Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 October 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४
ऑक्टोबर
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण
मोहिमेत १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ही उद्दीष्टपूर्ती करण्यामध्ये योगदान देणारे
डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना आकाशवाणीचा सलाम. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही
कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी
मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात,
चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११-
२३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या
मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** पुरेसं मनुष्यबळ आणि आवश्यक पायाभूत सुविधांनी
न्यायालयीन व्यवस्थेचं बळकटीकरण करण्याची गरज- सरन्यायाधीश
एन. व्ही. रमणा
** कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगाचं वरिष्ठ पोलीस अधिकारी परमवीर सिंग आणि रश्मी शुक्ला
यांना समन्स
**
राज्यात एक हजार ७०१ नवे कोरोना
विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात दोन जणांचा मृत्यू
तर ५४ बाधित
** पैठणचे
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याविरुद्ध वाळू वाहतुकीसाठी, लाच मागितल्या
प्रकरणी गुन्हा दाखल
आणि
** टी ट्वेंटी क्रिकेट
विश्वचषक स्पर्धेत भारताचा आज पाकिस्तानसोबत सामना, ऑस्ट्रेलियाचा दक्षिण अफ्रिकेवर तर इग्लंडचा वेस्ट
इंडिजवर विजय
****
पुरेसं
मनुष्यबळ आणि आवश्यक पायाभूत सुविधांनी न्यायालयीन व्यवस्थेचं बळकटीकरण करण्याची गरज सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा
यांनी व्यक्त केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीच्या
बी आणि सी विंगचं काल सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन झालं. केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री
किरेन रिजिजू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड,
खासदार इम्तियाज जलील, सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती उदय लळित, न्यायमूर्ती धनंजय
चंद्रचूड, न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य
न्यायमूर्ती दीपंकर दत्ता, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठातले न्यायमूर्तींसह लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय
न्यायालयीन पायाभूत सुविधा प्राधीकरण स्थापन करण्याबाबत आपण केंद्र सरकारला प्रस्ताव
पाठवला असून, संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात त्यावर विचार व्हावा, अशी अपेक्षा
सरन्यायाधीशांनी व्यक्त केली. ते म्हणाले…
I have
therefore sent a proposal for the establishment of National Judicial
Infrastructure Authority to the Honorable Minister of Law & Justice. I am
hoping for a positive response soon. I ask on the Honorable Minister of Law
& Justice to expedite the process & soon the proposal to create nation
judicial Infrastructure Authority with statutory backing is taken up in the
upcoming Winter Session of the Parliament.
केंद्रीय
मंत्री किरेन रिजीजू यांनी यावेळी बोलताना सर्वसामान्य माणूस आणि न्याय यामधलं अंतर
मिटलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं.
मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलेल्या भाषणात केंद्र तसंच राज्यांच्या सार्वभौम अधिकारांकडे
लक्ष वेधलं. मुंबई उच्च न्यायालयासाठी नवी इमारत बांधून देण्यात पूर्ण सहकार्य करण्याचं
आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. ते म्हणाले...
मी
आज आपल्या सर्वांच्या साक्षीने दिपंकरजी आपल्याला वचन देतो की हमे हायकोर्ट के लिए
बिल्डिंग चाहिये. वो सिर्फ आपका नही मेरा भी सपना है। आणि ते मी करणारच. आणि तारीख
तर आपण ठरवूच पण मी आदरणीय रमण्णा साहेबांना आजच आमंत्रण देतोय की आपको भी आना होगा
भूमिपूजन के लिए। आणि प्रयत्न असा करू की आपल्याच कारकिर्दीत त्याचं उद्घाटन सुध्दा
करायचं. हे मी का म्हणतो, की आत्ता चंद्रचूड साहेबांनी एक बाजू कोर्टाची, काय काय चाललेलं
आहे, किती केसेस आहेत आणि न्यायमूर्ती किती काम करत असतात आम्हाला पूर्ण आदर आहे.
