Saturday, 2 October 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.10.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 ०२ ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५२वी जयंती आज साजरी होत आहे. त्यानिमित्त देशात आणि परदेशातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचीही आज जयंती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत महात्मा गांधी यांचं समाधीस्थळ राजघाट आणि शास्त्रीजींचं समाधीस्थळ विजय घाट इथं पुष्पांजली अर्पण केली. 

गांधीजींनी अहिंसा हे तत्त्वज्ञान, तत्त्व आणि अऩुभव म्हणून मानलं आणि अहिंसेचा समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग होऊ शकतो असं सांगितलं, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. गांधीजींचं आयुष्य देशासाठी प्रकाशाचा किरण असून, ते देशाच्या प्रगतीसाठी मार्ग दाखवत आहे, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामपंचायती, पाणी समित्या आणि ग्रामजल समित्यांच्या प्रतिनिधींसोबत दूरदृय प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. या जलजीवन मिशनअंतर्गत असलेल्या विविध योजनांमध्ये पारदर्शकता राहावी आणि उत्तरादायित्व यावं यासाठी संबंधितांमध्ये जागरुकता वाढावी यासाठी पंतप्रधान जलजीवन मिशन ऍपचं आणि राष्ट्रीय जलजीवन कोशाचंही उद्घाटन करणार आहेत. ग्रामीण भागातली घरं, शाळा, अंगणवाडी केंद्रं, आश्रमशाळा आणि इतर संस्थांमध्ये नळजोड उपलब्ध करून देण्यासाठी, देशातली किंवा देशाबाहेरची प्रत्येक व्यक्ती, संस्था, कंपनी या कोशासाठी देणगी देऊ शकते. जलजीवन मिशन योजनेसंदर्भात देशभर आज ग्रामसभाही आयोजित केल्या जाणार आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस झाला. सुखना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. औरंगाबाद शहरातही सखल भागात पाणी साचलं आहे. जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातून ८९ हजार ६०४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

****

भारत जागतिक महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारताच्या तानिया सचदेवनं जॉर्जियाच्या मेरी अराबिझे हिचा दोन पूर्णांक पाच विरुध्द एक पूर्णांक पाच असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. 

****

No comments:

Post a Comment