Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 October 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६
ऑक्टोबर
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता
नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप
कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित
अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ
धुवा. तरीही कोविड-19ची लक्षणं आढळली तर लगेच
विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे
इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११-
२३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य
स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
अर्थसंकल्पातल्या योजना आणि विकास कामांचा अधिकाधिक लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी, लोकप्रतिनिधींनी सजग राहून पाठपुरावा करण्याचं मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांचं आवाहन
·
राज्यातील
सहा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील पोटनिवडणुकींच्या मतदानाची
आज मोजणी
·
देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसची जीतेश
अंतापूरकर यांना उमेदवारी
·
पेट्रोलच्या दरात प्रतीलिटर २५तर डिझेलच्या दरात प्रतीलिटर ३०
पैशांची वाढ
·
राज्यात दोन हजार ४०१
नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात
तीन जणांचा मृत्यू तर ९३ बाधित
आणि
·
राज्यातली धार्मिक आणि
प्रार्थना स्थळं उद्यापासून भाविकांना
दर्शनाकरता खुली
****
अर्थसंकल्पातल्या योजना आणि विकास कामांचा अधिकाधिक लाभ
आपापल्या मतदारसंघातल्या नागरिकांना मिळवून देण्यासाठी, लोकप्रतिनिधींनी सजग राहून पाठपुरावा करावा, असं
आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. विधिमंडळ
सदस्यांसाठी 'राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदारसंघाच्या
संदर्भात', या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचं
उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते
बोलत होते. अर्थसंकल्पातल्या बाबी ठरल्याप्रमाणे अंमलात
आणण्याची तसंच अर्थसंकल्प समजून घेऊन त्यावर नेमकं बोलण्याची गरज व्यक्त करत,
सर्वसामान्य नागरिक हे विधानमंडळाच्या अधिवेशनावर लक्ष ठेवून असतात, याकडे
मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. कोविड काळात महाराष्ट्रानं अतिशय
वेगानं
आणि मोठ्याप्रमाणात आरोग्य सुविधांची उभारणी केली, या आरोग्यसुविधा व्यवस्थित सुरु
राहतील याची काळजी घेण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त
केली.
****
राज्यात धुळे, नंदुरबार, अकोला,
वाशीम, नागपूर आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांमधल्या ८४, तर
त्याअंतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांमधल्या १४१ रिक्तपदांच्या
पोटनिवडणुकांसाठी, काल सुमारे ६३ टक्के मतदान झालं. धुळे तसंच नागपूर प्रत्येकी ६० टक्के, तर पालघर, नंदूरबार
तसंच वाशिम जिल्ह्यात प्रत्येकी ६५ टक्के मतदानाची नोंद झाली. या सर्व ठिकाणी आज सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होईल.
****
देगलूर
विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं जीतेश रावसाहेब अंतापूरकर
यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे महासचिव मुकूल वासनिक यांनी याबाबत एक पत्र
जारी करून माहिती दिली. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानं रिक्त झालेल्या या जागेसाठी
येत्या तीस तारखेला मतदान होणार आहे. भारतीय जनता पक्षानं या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे
माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
दरम्यान,
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काल कोंडलवाडी इथं अंतापूरकर यांच्यासाठी
प्रचार सभा घेतली.
****
पेट्रोल
आणि डिझेलच्या दरात काल पुन्हा एकदा वाढ झाली. पेट्रोलच्या दरात प्रतीलिटर २५ पैशांनी,
तर डिझेलच्या दरात प्रतीलिटर ३० पैशांनी वाढ झाली आहे. २०१४ नंतरची ही सर्वाधिक वाढ
आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर प्रतीलिटर १०८ रुपये ६७ पैसे इतका झाला आहे.
****
अमेरिकेच्या
ॲमेझॉन कंपनी कडून केंद्र सरकारला शुल्काच्या स्वरुपात साडे आठ हजार कोटी रुपये मिळाले
आहेत. हे पैसे केंद्र सरकारने कुठे खर्च केले याबाबत केंद्रीय गुन्हे अन्वेषण -सीबीआय
आणि न्यायाधिशांद्वारे चौकशी होणं गरजेचं असल्याचं, राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार
रजनी पाटील यांनी म्हटलं आहे. त्या काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या.
ॲमेझॉन कंपनीमुळे छोटे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. कोविड काळात अनेक छोट्या व्यावसायिकांना
आपला व्यवसाय बंद करावा लागला. याला जबाबदार कोण?, असा प्रश्नही पाटील यांनी यावेळी
उपस्थित केला.
अतिवृष्टीनं
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी. यासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय
वडेट्टीवार प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार असल्याचं आश्वासनही त्यांनी
यावेळी दिलं.
****
राज्यात काल दोन हजार ४०१ नवे
कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ६४ हजार, ९१५ झाली आहे. काल ३९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार २७२ झाली असून,
मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल दोन हजार ८४० रुग्ण बरे झाले, राज्यात
आतापर्यंत ६३ लाख ८८ हजार ८९९ रुग्ण,
कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा
दर ९७ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे.
****
मराठवाड्यात काल ९३ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृतांमध्ये औरंगाबाद, बीड आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी
एका रुग्णाचा समावेश आहे.
उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी २८
नवे रुग्ण आढळले. औरंगाबाद १६, परभणी आठ, लातूर सात, जालना
चार, तर नांदेड जिल्ह्यात दोन रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला
नाही.
****
अहमदनगर
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, नगरहून औरंगाबादला येणाऱ्या प्रत्येक
बसमधल्या प्रवाशाची कोविड चाचणी करण्यात येणार आहे. औरंगाबाद महानगर पालिकेचे आरोग्य
वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी ही माहिती दिली. यासाठी नगर नाक्यावर पूर्णपणे
नाकाबंदी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांच्या
विविध मागण्यांसाठी काल परभणी, जालना, यवतमाळ, सोलापूर आणि औरंगाबाद इथं आंदोलन करण्यात
आलं.
परभणी जिल्ह्यात परळी गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गावरील वंदन पाटी परिसरात शेतकऱ्यांनी काल सकाळी रास्तारोको आंदोलन केलं.
सोनपेठ तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटेपर्यंत
अधिकाऱ्यांना डांबून ठेवणार असल्याचा इशारा
शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधीर बिंदू
यांनी दिला. या आंदोलनात परिसरातले शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या युवा शेतकरी संघर्ष
समितीच्यावतीनं काल घनसावंगी तहसील कार्यालयावर हलगी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात
सहभागी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली पिकं बैलगाडीमध्ये भरून तहसील कार्यालयासमोर
आणून ठेवली. अतिवृष्टीमुळे बाधित पिकांचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक
मदत द्यावी, विनाअट पीकविमा मंजूर करावा, पावसामुळे वाहून गेलेले, रस्ते पूल तातडीनं
दुरुस्त करावे, आदी मागण्या शेतकऱ्यांनी यावेळी निवेदनाद्वारे केल्या. या मोर्चात तरुण
शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
****
अतिवृष्टीने
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनानं तातडीनं मदत करावी, या मागणीसाठी एका युवकानं
औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयाजवळच्या सलीम अली सरोवरात आंदोलन केलं. मंगेश
साबळे असं या युवकाचं नावं असून, तो प्रहार युवक संघटनेच्या फुलंब्री शाखेचा तालुकाध्यक्ष
आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात
तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, जिल्ह्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यातल्या
सर्व ७३७ गावांची
नजर आणेवारी ५० पैशापेक्षा कमी असल्यानं, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून, सर्व
अनुषंगिक सवलती आणि
आर्थिक सहकार्य देण्यात यावं, असं
पाटील यांनी म्हटलं आहे.
****
अतिवृष्टीमुळे नुकसान
झालेल्या पिकांचे पंचनामे जिल्ह्यातल्या
अधिकारी, कर्मचारी आणि पीक विमा कंपन्यांनी प्रामाणिक
करण्याच्या सूचना, परभणी जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिल्या आहेत. हे पंचनामे तातडीनं व्हावेत यासाठी टाकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्ह्यातल्या ग्रामसेवकांच्या काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, उडीद,
मूग अशा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं
त्यांनी नमूद केलं.
****
घटस्थापनेच्या मुहूर्तावर
राज्यातली धार्मिक स्थळं, आणि
प्रार्थना स्थळं उद्यापासून भाविकांना
दर्शनाकरता खुली करण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंढरपूर इथल्या विठ्ठल-रुक्मिणी
मंदिर समितीची काल बैठक झाली. दररोज १० हजार भाविकांना मुखदर्शन देण्याचा निर्णय
या बैठकीत घेण्यात आला.
****
शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दररोज १५ हजार भाविकांना दर्शनासाठी
प्रवेश दिला जाणार आहे. यात पाच हजार ऑनलाईन, पाच हजार सशुल्क पास आणि पाच हजार भक्तांना
शिर्डीत ऑफलाईन मोफत दर्शन पास मिळतील. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री
बानायत यांनी ही माहिती दिली. ६५ वर्षांवरील नागरिक तसंच १० वर्षांखालील बालकांना मंदिरात
प्रवेश मिळणार नाही. मंदिरात फुल हार प्रसाद घेऊन जाण्यास मनाई आहे. साई मंदिराचं भक्तनिवास
सुरू होणार असल्याचं बानायत यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगड इथं उद्यापासून सुरू होत
असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी काल माहूर इथं बैठक
घेतली. नवरात्रोत्सव सोहळा पाहण्यासाठी
लोकांनी गर्दी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं.
जालना जिल्ह्यातलं राजूर इथलं श्री राजुरेश्वर गणपती मंदिर
उद्यापासून भाविकांसाठी खुलं होणार असून, मंदिर परिसरात साफसफाई करण्यासह आवश्यक नियोजन केलं जात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यात वसमत रस्त्यावर औद्योगिक वसाहत परिसरातल्या महावितरण कंपनीच्या उपकेंद्रावर, काल दुपारी वीज कोसळली. उच्च दाबाच्या वीज वाहक
तारांवरच वीज कोसळल्यानं वीजपुरवठा खंडित झाला. मात्र सुदैवानं कोणतीही हानी झाली नसल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी शहरासह परिसरात काल दुपारनंतर मेघगर्जनेसह जोरदार पाऊस
झाला. जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातल्या साटला शिवारात काल दुपारी अंगावर वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर एक शेतकरी गंभीर जखमी झाल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
सोनपेठ तालुक्यातच वाण नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या एका १२ वर्षीय मुलाचा काल पाण्यात बुडून मृत्यू झाला. मित्रांसोबत पोहायला गेलेल्या या
मुलाला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो नदीच्या
प्रवाहात वाहून गेला. सुमारे दीड तासानंतर त्याचा मृतदेह सापडला.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथलं जायकवाडी धरण जवळपास ९९ टक्के
भरलं आहे. त्यामुळे धरणातून केल्या जाणाऱ्या पाणी विसर्गात वाढ करण्यात आली आहे. सध्या
धरणाचे अठरा दरवाजे चार फुटानं, आणि नऊ दरवाजे अर्ध्या फुटानं उघडून, सुमारे ८० हजार
१७२ दसलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे.
****
हवामान -
मराठवाड्यात
पुढच्या दोन आठवड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता परभणीच्या वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या, हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या शनिवापर्यंत विभागातल्या
सर्वच जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला
आहे.
****
No comments:
Post a Comment