****
राष्ट्रीय
विधी प्राधिकरणाच्या महाशिबीरातून उपेक्षित वंचित तसंच तळागाळातल्या लोकांना योजनेची
माहिती करून देता येते, तसंच त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव होते, असं राष्ट्रीय
विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती उदय लळित यांनी म्हटलं आहे. काल बीड इथं, आझादी का अमृत महोत्सवा अंतर्गत
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण जनजागृती महाशिबीरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
हा उपक्रम फक्त ४५ दिवसच सुरू न
राहता सदैव यावर मंथन व्हावं, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. शेवटच्या माणसाला न्याय
मिळाला तर ते या यंत्रणेचं फलित म्हणावं लागेल, आणि आझादी का अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने
आपण साजरा करू शकू, असंही न्यायमूर्ती ललित यांनी नमूद केलं.
****
तपास यंत्रणांबाबत निर्माण होणारी प्रश्नचिन्हं, हे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी अतिशय
वाईट असल्याचं, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी
म्हटलं आहे. ते काल सांगली इथं वार्ताहरांशी बोलत होते. तपास अधिकाऱ्यांनीही संयम बाळगण्याची
गरज निकम यांनी व्यक्त केली. राजकीय पक्षांना तपास यंत्रणांबाबत न्यायालयात दाद मागता
येते, त्यासाठी प्रसिद्धी माध्यमातून शंका उपस्थित करणं योग्य नाही, असं निकम यांनी
नमूद केलं.
****
२०१८ मध्ये झालेल्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी
आयोगानं वरिष्ठ पोलीस अधिकारी परमवीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना साक्ष देण्यासाठी हजर
राहण्याचं समन्स बजावलं आहे. कोरेगाव भीमा इथं १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता, तर ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाडा इथं एल्गार परिषद घेण्यात आली होती.
तेव्हा रश्मी शुक्ला पुणे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. तसेच परमवीर यांनी
अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून एल्गार परिषदेशी निगडित अटकेतील आरोपींकडील जप्त केलेले काही
पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले होते. त्यामुळे या प्रकरणी या दोघांची साक्ष महत्त्वाची आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
आहेत. या मालिकेचा हा ८२वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
देशात
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १०१ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. यापैकी
७१ कोटी चार लाख नागरीकांना पहिली मात्रा,
तर अंदाजे ३० कोटी नागरीकांना दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
राज्यात काल एक हजार ७०१ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले,
त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख एक हजार, ५५१ झाली आहे.
काल ३३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या
संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार
९९८ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक
१२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल एक
हजार ७८१ रुग्ण बरे झाले, राज्यात
आतापर्यंत ६४ लाख ३३ हजार ९१९ रुग्ण,
कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड
मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ४६ शतांश टक्क्यांवर कायम आहे. राज्यात सध्या २४ हजार २२
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ५४ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत दोघेही औरंगाबाद जिल्ह्यातले
आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात काल २१ नवे रुग्ण आढळले, औरंगाबाद
१२, बीड नऊ, लातूर सात, जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर नांदेड जिल्ह्यात
एक रुग्ण आढळला. तर, हिंगोली
जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
राज्यातल्या नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ सेवा
उपलब्ध करून देण्यासाठी डायल ११२ प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल
अमरावती इथं पोलिस विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. पोलीस दलाच्या प्रशासकीय
आवश्यकता, डिजीटल वायरलेस सिस्टम आणि इतर आवश्यक बाबींविषयी
सकारात्मक कार्यवाही करण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
