Thursday, 23 September 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.09.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 September 2021

Time 1.00 to 1.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ८३ कोटीचा टप्पा पार केला आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईतील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. काल दिवसभरात ७१ लाख ३८ हजार २०५ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या ८३ कोटी ३९ लाख ९० हजार ४९ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या ३१ हजार ९२३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २८२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी ३५ लाख ६३ हजार ४२१ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ४६ हजार ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ३१ हजार ९९० रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी २८ लाख १५ हजार ७३१ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या तीन लाख एक हजार ६०४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

महाराष्ट्र हे निर्यात क्षेत्रात अग्रेसर रहावं यासाठी उद्योग संचालनालय आणि केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत मुंबईत आयोजित दोन दिवसाच्या ‘वाणिज्य उत्सवा’ची काल सांगता झाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यापुढे प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत निर्यात जागरुकता कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचं, उद्योग विभागाचे आयुक्त तथा राज्याचे निर्यात आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी यावेळी सांगितलं. प्रत्येक जिल्ह्यात एक्स्पोर्ट प्रमोशन कमिटी स्थापन करण्यात आली असून, जिल्हानिहाय निर्यात आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं ते म्हणाले. शासनाच्या पाठिंब्याच्या माध्यमातून द्विपक्षीय व्यापार संधी, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स, डेव्हलपमेंट क्रेडिट गॅरंटी इत्यादी विषयांवर या दोन दिवसीय परिषदेत सविस्तर चर्चा झाली.

****

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही माहिती दिली. प्राधिकरणात सध्या कार्यरत दोन हजार ११८ अधिकारी, कर्मचाऱ्यांना तसंच ११ हजार सेवानिवृत्त कर्मचारी अशा एकूण १३ हजार ११८ कर्मचाऱ्यांना, या निर्णयाचा लाभ होणार आहे. एक जानेवारी २०१६ पासून या सर्वांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यात येणार आहे.

****

राज्यात चालू हंगामात कापूस खरेदीचं योग्य नियोजन करून शेतकरी हितासाठी कापूस खरेदीला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरवात करावी, अशा सूचना सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या आहेत. कापूस खरेदी नियोजनाबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. राज्यात यावर्षी कापूस पेरा गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे साडे सहा टक्क्यांनी घटला असला, तरीही सद्यस्थितीत कापूस पिकाची परिस्थिती पाहता, राज्यात ८०-८५ लाख गाठी एवढे कापूस उत्पादन अपेक्षित आहे. त्यानुसार योग्य नियोजन करून खरेदी केंद्रं नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत करावी आणि या केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्यातल्या सर्व आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या स्वीप अर्थात, मतदारांचं पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग या कार्यक्रमाअंतर्गत साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात येणार असून, वैद्यकीय शिक्षण आणि औषधीद्रव्ये विभागानं याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. प्रत्येक वर्गातील निवडलेले प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांकडून निवडलेली समिती या मंडळाचं कामकाज पाहतील.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेच्या सल्लागार समितीचं पुनर्गठन करण्यात आलं आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत लोकनेते गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेच्या नावाने स्वतंत्र पदवी आणि पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचं स्वायत्त या संस्थेला बहाल करण्यात आलं आहे. याबाबतचा शासन निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं काल जारी केला. सल्लागार मंडळास आवश्यक असणारा निधी, त्याचे स्वतंत्र लेखापरीक्षण तसंच फेलो, सिनिअर फेलो अशा विविध पदांची आणि कंत्राटी पदांची भरती करण्याबाबतही मुभा देण्यात आली आहे.

****

उस्मानाबाद आणि परिसरात सतत पडत असलेल्या पावसामुळे उस्मानाबादला पाणीपुरवठा करणारं तेरणा धरण शंभर टक्के भरलं असून, पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याचं सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. नर्सी परिसरात पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना मोड फुटल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. जिल्ह्यात अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली असून, अतिपावसामुळे पिकाचं नुकसान सुरू झालं आहे.

****

No comments:

Post a Comment