Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 October 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८
ऑक्टोबर
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत,
आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात
गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे
विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा,
सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-१९ची लक्षणं आढळली
तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही
काळजी घ्या. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि
१०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी
संपर्क करू शकता.
****
·
प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वैद्यकीय महाविद्यालय असेल यासाठीही सरकार प्रयत्नशील-
पंतप्रधान नरेंद्र मोदी
·
औरंगाबाद, नांदेड आणि कोल्हापूर विमानतळांवर अधिक क्षमतेनं हवाई वाहतूक सेवा
सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी
·
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या कंपन्यांवर आयकर
विभागाचे छापे
·
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यासाठी आजपासून कवच कुंडल
अभियान`
·
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २८ टक्के करण्याचा निर्णय
·
शारदीय नवरात्रोत्सवाला घटस्थापनेनं प्रारंभ, धार्मिक स्थळं भाविकांना दर्शनासाठी
खुली
आणि
·
राज्यात दोन हजार ६८१ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात चार जणांचा
मृत्यू तर ९३ बाधित
****
प्रत्येक जिल्ह्यात किमान
एक वैद्यकीय महाविद्यालय असेल यासाठीही सरकार प्रयत्नशील असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. उत्तराखंडच्या ऋषिकेश इथून, विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या
ऑक्सीजन निर्मिती संयत्रांच, दूरदृश्यप्रणालीद्वारे लोकार्पण काल त्यांच्या हस्ते झालं.
त्यावेळी ते बोलत होते. यामध्ये राज्यातल्या उस्मानाबाद, हिंगोली, पुणे आणि गोंदिया
जिल्ह्यातल्या प्रकल्पांचा समावेश आहे. यामुळे आता देशातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये
किमान एक ऑक्सीजन निर्मिती संयंत्र उपलब्ध झालं आहे. लोकार्पण होत असलेली ऑक्सिजन निर्मिती
संयंत्र हे आपल्या सेवाभावाचं, एकात्मतेचं आणि कौशल्याचं प्रतिक आहे, असं पंतप्रधान
यावेळी म्हणाले.
हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा
बाळापूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात, तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा उपजिल्हा रुग्णालयात
पंतप्रधान सहाय्यता निधीतून उभारण्यात आलेल्या प्राणवायू निर्मिती प्रक्लपाचं पंतप्रधांनानी
यावेळी लोकार्पण केलं. आखाडा बाळापूरमध्ये आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते, तर उस्मानाबाद
इथं आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते या प्रकल्पांचं उद्घाटन झालं.
****
औरंगाबाद, नांदेड आणि कोल्हापूर
विमानतळांवर अधिक क्षमतेनं हवाई वाहतूक सेवा सुरू व्हावी, तसंच त्यातून पर्यटक आणि
नियमित प्रवाशांची संख्या वाढावी, अशी अपेक्षा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त
केली आहे. राज्यातल्या विविध विमानतळांच्या विकासाबाबत तसंच त्यातल्या अडचणी सोडवण्यासंदर्भात,
नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा
केली. नागपूर, जळगाव, अकोला, सोलापूर, गोंदिया, जुहू, अमरावती, इथली हवाई वाहतूक आणि
दळणवळण वाढवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यात राज्य शासन आणि नागरी हवाई वाहतूक
मंत्रालयादरम्यान समन्वय अधिक वाढवणं, तसंच कालबध्द रीतीनं काम करण्यावरही, या बैठकीत
चर्चा झाली.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या बारामती, कोल्हापूर इथल्या कंपन्यांवर आयकर विभागानं
काल छापे टाकले. माझे नातेवाईक म्हणून जर आयकर विभागानं छापे टाकले असतील, तर कुठल्या
स्तरावर जाऊन केंद्रीय संस्थांचा वापर केला जातोय, याचा जनतेनं विचार करावा, अशी प्रतिक्रिया
अजित पवार यांनी दिली आहे. आयकर विभागानं अन्य कंपन्यांवर धाडी टाकल्या त्याबद्दल आपल्याला
खेद नाही, पण ज्यांचा काही संबंध नाही, आणि ते केवळ माझे नातेवाईक आहेत, म्हणून त्यांच्या
कंपन्यांवर छापे टाकणं योग्य नाही, असं ते म्हणाले. आपल्या सर्व कंपन्या वेळोवेळी सर्व
कर भरतात, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.
