Friday, 1 October 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 01 October 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 October 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक –  ० ऑक्टोबर २०२१ सायंकाळी ६.१०

****

गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-१९ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** वनं आणि वन्यजीव संरक्षण विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

** ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणीसह अन्य उपाय योजनांसाठी 'शरद शतम्' योजना प्रस्तावित

** आजादी का अमृतमहोत्सव उपक्रमांतर्गत स्वच्छ भारत अभियानाला प्रारंभ

आणि

** यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार माजी आमदार उल्हास पवार यांना प्रदान

****

शालेय विद्यार्थ्यांमध्ये वनं, वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन यासंदर्भात रुची निर्माण करण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश व्हावा अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. विकासाचा ध्यास घेऊन आपण विनाशाकडे तर जात नाही ना याचा विचार करण्याची गरज व्यक्त करत, मुख्यमंत्र्यांनी, वन आणि वन्यजीव वैभव जपण्यासाठी जगा आणि जगू द्या हा मूलमंत्र गाठीशी बांधत पुढं जाण्याचं आवाहन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमात दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले. भारतीय वातावरणाशी नातं सांगणारी झाडं लावण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्याच्या नागरी भागात ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृक्षांना 'हेरिटेज ट्री' असं संबोधून त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पवार यांनी केली.

****

ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी आणि उपाय योजनांच्या दृष्टीनं 'शरद शतम्' नावाची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या ६५ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करता येणार आहेत. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे 'जागतिक ज्येष्ठ नागरिक' दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुंडे आज मुंबईत बोलत होते. या यासंदर्भात एक उच्च स्तरीय समिती नेमण्यात आली असून समितीचा अहवाल प्राप्त होताच ही योजना मंत्रिमंडळ मान्यतेसाठी सादर करण्यात येणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.

****

महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या आर्थिक दुर्बल घटक वगळता इतर सर्व प्रवर्गातील ४ हजार ५३४ उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.

****

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज उत्तरप्रदेशातल्या प्रयागराजहून स्वच्छ भारत कार्यक्रमाचा आरंभ केला. थोर देशभक्त चंद्रशेखर आजादांच्या पुतळ्याला हार घालून आणि चंद्रशेखर आजाद उद्यानात रोप लावून त्यांनी या स्वच्छता मोहिमेचा आरंभ केला. महिनाभर चालणारा हा कार्यक्रम म्हणजे आजादी का अमृत महोत्सव उपक्रमाचा एक भाग आहे. स्वच्छतेबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करुन कचरा निर्मूलनात सहभागी होण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं तसंच 'पुनर्वापर न करता येणाऱ्या प्लॅस्टिकचं उच्चाटन' अशी या मोहिमेची उद्दिष्टं आहेत. देशभरातल्या ७४४ जिल्ह्यांमधल्या सहा लाख गावांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे.

****

 शासनाने आणेवारीचा खेळ बंद करून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली पाहिजे अशी मागणी विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यात निळापूर इथं फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरघोस मदतीची मागणी फडणवीस यांनी केली.

****

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळं झालेल्या नुकसानाची आढावा बैठक पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. यावेळी बोलतांना देशमुख यांनी अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांच्या पिक विम्याचे अर्ज ऑफलाईन ऑनलाईन पध्दतीनं ग्रामपातळीवर स्वीकारावेत. पंचनामे आणि सर्वेक्षण तत्काळ पूर्ण करुन त्याचा अहवाल त्वरीत सादर करावा, तसंच मदतीपासून एकही शेतकरी वंचित रहाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देशमुख यांनी यावेळी केल्या.

****

नांदेड जिल्ह्याच्या नांदेड तालुक्यातल्या सुगाव खुर्द, सुगाव बुद्रुक शिवारात गोदावरी नदीचं पाणी सलग चार दिवसांपासून साचलेलं आहे. या साचलेल्या पाण्यामुळं सुमारे एक हजार एकर शेतजमिनीवरील खरीपाची पिकं पाण्याखाली गेली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी आवश्यक असलेला इंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाला तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणिस आमदार अतुल सावे यांनी केली आहे. ते आज औरंगाबाद इथं बोलत होते. आयोगाला निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत नसल्यामुळे हे काम अजूनही सुरू झालेलं नाही, याकडे सावे यांनी लक्ष वेधलं.

****

माजी आमदार उल्हास पवार हे अष्टपैलु नेतृत्व असून, विविध क्षेत्रातला त्यांचा वावर नव्या पिढीतील राजकाण्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं, ज्येष्ठ संपादक तसंच विचारवंत ज्ञानेश महाराव यांनी म्हटलं आहे. अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा नववा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार महाराव यांच्या हस्ते उल्हास पवार यांना प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. स्मृतिचिन्ह, यशवंतराव चव्हाण यांची शिल्प प्रतिमा, सन्मानपत्र, शाल आणि २५ हजार रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुरस्काराला उत्तर देताना, पवार यांनी यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचं काम भगवानराव लोमटे यांनी केलं, अशी भावना व्यक्त केली.

****

हवामान बदलांमुळे शेती क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडत असून या बदलांना सामोरं जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं क्रमप्राप्त असल्याचं, परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अशोक ढवण यांनी म्हटलं आहे. विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्यावतीनं यासंदर्भात घेण्यात आलेल्या, ऑनलाईन वेबिनारच्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरू बोलत होते. शेतीक्षेत्रात ड्रोन, रोबोट, आदीसह विविध डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करणं गरजेचं आहे. शेतीची उत्पादन क्षमता तसंच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसाठी कृषी अभियंत्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचं असल्याचं, कुलगुरु ढवण यांनी नमूद केलं.

****

एटीएम सेंटरवर पैसे काढण्यास आलेल्या नागरिकांचे एटीएम कार्ड बदलून बँक खात्यातून पैसे लुबाडणाऱ्या आंतरराज्य टोळीला धुळे पोलिसांनी आज अटक केली.   यात एका अल्पवयीन युवकासह तिघांचा समोवश असून, हे सर्वजण हरियाणा राज्यातले आहेत. त्यांच्या कार मधून पोलिसांनी १ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम, २० हजाराचे ७ मोबाईल, ८ लाखाची कार, ६ हजाराचे एटीएम कार्ड स्वाईप व क्लोन करण्याचे ३ हजाराचे स्कीमर मशिन आणि वेगवेगळ्या बँकेचे एकूण ६६ एटीएम कार्ड असा एकूण ९ लाख ५९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

//********//

 

No comments:

Post a Comment