Tuesday, 5 October 2021

TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 05.10.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 October 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यात आज धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर आणि पालघर जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होत आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये शांततेत मतदान सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

धुळे जिल्हा परिषदेच्या १४ गट आणि पंचायत समितीच्या २८ गणांसाठी पहिल्या टप्प्यात एकुण नऊ पूर्णांक ७४ टक्के मतदान झालं. जिल्ह्यातल्या ५५२ केंद्रावर मतदान सुरु आहे.

नंदुरबार जिल्ह्यात साडे अकरा वाजेपर्यंत २५ पूर्णांक ५९ टक्के मतदान झालं.

नागपूर जिल्हयात पहिल्या फेरीमध्ये जिल्हा परिषदसाठी दहा पूर्णांक ५० टक्के, तर पंचायत समितीसाठी दहा पूर्णांक ९४ टक्के मतदान झालं.

या सर्व ठिकाणी उद्या मतमोजणी होणार आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर - बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यासंदर्भातलं पत्रक पक्षानं आज जारी केलं.

****

देशातल्या १२ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरण मोहिमेत, सहव्याधी असलेल्या मुलांचं लसीकरण प्रथम करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यानंतर निरोगी मुलांचं लसीकरण करण्यात येईल, असं राष्ट्रीय लसीकरण सल्लागार गटाचे अध्यक्ष डॉ एन के अरोरा यांनी म्हटलं आहे. सध्या अशा सहव्याधी असलेल्या मुलांची यादी करण्याचं काम सुरु असून, ती लवकरच जनतेला उपलब्ध होईल असं ते म्हणाले.

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ९१ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात ७२ लाख ५१ हजार ४१९ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या ९१ कोटी ५४ लाख ६५ हजार ८२६ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या १८ हजार ३४६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २६३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी ३८ लाख ५३ हजार ८४८ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ४९ हजार २६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल २९ हजार ६३९ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी ३१ लाख ५० हजार ८८६ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ५२ हजार ९०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

महाराष्ट्र जनुक कोष कार्यक्रम राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असून, या कार्यक्रमामधून देशाला दिशा दाखवण्याची अभिमानास्पद कामगिरी केली जात असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या वतीनं महाराष्ट्र जनुक कोष कार्यक्रम प्रकल्पाचा कार्यपूर्ती अहवाल काल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र जनुक कोषाचं काम अव्याहतपणे सुरु राहावं यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात कायमस्वरुपी तरतूद करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

****

प्रत्येक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी जिल्हा स्तरावर ग्रामसेवकांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करून, ऊसतोड कामगारांची नोंदणी प्रक्रिया तातडीनं पूर्ण करून घ्यावी, अशी सूचना, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. बीड इथं ऊसतोड कामगारांची डिजिटल पद्धतीने नोंदणी करून त्यांना तात्काळ ओळखपत्र देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या, 'ई-ऊसतोड कल्याण' या ॲपचं लोकार्पण काल मुंडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. हे ॲप प्रायोगिक तत्वावर बीड जिल्ह्यातल्या कामगारांची नोंदणी कमीत कमी वेळेत करण्यासाठी तयार करण्यात आलं असून, यानंतर संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यातल्या बेलदरी इथं नाल्याच्या पुरात २५ ते ३० गायीचा कळप वाहून गेला. पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पाऊस झाल्यानं आधीच ओसंडून वाहणाऱ्या नाल्यात पाण्याचा प्रवाह वाढला, ज्याचा अंदाज गुराख्याला आला नाही. परिणामी पाण्यात उतरलेली जनावरे एकेक करता वाहू लागली. जनावरांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे.

****

नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका लाल कांद्यांला बसल्यानं उन्हाळ कांद्याचे भाव वाढले आहे. काल चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आणि कांद्याला तीन हजार ७७१ रुपये उच्चांकी भाव मिळाला. पावसामुळे देशांतर्गत बाजारपेठेत दक्षिणेकडील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमधून नवीन लाल कांदा उशिरा दाखल होणार आहे.

****

पेरूमध्ये लिमा इथं सुरु असलेल्या आय एस एस एफ जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पुरुष गटात ५० मीटर थ्री पोजिशन प्रकारात भारताच्या ऐश्वर्य प्रतापसिंह तोमरनं सुवर्ण पदकाची कमाई करत, जागतिक विक्रमाची नोंद केली. महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताची नेमबाज नाम्या कपूर हिनं सुवर्ण पदक पटकावलं. याच प्रकारात ऑलिम्पिकपटू मनू भाकेरनं कांस्य पदक जिंकलं.

****

No comments:

Post a Comment