****
राज्यातल्या कोरोना विषाणू
संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणाला आणखी गती यावी, यासाठी आजपासून सात दिवस, `कवच कुंडल
अभियान` राबवण्यात येणार आहे. या अभियानात राज्यात दररोज १५ लाखांहून अधिक लसीकरण करण्याचं
उद्दिष्ट असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. या संदर्भातल्या आयोजित
बैठकीत ते म्हणाले...
आपल्या राज्याला एकूण नऊ कोटी १५ लाख एव्हढं आपल्याला 1st डोस आणि
2nd डोस दोन्ही करायचे आहेत. तर
यापैकी सहा कोटी लस पहिली डोस झालेली आहे. याचा अर्थ 1st डोस मध्ये आपल्याला
आणखीन तीन कोटी वीस लाख एव्हढे लसीकरणाचं उद्दीष्ट आहे. 2nd डोस किती झालेले आहेत तर अडीच कोटी झालेले आहेत.
आता आपल्याला 1st डोसला अधिक प्राधान्य देवून तिसऱ्या वेव्हच्या अनुषंगानं
खुप मोठ्या पद्धतीनं जी आम्हाला सगळ्यांना जी भिती वाटत होती ती निश्चित प्रकारे कमी
होण्यास मदत होईल
राज्यात कोविडमुळे मृत्यू
पावलेल्या प्रत्येक नागरिकांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात
आल्याचं, टोपे यांनी सांगितलं. यासाठी राज्य आपत्ती निवारण निधीतून सुमारे ७०० कोटी
रुपयांची तरतूद
केली जाणार असल्याचं ते म्हणाले.
जिल्हाधिकारी तसंच जिल्हा शल्य चिकित्सकांनी पोर्टलवर मृतांची माहिती भरल्यानंतर, मृतांच्या
नातेवाईकांच्या खात्यात मदतीचे पैसे जमा होतील, असं टोपे यांनी स्पष्ट केलं.
****
राज्य सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांचा
महागाई भत्ता सतरा टक्क्यांवरुन २८ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातला
शासन निर्णय काल जारी करण्यात आला. या निर्णयानुसार एक जुलै २०२१ पासून हा महागाई भत्ता
देय असणार आहे. प्रत्यक्षात मात्र एक ऑक्टोबरपासून तो रोखीनं देण्यात येणार आहे. उर्वरीत
जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश जारी केले जाणार आहेत. सेवानिवृत्त
कर्मचाऱ्यांचाही महागाई भत्ता २८ टक्के करण्यात आला आहे.
****
राज्यात अंमली पदार्थांच्या
विरोधात कारवाईसाठी, प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा
स्तरावर, ‘अंमली पदार्थ विरोधी कक्ष’
निर्माण करण्याचे निर्देश, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले.
मुंबईत काल अंमली पदार्थ विरोधी आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यात अंमली पदार्थांचे
वाढते व्यवहार रोखण्यासाठी गृह विभागानं या व्यवहारात गुंतलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई
करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
शारदीय नवरात्रोत्सवाला काल
घटस्थापनेनं प्रारंभ झाला. त्यासोबतच कोविड पार्श्वभूमीवर बंद असलेली राज्यातली धार्मिक
स्थळं भाविकांना दर्शनासाठी खुली झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं तुळजा भवानी
मंदिरात काल दुपारी संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते
पारंपारिक पद्धतीनं पुजा करून घटस्थापना करण्यात आली.
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा
नागनाथ इथलं प्रसिद्ध आठवं ज्योतिर्लिंग मंदिर, बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथंलं योगेश्वरी
देवीचं मंदीर, नांदेड जिल्ह्यातल्या माहूर इथलं रेणुका माता मंदीर कालपासून खुलं झालं.
