Saturday, 9 October 2021

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.10.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 ०९ ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

आशियान समुहाला नॉन टेरिफ अर्थात करआकारणी व्यतिरिक्त इतर अडथळ्यांवर उपाययोजना करण्याचं आवाहन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी केलं आहे. भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या इंडो-आशियान प्रदेशातल्या व्यापार मंत्र्यांच्या अधिवेशनाला संबोधित करताना ते बोलत होते.आशियान समुहाबाहेरच्या इतर काही देशांकडून बऱ्याचदा मुक्त व्यापार कराराचा गैरवापर होतो,त्यालाही आळा घालावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

**

परभणी पोलिसांनी काल मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरी करणाऱ्या एका टोळीला अटक केली. यामध्ये सात आरोपींचा समावेश असून, त्यांच्याकडून मोबाईल टॉवरच्या ४० बॅटरी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

**

नागपूर इथं दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा राज्य शासनाच्या सूचनेनुसार यावर्षी होणार नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दीक्षाभूमीवर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जाईल. दोन डोस न घेतलेल्या नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे व्यापक आरोग्य हित लक्षात घेऊन भाविकांनी यावर्षी दीक्षाभूमीवरील गर्दी टाळावी, असं आवाहन नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केलं आहे.

**

तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव २१ ऑक्टोबरपर्यंत साजरा होणार आहे. तुळजापूर मार्गे होणारी हैदराबाद ते औरंगाबाद मार्गावरची अवजड वाहनांची वाहुतक या कालावधीत अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतली वाहनं, छोटी वाहनं तसंच एस टी बस मात्र नियमित मार्गावरून धावू शकणार आहेत

**

दसरा सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं पूर्णा ते तिरुपती दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष रेल्वे गाडी चालू महिन्याच्या प्रत्येक सोमवारी पूर्णा इथून दुपारी एक वाजता सुटेल, तर तिरुपती इथं मंगळवारी सकाळी आठ वाजता पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी तिरुपती इथून दर मंगळवारी रात्री सव्वाआठ वाजता निघून बुधवारी दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी पूर्णा इथं पोहचेल.

**

 

No comments:

Post a Comment