Tuesday, 19 October 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 October 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 October 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १९ ऑक्टोबर २०२१ सायंकाळी ६.१०

****

देशात १०० कोटी कोविड प्रतिबंधक लस देण्याचं उद्दिष्ट लवकरच पूर्ण होत आहे. ही उद्दिष्टपूर्ती करण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना 'आकाशवाणीचा सलाम'. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात आणि चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड - 19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      देशात कोविड प्रतिबंधक लसीचं ९९ कोटींहून अधिक नागरिकांना लसीकरणं.

·      राज्यातली उपाहारगृहं रात्री १२ पर्यंत तर इतर दुकानं रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी.

·      शालेय पोषण आहारात बदल; धान्यापासून बनवलेली पौष्टिक बिस्कीटं दिली जाणार.

·      दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी होणार जाहीर.

आणि

·      प्रेषित मोहमंद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलादचा सण सर्वत्र भक्तिभावानं साजरा.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीचं ९९ कोटींहून अधिक नागरिकांना लसीकरण करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनुसख मांडवीय यांनी ट्विट संदेशात ही माहिती दिली. लवकरच देश १०० कोटी लसीकरणाचं उद्दीष्ट गाठणार असल्याचं, त्यांनी म्हटलं आहे. काल दिवसभरात देशभरात ८५ लाख ४६ हजारापेक्षा जास्त नागरीकांना कोविड लस देण्यात आली.

दरम्यान, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोविड लसीच्या दुसऱ्या मात्रेच्या लसीकरणावर लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केलं आहे. त्यांनी आज दूर-दृश्य प्रणालीच्या माध्यमातून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत कोविड लसीकरणाचा आढावा घेतला. कोविड लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी आणि लसीकरणाबाबत ग्रामीण भागातली स्थिती सुधारण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश राजेश भूषण यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. अनेक राज्यांमध्ये दुसऱ्या मात्रेच्या प्रतिक्षेत असणाऱ्या लोकांचे लसीकरण करण्यासाठी लसींचा पुरेसा साठा उपलब्ध व्हावा याकडे लक्ष देण्याच्या सुचनाही भूषण यांनी यावेळी केल्या.

****

राज्यातली उपाहारगृहं रात्री १२ वाजेपर्यंत तर इतर दुकानं रात्री ११ वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी राज्य शासनानं दिली आहे. मात्र, कोविड पार्श्वभूमीवर लागू असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं नागरिकांना आणि आस्थापनांना काटेकोर पालन करावं लागणार आहे. पूर्णपणे लसीकरण, गर्दीच्या क्षमतेवर निर्बंध, हे नियम परिस्थिती नुसार लागू राहील. सध्या सणासुदीचे दिवस असल्यानं, खरेदीसाठी सार्वजनिक ठिकाणी लोकांची जास्त गर्दी होण्याची शक्यता लक्षात ठेवून हा वेळ वाढवण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आल्याचं याबाबत जारी पत्रकात म्हटलं आहे.

अन्य निर्बंधांमध्ये कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. उपाहारगृहं तसंच अन्य आस्थापनांच्या वेळेसंदर्भात स्थानिक प्रशासन आवश्यकतेनुसार निर्बंध लावू शकतं किंवा सवलत देऊ शकतं, असं आपत्ती व्यवस्थापन विभागानं म्हटलं आहे.

****

शालेय पोषण आहारात बदल करण्यात आला आहे. आता ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी, सोयाबीन हे मुख्य घटक तसंच लोहयुक्त गव्हाचे पीठ, पिठीसाखर, खाद्य तेल, स्किम्ड दूध आणि इतर उपघटक वापरून तयार करण्यात आलेली 'न्यूट्रिटीव्ह स्लाईस' - बिस्किटं विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. पहिली ते पाचवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा ६ पाकिटं तर इयत्ता सहावी ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांला दरमहा बिस्किटांची ९ पाकिटं देण्यात येणार आहेत. प्रत्येक पाकिटात १६ बिस्किटं असून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आठवड्यातून पाच दिवस दररोज ४ बिस्किटे तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी दररोज ६ बिस्किटे खाण्याची सूचना शिक्षण विभागाच्या वतीनं करण्यात आली आहे.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. हा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असून या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील.

****

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त आज पालघर तालुका विधी सेवा समिती तर्फे पालझर जिल्ह्यातल्या कुंभवली एकलारे, मुरबे, नांदगांव तर्फे तारापूर, आलेवाडी- गुंदवली, नवापूर आणि पाम इथं विविध कायदेविषयक विषयांवर मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली. यात महिलांच्या न्याय हक्कांसाठी असलेले कायदे, तंटा वाद विवाद आपापसात मिटविणे यासारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं.

****

सोलापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं आज सकाळी अवैध मद्यसाठा जप्त केला. शेटफळ ते कुर्डुवाडी रस्त्यावर करण्यात आलेल्या या कारवाईत, चार जणांच्या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून एक आयशर टॕम्पो, स्विफ्ट कार, दारूच्या बाटल्यांच्या १९० पेट्या असा एकूण २६ लाख २० हजार ३२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अधिक्षक नितिन धार्मिक यांनी दिली.

****

दिवाळी निमित्त भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांनी निर्मिती केलेलं साहित्य खरेदी करण्याचं आवाहन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हेमंत वसेकर यांनी उद्योग आणि बँकिंग क्षेत्राला केलं आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिला आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नांना हातभार लागेल तसंच त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळेल असा विश्वास वसेकर यांनी व्यक्त केला.

****

प्रेषित मोहमंद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलादचा सण आज भक्तिभावानं साजरा झाला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद इथं मोहंमद पैगंबर यांचा पवित्र पोशाख आणि पवित्र केस आज भाविकांना दर्शनासाठी खुला केला जातो. भाविकांनी आज सकाळपासूनच याठिकाणी गर्दी केली होती.

उस्मानाबाद इथं शहरात ईद-ए-मिलाद या निमित्ताने रक्तदान शिबिर तसंच कोविड लसीकरण मोहीम घेण्यात आली. आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते या शिबीराचं उद्घाटन करण्यात आलं.

 

//************//

No comments:

Post a Comment