****
राज्यात काल दोन हजार ६८१
नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण
संख्या ६५ लाख ७० हजार, ४७२ झाली आहे. काल ४९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार ४११ झाली असून,
मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल दोन हजार ४१३ रुग्ण बरे झाले,
राज्यात आतापर्यंत ६३ लाख ९४ हजार ७५ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून,
कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ३३ हजार ३९७
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ९३ नवीन
कोविड बाधितांची नोंद झाली, तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड
जिल्ह्यातल्या दोन, तर औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश
आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात काल
४० नवे रुग्ण आढळले. बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येकी १७, लातूर १२, जालना तीन,
तर नांदेड आणि परभणी जिल्ह्यात दोन रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग
झालेला एकही रुग्ण आढळला नाही.
****
हिंगोली जिल्ह्यात मंजूर
झालेलं आयुष रुग्णालय आणि मॉडेल कॉलेजच्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. काल
मुंबंई इथं राज्याचे पशुसंवर्धन आणि क्रिडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्यासोबत
झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचं खासदार हेमंत पाटील यांनी सांगितलं.
५० खाटांच्या आयुष रुग्णालयासाठी १५ एकर आणि आदर्श पदवी महाविद्यालया करिता १० एकर
जमीन देण्यास या बैठकीत तात्काळ मंजुरी देण्यात आली.
****
परभणी जिल्ह्यात मूग, उडीद,
सोयाबीनची हमीभावानं खरेदी करण्यासाठी सात खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.
केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्यावतीनं ही केंद्र या शेतमालाची
खरेदी करणार आहे. मूग, उडीद खरेदी करण्यासाठी मंगळवारपासून नोंदणी नोंदणी सुरु झाली
असून सोयाबीन साठी १५ ऑक्टोबरपासून नोंदणी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा
पणन अधिकाऱ्यांनं दिली आहे.
****
स्वातंत्र्य चळवळ हा भारतीय
राष्ट्रवादाचा प्रभावी अविष्कार असला, तरी सामाजिक, धार्मिक, आर्थिक सांस्कृतिक अशा
क्षेत्रांमधूनही राष्ट्रवादाचा अविष्कार दिसून येतो, असं मत, पुण्यातील टिकाराम जगन्नाथ
कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातल्या इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक स्वाती
राजन यांनी व्यक्त केलं आहे.
आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारीत होणाऱ्या आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत, `संघटित राष्ट्रवादाच्या
उदयाची पार्श्वभूमी` या विषयावर व्याख्यान देताना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या...
स्वातंत्र्य चळवळ हा भारतीय राष्ट्रवादाचा प्रभावी अविष्कार असला तरी तो एकमेव
आविष्कार नाही. सामाजिक, धार्मिक, आर्थिक सांस्कृतिक अशा क्षेत्रांमधुनही राष्ट्रवादाचा
अविष्कार दिसून येतो. समाजाच्या वरच्या स्तरांचे कार्य अभ्यासतांना जनसामान्यांची कामगिरी
दुर्लक्षित राहते. आदिवासी, शेतकरी, कामकरी यांनाही आधुनिक भारताच्या इतिहासात महत्वपूर्ण
कामगिरी बजावली आहे. तिची दखल घेऊनच तळाकडून इतिहास अभ्यासण्याची दृष्टी भारतीय इतिहास
लेखनात विकसीत होत गेली.
आज सायंकाळी सहा वाजून ३५
मिनिटांनी आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून हे व्याख्यान प्रसारीत होणार आहे. आकाशवाणी
समाचार औरंगाबाद या युट्युब चॅनेलवरही श्रोत्यांना हे व्याख्यान ऐकता येईल.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड
विभागातील सर्व रेल्वे स्थानकावरील तिकिटांचा दर पूर्ववत दहा रुपये करण्यात आला आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी रोखण्यासाठी
हे दर तात्पुरते वाढवण्यात आले होते. आता हे दर कालपासून पूर्वीप्रमाणे दहा रुपये करण्यात
आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागानं दिली आहे.
****
औरंगाबाद आणि परिसरात काल
संध्याकाळी तसंच रात्री आठ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.
****
हवामान -
येत्या दोन दिवसात कोकण,
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी
पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजेच्या कडकडाटासह
मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment