Tuesday, 5 October 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 October 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 October 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ऑक्टोबर २०२१ सायंकाळी ६.१०

****

गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-१९ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

***

·       अर्थसंकल्पातील योजना आणि विकासकामांचा नागरिकांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सजग राहून पाठपुरावा करावा - मुख्यमंत्र्यांचं आवाहन

·       विधानसभेच्या देगलूर मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून जीतेश रावसाहेब अंतापूरकर यांना उमेदवारी जाहीर

आणि

·       शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठिकठिकाणी आंदोलन

****

अर्थसंकल्पातील योजना आणि विकासकामांचा अधिकाधिक लाभ आपापल्या मतदारसंघातील नागरिकांना मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सजग राहून पाठपुरावा करावा, आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. विधिमंडळ सदस्यांसाठी अर्थसंकल्प या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. अर्थसंकल्पातील बाबी ठरल्याप्रमाणे अंमलात आणण्याची तसंच अर्थसंकल्प समजून घेऊन त्यावर नेमकं बोलण्याची गरज व्यक्त करत, सर्वसामान्य नागरिक हे विधानमंडळाच्या अधिवेशनावर लक्ष ठेवून असतात, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. कोविड काळात महाराष्ट्राने अतिशय वेगाने आणि मोठ्याप्रमाणात आरोग्य सुविधांची उभारणी केली, या आरोग्यसुविधा व्यवस्थित सुरु राहतील याची काळजी घेण्याची आवश्यकताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

****

राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपचारांसाठी दाखल रुग्णांची एकत्रितपणे माहिती मिळावी आणि महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संशोधनाकरिता मदत व्हावी या दृष्टीने एक पोर्टल तयार करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली. ते आज मंत्रालयात बोलत होते. या पोर्टलमुळे उपचारपध्दतीची एसओपी तयार करणे शक्य होईल आणि याचा फायदा राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या जनतेसही होणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.

दरम्यान, वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील शिक्षकांप्रमाणेच आयुर्वेद आणि युनानी शिक्षकांना समान व्यवसाय रोध भत्ता देण्यात येण्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक असून, याबाबतची पुढील कार्यवाही करण्यासाठी आयुर्वेद संचालनालयाने पुढाकार घ्यावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी दिले. शासन अनुदानित १६ आयुर्वेद आणि ३ युनानी महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या अडचणीसंदर्भातल्या बैठकीत ते आज बोलत होते. या महाविद्यालयांमध्ये ६२२ मंजूर पदांपैकी अनेक पदं रिक्त आहेत, या रिक्त पदांवर भरती कशा पध्दतीने करण्यात येईल याबाबतचा आराखडा सादर करण्याच्या सूचनाही देशमुख यांनी केल्या.

****

विधानसभेच्या देगलूर मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जीतेश रावसाहेब अंतापूरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे महासचिव मुकूल वासनिक यांनी याबाबतचं पत्र आज जारी केलं. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानं रिक्त झालेल्या या जागेसाठी येत्या तीस तारखेला मतदान होणार आहे. भारतीय जनता पक्षानं या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

****

राज्यात आज धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर आणि पालघर जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान झालं. नंदूरबार जिल्ह्यात ५४ पूर्णांक ३० शतांश टक्के, पालघर जिल्ह्यात दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ५१ पूर्णांक १५ शतांश टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. वाशिम जिल्ह्यात दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ४७ पूर्णांक ८२ शतांश टक्के मतदान झालं असून नागपूर जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्हा परिषदेच्या १६ मतदारसंघात ५० पूर्णांक ५१ शतांश टक्के तर पंचायत समितीच्या ३१ मतदारसंघात ५० पूर्णाक २१ शतांश टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात वसमत रस्त्यावर औद्योगिक वसाहत परिसरातील महावितरण कंपनीच्या उपकेंद्रावर आज दुपारी वीज कोसळली. उच्च दाबाच्या वीज वाहक तारांवरच वीज कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. मात्र, सुदैवानं कोणतीही हानी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, परभणी शहरासह परिसरात आज दुपारनंतर मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणातून केल्या जाणाऱ्या पाणी विसर्गात वाढ करण्यात आली आहे. सध्या धरणाचे अठरा दरवाजे २ फुटाने उघडून सुमारे ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे.

****

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज परभणी, जालना, यवतमाळ, सोलापूर आणि औरंगाबाद इथं आंदोलन करण्यात आलं.

परभणी जिल्ह्यात परळी गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गावरील वंदन पाटी परिसरात शेतकऱ्यांनी आज सकाळी रास्तारोको आंदोलन केलं. सोनपेठ तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटेपर्यंत अधिकाऱ्यांना डांबून ठेवणार असल्याचा शारा शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधीर बिंदू यांनी दिला. या आंदोलनात परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****

जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या युवा शेतकरी संघर्ष समितीच्यावतीनं आज घनसावंगी तहसील कार्यालयावर हलगी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली पिके बैलगाडीमध्ये भरून तहसील कार्यालयासमोर आणून ठेवली.अतिवृष्टीमुळे बाधित पिकांचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, विनाअट पीकविमा मंजूर करावा, पावसामुळे वाहून गेलेले, रस्ते पूल तातडीनं दुरुस्त करावे आदी मागण्या शेतकऱ्यांनी यावेळी निवेदनाद्वारे केल्या. या मोर्चात तरुण शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

****

अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने न्याय द्यावा अशी मागणी करीत यवतमाळचे शिवसेना आमदार संजय राठोड यांच्या मतदारसंघात शिवसैनिकांनी मोर्चा काढला. राज्य शासनाने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी दारव्हा, दिग्रस आणि नेर तालुक्यातल्या शिवसैनिकांनी केली. शेतकऱ्यांप्रती सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं. शासकीय विभागाचे पंचनामे करण्यात वेळ जावू नये म्हणून शिवसेनेने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल भरून प्रशासनाकडे सादर केला.

****

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपी मिळावा, या मागणीसाठी आज सोलापूर इथं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ऊस मोर्चा काढण्यात आला. रयत क्रांती पक्षाचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

****

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनानं तातडीनं मदत करावी, या मागणीसाठी एका युवकानं औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयाजवळच्या सलीम अली सरोवरात आंदोलन केलं. मंगेश साबळे असं या युवकाचं नावं असून, तो प्रहार युवक संघटनेच्या फुलंब्री शाखेचा तालुकाध्यक्ष आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

****

अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यात मुळा नदीवर अंघोळीसाठी गेलेले दोन किशोरवयीन मुलं वाहून गेले. १४/१५ वर्ष वयोगटातली ही मुलं सख्खे भाऊ असल्याचं समजतं. बचाव पथकाकडून या दोघांचा शोध सुरू आहे.

 

//***************//

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment