Thursday, 7 October 2021

TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 07.10.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 ०७ ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ३५ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पंतप्रधान मदत निधी अंतर्गत ऑक्सिजन संयंत्रं राष्ट्राला समर्पित करणार आहेत. उत्तराखंड मधल्या ऋषिकेश इथं हा कार्यक्रम होणार आहे. यामुळे देशातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये पीएसए ऑक्सिजन संयंत्रं उपलब्ध होणार आहेत.

****

शारदीय नवरात्रोत्सवाला आज घटस्थापनेपासून प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, कोविड पार्श्वभूमीवर बंद असलेली राज्यातली धार्मिक स्थळं आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुली झाली आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथल्या साईबाबा मंदीरात भाविक येण्यास सुरुवात झाली आहे. शिर्डी ग्रामस्थांकडून आलेल्या भाविकांचं स्वागत करण्यात येत आहे.

****

फटाक्यांवर लावलेल्या निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारांना दिले आहेत. पर्यावरणस्नेही हरित फटाक्यांच्या नावाखाली, जुनेच फटाके विकले जात असल्याप्रकरणी दाखल एका जनहित याचिकेवर काल सुनावणी झाली. आयुष्याचं मोल देऊन सण साजरे करण्याची परवानगी देऊ शकत नसल्याचं, सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं.

****

एकमेकांच्या प्रतिमा असलेले रेणू शोधणाऱ्या दोघा शास्त्रज्ञांना यंदाच्या रसायनशास्त्राच्या नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. बेंजामिन लिस्ट आणि ब्रिटॉन डेव्हिड मॅकमिलन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या सईदा कॉलनी इथं राहणाऱ्या सैफ शाह समीर शाह या १३ वर्षाच्या मुलाचा, खाम नदीत बुडून मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत, फुलंब्री तालुक्यात वानेगाव इथल्या गिरीजा नदीत, दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. गौरव आणि विजय पचवणे अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्या सोबत असलेला सहा वर्षाचा निलेश शेजुळ याचा सायंकाळपर्यंत शोध लागला नसल्याचं, औरंगाबाद अग्निशमन दलानं सांगितलं.

****

बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा नजीक पारस फाट्याजवळ काल खामगाव- अकोला रस्त्यावर राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात बसला मोठी आग लागून, १७ प्रवासी गंभीर जखमी झाले.

****

No comments:

Post a Comment