Tuesday, 12 October 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 October 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

               Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 October 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १२ ऑक्टोबर २०२१ सायंकाळी ६.१०

****

गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड – १ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणं ही नागरिकांची जबाबदारी; रस्ते तसंच उद्यानात कचरा टाकू नये - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं आवाहन 

** राज्यात बंदिस्त सभागृहे आणि मोकळया जागेत सांस्कृतिक कार्यक्रमांना २२ ऑक्टोबरपासून परवानगी

** ओबीसीला परत धोका दिल्यास मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही - भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा इशारा

आणि

** औरंगाबाद शहराजवळील बंधाऱ्यात चारचाकी पडली; चार प्रवासी बुडाल्याची भीती

****

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणं ही नागरिकांची जबाबदारी असल्याचं, युवक कल्याण तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत नेहरु युवा केंद्राच्या स्वयंसेवकांसह हुमायून मकबरा परिसरात स्वच्छता मोहीम राबवल्यानंतर बोलत होते. नागरिकांनी रस्त्यावर किंवा बागबगिच्यांमध्ये खाद्यपदार्थांची वेष्टनं तसंच पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकू नयेत, असं आवाहन ठाकूर यांनी केलं. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत एक ऑक्टोबरपासून आयोजित स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरातून पहिल्या दहा दिवसांत तीस लाख किलो कचरा संकलित केला असून, येत्या ३१ तारखेपर्यंत ७५ लाख किलो कचरा संकलनाचं उद्दीष्ट असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. नेहरु युवा केंद्र तसंच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून देशातल्या ७४४ जिल्ह्यांतल्या सहा लाख गावांमध्ये स्वच्छ भारत अभियान राबवलं जात आहे.

****

मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह इथं उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवन प्रकल्पाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यावेळी उपस्थित होते. येत्या डिसेंबर पासून बांधकामास सुरुवात करण्यात येईल तर पुढील अठरा महिन्यात मराठी भाषा भवन खुलं केलं जाईल, अशी माहिती देसाई यांनी दिली.

****

राज्यात बंदिस्त सभागृहे आणि मोकळया जागेत येत्या २२ ऑक्टोबरपासून कार्यक्रम सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत याबाबतचा शासन निर्णय काल निर्गमित करण्यात आला आहे. कार्यक्रम सादर करताना कोविड संदर्भातील केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या कोणत्याही निर्बंधाचा भंग होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक असेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत ओबीसीला परत धोका दिल्यास मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिला आहे. त्या आज औरंगाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आयोजित ओबीसी जागरण अभियान मराठवाडा विभागीय मेळाव्यात बोलत होत्या. महाविकास आघाडी सरकारनं यासंदर्भातला अध्यादेश लवकर काढायला हवा होता, असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्या म्हणाल्या...

 

 आज ओबीसी वेगवेगळ्या फ्रटनी रस्तयावर उतरलेला आहे. मग अशा वेळेस त्यांनी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला. हा अध्यादेश आधी काढला असता तर या ज्या निवडणुका आता लागल्याय त्या निवडणुकामध्ये लागू झाला असता की नाही. आता त्या निवडणुकांमध्ये ओबीसींचं आरक्षण लागू नाही मग पुढच्या निवडणुकीमध्ये लोक कोर्ट कचेऱ्या करतील की नाही ? हा अध्यादेश टीकवून धरुन कोर्टामध्ये बाजू मांडून, येणाऱ्या निवडणुकीत परत ओबीसीला धोका देण्याचं तुमचं कुठलं षडयंत्र असेल तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरु देणार नाही. हे आम्ही आता सांगतोय

 

केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्यासह मराठवाड्यातले भाजपचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते या मेळाव्यात उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा आणि ओबीसी समाजाचं आरक्षण संपुष्टात आल्याचं आरोप कराड तसंच बागडे यांनी यावेळी केला.

****

 दलित आणि मुस्लिम समाजाचा केवळ मतासाठी वापर केला जातो, मात्र सत्तेचे पद देताना जातीयवाद केला जात असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते अय्याज नायकवडी यांनी केली आहे. ते आज सांगली इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. सांगलीतील काँग्रेस ही तीन घरापुरती एकवटली असून त्यांना इतर कार्यकर्त्यांची फिकीर नाही, २२वर्षे आपल्याला वारंवार डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. विश्वजित कदम हे अल्पसंख्याक मंत्री असूनही त्यांच्याच जिल्ह्यात मुस्लिम समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप नायकवडी यांनी केला.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणीचे माजी जिल्हाध्यक्ष विजय वरपूडकर यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी या सर्वांचं स्वागत केलं.

****

 औरंगाबाद शहराजवळील जळगाव इथल्या बंधाऱ्यात आज एक चारचाकी गाडी बुडाली, गाडीतले चार जण बंधाऱ्यात बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. करमाड पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसंच अग्निशमन दलाचे कर्मचारी पाण्यात बुडालेली कार आणि त्यामधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, ही कार तळाशी असल्यानं बाहेर काढण्यात अडचण येत असल्याचं मुख्य अग्निशमन अधिकारी आर के सुरे यांनी सांगितलं. पुण्याहून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल - एनडीआरफच्या पथकाला पाचरण करण्यात येअसल्याचं सुरे यांनी सांगितलं.

****

सातारा इथल्या हिरकणी रायडर ग्रुपच्या शुभांगी पवार यांचा नांदेडजवळ अर्धापूर तालुक्यातील भोकरफाटा इथं आज टँकरच्या धडकेत मृत्यू झाला. त्या ३२ वर्षांच्या होत्या. हिरकणी गटाच्या नऊ महिला सदस्य राज्यातल्या साडे तीन शक्तिपीठांच्या दर्शनासाठी १ हजार ८६८ किलोमीटरच्या प्रवासासाठी निघाल्या होत्या. कोल्हापुरात अंबाबाई आणि तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या दर्शनानंतर माहूर गडावरील रेणुकामातेच्या दर्शनासाठी या सर्वजणी जात असताना, हा अपघात झाला.

****

शारदीय नवरात्र महोत्सवात आज सहाव्या दिवशी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्म रक्षणासाठी तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन  भवानी तलवार दिल्याचं सांगितलं जातं. तो प्रसंग सजीव करण्यासाठी ही पूजा मांडण्यात येते. उद्या तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.

//**************//

No comments:

Post a Comment