Saturday, 2 October 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 October 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 October 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक –  ऑक्टोबर २०२१ सायंकाळी ६.१०

****

गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-१९ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      सर्वोच्च न्यायालय तसंच उच्च न्यायालयातल्या ज्येष्ठ वकिलांनी कामकाजातला एक ठराविक वेळ दुर्बल घटकांना नि:शुल्क सेवा देण्यासाठी राखून ठेवावा - राष्ट्रपतींचं आवाहन.

·      राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना सर्वत्र अभिवादन.

आणि

·      औरंगाबाद इथं मार्ड संघटनेच्या डॉक्टरांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा.

****

सर्वोच्च न्यायालय तसंच उच्च न्यायालयातल्या ज्येष्ठ वकिलांनी आपल्या कामकाजातला एक ठराविक वेळ दुर्बल घटकांना नि:शुल्क सेवा देण्यासाठी राखून ठेवावा, असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. ते आज गांधी जयंतीनिमित्तानं, नवी दिल्लीत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या अखिल भारतीय विधी जागरूकता आणि आऊटरिच अभियानाचा शुभारंभ करताना बोलत होते. कायदेशीर सेवा संस्थांची संरचना न्यायिक व्यवस्थेला सहकार्य करते, तसंच राष्ट्रीय, राज्य, जिल्हा तसंच उपविभागीय पातळीवर न्यायिक व्यवस्थेला स्थैर्य प्रदान करते, दुर्बल घटकांच्या सेवेसाठी हे सहकार्य आणि स्थैर्य महत्त्वाचं ठरतं, असं राष्ट्रपतींनी नमूद केलं. महात्मा गांधी हे मानवतेच्या सेवेचं प्रतीक असल्याचं सांगतानाच राष्ट्रपतींनी वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करणं, ही सुद्धा मानवतेची सेवा असल्याचं म्हटलं आहे.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. यानिमित्तानं प्रार्थना सभांसह विविध कार्यक्रमातून दोन्ही राष्ट्रपुरुषांना अभिवादन करण्यात आलं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वर्धा इथं सेवाग्राम आश्रमात बापुकुटी इथं आज महात्मा गांधीजींच्या स्मृतींना अभिवादन केलं. गांधीजी सत्य, शांती, अहिंसेचे प्रेरक आहेत, त्यांचं जीवन देशासाठी त्यागमय राहिलं आहे. आज ते जगाला प्रेरीत करत असल्याचं, राज्यपाल म्हणाले.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी गांधीजी तसंच शास्त्रीजी यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा यासह स्वच्छता, ग्रामविकासाबाबतची गांधीजींची शिकवण मार्गदर्शक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. शास्त्रीजींनी पंतप्रधान म्हणून कणखरपणे देशाचं नेतृत्व केलं. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीतून त्यांनी प्रखर राष्ट्रभक्तीचा आदर्श घालून 'जय जवान, जय किसान' घोषणेतून त्यांनी चैतन्य निर्माण केलं, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

****

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज जालना इथं महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सेवा समर्पण अभियानांतर्गत शहरातल्या गांधी चमन चौकातून स्वच्छता अभियान टप्पा दोनला सुरुवात करण्यात आली. जालना शहरासह जिल्ह्यात पुढील आठवडाभर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, नागरिकांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असं आवाहन दानवे यांनी यावेळी केलं.

औरंगाबाद इथं भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांच्या नेतृत्वात, गांधीजी तसंच शास्त्रीजींना अभिवादन करून तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.

****

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते गांधी जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या दर्शनिका विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ई - स्वरूपात महात्मा गांधी संकलित वाङमयाचं आज प्रकाशन करण्यात आलं. हे साहित्य पेनड्राईव्ह स्वरुपात प्रथमच प्रकाशित होत आहे. ई - स्वरूपातलं हे वाङमय लवकरच जगातील प्रत्येक वाचनालयात उपलब्ध व्हावं, यासाठी दर्शनिका विभागानं प्रयत्न करावा, असं आवाहन देशमुख यांनी केलं आहे.

****

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज हिंगोली जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली. हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विमा कंपन्यांनी शासकीय पंचनामे मान्य करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. अन्यथा शासनाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी हिंगोलीतल्या आडगाव इथं नुकसानीच्या पाहणीनंतर केली.

पीकविमा कंपनीकडे तक्रारी करूनही कोणी आलं नाही. शासनाकडूनही पंचनामे होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी फडणवीस यांच्याकडे केल्या. पीकविमा कंपन्या अजून पंचनामे करत नसतील तर ही बाब गंभीर आहे, असं फडणवीस म्हणाले. आडगाव पाठोपाठ फडणवीस यांनी हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी, डोंगरगाव, वारंगा, डोंगरकडा या भागातही नुकसानाची पाहणी केली.

दरम्यान फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली.

****

अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीनं झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरसह काही गावच्या शिवारात पिकांच्या नुकसानीची तसंच गावातील पडझड झालेल्या घरांची राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आज पाहणी केली, या परिस्थितीत राज्य शासन आपल्या पाठीशी आहे आणि सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन देशमुख यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिलं.

दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कोलमडलेल्या शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी राज्य शासनानं तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करावा, हेक्टरी ५०हजार रुपये मदत द्यावी, मृत्युमुखी पडलेल्या पशुधनासाठी शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत द्यावी. अशा मागण्या भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चानं केली आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास भाजप किसान मोर्चा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशाराही किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.

****

औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटीतले मार्ड संघटनेचे ३०० निवासी डॉक्टर्स कालपासून बेमुदत संपावर गेले आहेत. आज या डॉक्टरांनी रुग्णालय परिसरात मोर्चा काढला. वैद्यकीय शुल्क माफ करावं, वसतीगृहातल्या समस्या दूर कराव्यात, डॉक्टरांना रुग्णसेवा करण्यासाठी चांगलं वातावरण निर्माण करावं, मानधन वाढवून द्यावं या आणि इतर मागण्या या डॉक्टरांनी यावेळी केल्या.

दरम्यान, निवासी डॉक्टर्स संपावर असले तरी कालपासून घाटी रुग्णालयातील अत्यावश्यक शस्त्रक्रिया आणि गंभीर रुग्णांची रुग्णसेवा सुरू ठेवण्यात आल्या असून, उद्यापर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर अत्यावश्यक सेवा तसंच शस्त्रक्रिया विषयीच्या सेवा बंद करण्याचा इशारा मार्ड नं दिला आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयाचे सहा दरवाजे आज सकाळी उघडून पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या २३ हजार ७९८ दशलक्ष घनमीटर प्रतिसेकंद या वेगानं पूर्णा नदीपात्रात विसर्ग सुरु असून धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावं असं आवाहन येलदरी धरण, पूर नियंत्रण कक्षानं केलं आहे.

//********//

No comments:

Post a Comment