित होते. जिल्हा नगर परिषदेच्या वतीनं बांधण्यात आलेल्या नाट्यगृहाला दिवंगत राजीव सातव यांचं नाव देण्यात आलं असून, पालकमंत्री गायकवाड यांच्या हस्ते काल या नामफलकाचं अनावरण करण्यात आलं.

****

अहमदनगर इथल्या मराठवाडा मित्रमंडळातर्फे देण्यात येणारा मानाचा स्वामी रामानंद तीर्थ पुरस्कार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर यांना जाहीर करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष डॉ.प्रकाश कांकरिया यांनी ही माहिती दिली. मराठवाडयात जन्म घेतलेल्या आणि आपल्या कार्याचा ठसा मराठवाडयाबाहेरही उमटवणाऱ्या व्यक्तींना सदर पुरस्कार दिला जातो.

****

भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल व्ही आर चौधरी यांची हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सध्याचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदौरिया येत्या ३० तारखेला सेवा निवृत्त होत आहेत. चौधरी हे मूळचे नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातल्या हस्तरा या गावचे आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८१ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

 जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या पाथरवाला इथं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीनं नवीन केंद्र उभारण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात मांजरी इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पाथरवाला इथं ७१ कोटी १६ लाख रुपये खर्च करुन प्रशासकीय इमारत, प्रयोगशाळा, प्रशिक्षण केंद्र आदी पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत.

****

राज्यात काल तीन हजार, १३१  नवे कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख, २७ हजार, ६२९ झाली आहे. काल ७० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३८ हजार ६१६ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल चार हजार २१ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६३ लाख ४४ हजार ७४४ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक २० शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ४० हजार, ७१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल १२२ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या तीन, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल ४१ नवे रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात ३९, औरंगाबाद एकोणीस, लातूर ११, परभणी सहा, जालना पाच, तर नांदेड जिल्ह्यात एक रुग्ण आढळला. हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.

****

शिर्डीच्या साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था मंडळाच्या नवनियुक्त समितीला धोरणात्मक निर्णय घेण्यास आणि कामकाज करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं मनाई केली आहे. समितीच्या निवड प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. उच्च न्यायालयाची पूर्व परवानगी न घेता नवीन विश्वस्त मंडळानं कारभार सुरु केल्याचं मत खंडपीठानं नोंदवलं. यासंदर्भात पुढची सुनावणी उद्या होणार आहे.

****

परभणी जिल्ह्यात खरीप हंगामाची पीकपेरा ई-पीक पाहणी नोंदवण्याचा कालावधी ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यात कालपर्यंत ७६ हजार ९५७ शेतकऱ्यांनी पीकपेरा नोंदणी केली आहे. उर्वरित सर्व शेतकऱ्यांना पीकपेरा ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे विहीत मुदतीत नोंदवण्यासाठी, आजपासून ते येत्या २४ सप्टेंबर या कालावधीत तीन दिवसीय विशेष मोहिमेचं आयोजन केलं आहे.

****

 

लातूर बाजारपेठेत काल सोयाबीनचे भाव अडीच ते तीन हजार रुपयांनी कोसळले. केंद्र सरकारना खाद्य तेलावरच्या आयात शुल्कात केलेली कपात, सोयाबीन पेंड आयातीस दिलेली परवानगी या धोरणामुळे भाव कोसळल्याचं सांगण्यात येत आहे.

उस्मानाबाद इथल्या बाजारातही सोयाबीनचे दर पाच ते सहा हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत घसरले.

****


औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल सिल्लोड तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. शेतमालाला योग्य दर मिळत नसल्यानं टमाटे आणि मिरच्या तहसील कार्यालयासमोर फेकून निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आलं.

****

परभणी जिल्ह्यात वसमत रस्त्यावरील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची खाजगी विमा कंपनीकडून मदत मिळवून द्यावी, तसंच साखर कारखान्यांकडून रास्त आणि किफायतशीर दरानं ऊसाची देयकं वितरित करावी, यासह अन्य मागण्यांचं निवेदन, आंदोलनकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाला सादर केलं.

****

लातूर तालुक्यातल्या मौजे रुई दिंडेगाव आणि मौजे ढोकी या गावांमध्ये अटल भूजल योजनेअंतर्गत प्रस्तावित जलसुरक्षा आराखड्यासाठी क्षेत्रीय सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक एस.बी.गायकवाड यांनी ही माहिती दिली.

****

मराठवाड्यात कालही अनेक भागात पाऊस झाला. अनेक प्रकल्पांमधल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. येलदरी, सिद्धेश्वर, विष्णुपुरी, निम्न दुधना आणि मनार ही पाच धरणं पूर्ण भरली असून, मांजरा, माजलगाव, पैनगंगा प्रकल्पाची शंभर टक्के भरण्याकडे वाटचाल सुरु आहे. पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठाही ७२ टक्क्यावर आला आहे.

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयातून काल सकाळी आणखी दोन दरवाजे अर्धा मीटरनं उचलून पूर्णा नदीच्या पात्रात पाणी सोडलं जात आहे. यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

बीड जिल्ह्यातला मांजरा प्रकल्प शंभर टक्के भरला, तर हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर धरणारे तीन दरवाजे उघडण्यात आले आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल दुपारपासून मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, अनेक भागात पिकांमध्ये पाणी साचलं आहे. जिल्ह्यात १५ मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात अनेक भागात काल सायंकाळनंतर पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यात पिंपरी गावानजीक बाळापूर ते कान्हेगाव रोडवरील पुलावरून पाणी वाहत होतं.

परभणी शहरात आणि परीसरात दमदार पाऊस झाला. तर पुर्णा आणि जिंतूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.

****

हवामान : मराठवाड्यात आज सर्व जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात उद्याही पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यात येत्या २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे.

****

 

No comments:

Post a Comment