****
जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभागाच्या ‘कृषी कर्ज
मित्र’ योजनेला शासनानं मान्यता दिली असून या संदर्भातला
शासन निर्णय ग्रामविकास विभागानं निर्गमित केला आहे. इच्छुक पात्र शेतकऱ्यांना
वेळेत आणि सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ
इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी. हे कृषी कर्ज
मित्र, शेतकऱ्याच्या संमतीने कर्ज प्रकरण तयार करून, आवश्यक कागदपत्रे गोळा करून
मंजुरीसाठी बँकेकडे सादर करेल. कृषी कर्ज मित्राने पारदर्शी आणि प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना सहाय्य करण्याबाबत
बंधपत्र देणं आवश्यक असणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातले भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते माजी खासदार
भास्करराव पाटील खतगावकर यांनी काल काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश
केला. काँग्रेसचे पक्षाचे राज्य प्रभारी एच. के. पाटील तसंच
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत नायगाव इथं
झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हा प्रवेश केला. त्यांच्यासोबत
माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार
अविनाश घाटे, नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम
पाटील राजूरकर, जि.प. सदस्या डॉ. मीनलताई पाटील खतगावकर,
माजी नगरसेवक सरजितसिंघ गील यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याविरुद्ध वाळू उपसा आणि तिच्या वाहतुकीसाठी, मासिक हप्ता
म्हणून एक लाख तीस हजार रुपयांची लाच मागितली म्हणून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शेळकेचा अन्य साथीदार
नारायण वाघ याच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. शेळके याने मदतनीस वाघच्या मार्फत आणि पंच साक्षीदारांसमक्ष
लाचेची मागणी केली होती.
****
नांदेड ते घुमान संत नामदेव तीर्थयात्रा काल नांदेडहून एअर
इंडियाच्या विमानाने पंजाबातल्या घुमानकडे रवाना झाली.
गेल्या सात वर्षांपासून नांदेडच्या नानक साई फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या
वतीने ही यात्रा काढली जाते अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार
पंढरीनाथ बोकारे यांनी दिली. यावर्षी १२२ यात्रेकरू सहभागी झाले आहेत. हिंगोलीचे खासदार हेमंत
पाटील, नांदेड महापालिकेच्या महापौर जयश्री निलेश पावडे यांनी गुरू गोविंदसिंघजी विमानतळ इथं आयोजित कार्यक्रमात यात्रेकरुंना शुभेच्छा
दिल्या. घुमान
यात्रा महाराष्ट्र आणि पंजाब
राज्यातील संस्कृती वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने महत्वाची असल्याचं पाटील यावेळी
म्हणाले.
****
टी ट्वेंटी क्रिकेट
विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना आज पाकिस्तानबरोबर होणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता हा सामना सुरू होईल.
या स्पर्धेत काल
अबुधाबी इथं झालेल्या एका सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिका संघाचा पाच गडी राखून पराभव केला. दक्षिण
आफ्रिका संघानं दिलेलं ११९ धावांचं आव्हान ऑस्ट्रेलिया संघानं विसाव्या षटकांत साध्य केलं.
अन्य एका सामन्यात इग्लंडनं वेस्ट
इंडिजचा सहा गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजचा डाव
पंधराव्या षटकात सर्वबाद ५५ धावांवर संपला. इग्लंडनं हे लक्ष्य नवव्या षटकात चार गडी गमावून साध्य केलं.
****
दरम्यान, भारत - इंग्लंड यांच्यातल्या स्थगित कसोटी मालिकेतला पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना पुढील वर्षी जुलैमध्ये होणार आहे. गेल्या
महिन्यात इंग्लंड इथं सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान, भारतीय
संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह संघाच्या मार्गदर्शक फळीतील काही
सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे पाचवा सामना रद्द करण्यात आला होता. हा सामना
मँचेस्टरऐवजी एजबॅस्टन इथं खेळवण्यात येणार असल्याची माहिती
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने दिली आहे. या कसोटी मालिकेत भारतीय संघ चार कसोटी सामन्यांनंतर २-१ अशा फरकानं आघाडीवर आहे.
****
हवामान -
विदर्भात अनेक ठिकाणी किमान तापमानात
सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. येत्या दोन दिवसांत कोकणात तुरळक ठिकाणी
पावसाची शक्यता असून, राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज
आहे.
//**********//
No comments:
Post a Comment