Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 October 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ ऑक्टोबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
अंतराळ क्षेत्र हे भारतीयांच्या
प्रगतीचं मोठं माध्यम असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी
आज भारतीय अंतराळ संघटनेचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं, त्यावेळी
ते बोलत होते. सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्यमांसाठी सरकार एक स्पष्ट धोरण घेऊन पुढे
जात आहे आणि ज्याठिकाणी सरकारची आवश्यकता नाही, अशी क्षेत्रं खासगी उद्योजकांसाठी खुली
करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. अंतराळ विभाग आणि अंतराळ तंत्रज्ञानाच्या दृष्टीने
भारतात मोठ्या सुधारणा होत असून, भारतीय अंतराळ संघटना त्याचाच एक भाग असल्याचं त्यांनी
नमूद केलं. अंतराळ क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा निर्धार पंतप्रधानांनी यावेळी
व्यक्त केला.
****
उत्तर प्रदेशमधल्या
लखीमपूर खेरी इथल्या हिंसाचार प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यातल्या सत्ताधारी महाविकास
आघाडीनं आज पुकारलेल्या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
औरंगाबाद शहरामध्ये
लखीमपुर रॅली काढून व्यापार्यांना व्यवसाय बंद करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न
बाजार समितीच्या आवारातील पाचही मार्केटमध्ये व्यापा-यांनी बंदला पूर्णपणे पाठिंबा
देत मार्केटमधले व्यवहार बंद ठेवले आहेत. नवी मुंबईतल्या व्यापा-यांनीही आपली दुकानं
बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला आहे. मात्र सार्वजनिक बस, रिक्षा वाहतूक सेवा तुरळक
प्रमाणात सुरू आहेत.
नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव,
पिंपळगाव बसवंत, मनमाड- नांदगाव, देवळा या प्रमुख कांदा लिलाव करणाऱ्या बाजार समित्या
आणि अन्य सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या या बंदमध्ये सहभागी असल्यामुळे, आज कोट्यावधी
रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
रत्नागिरीत बंदला चांगला
प्रतिसाद मिळत आहे. चिपळूणमध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत, तर रत्नागिरीत एक वाजेपर्यंतच
दुकान बंद ठेवण्यात येणार असल्याचं व्यापारी संघटनांनी स्पष्ट केलं आहे.
सातारा जिल्ह्यात अत्यावश्यक
सोडून सर्व दुकानं, खाजगी वाहतूक बंद असून, रस्त्यावर नेहमीपेक्षा कमी गर्दी असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
सोलापूर, पालघर, ठाणे आदी
जिल्ह्यांमध्येही बंद पाळण्यात येत आहे.
****
आंतरराष्ट्रीय बालिका दिवस
आज साजरा करण्यात येत आहे. मुलींच्या हक्कांना मान्यता देणं आणि त्यांच्यापुढील विशिष्ट
आव्हानांबाबत जागरुकतेसाठी दरवर्षी ११ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून
साजरा करण्याचा ठराव संयुक्त राष्ट्र महासभेनं डिसेंबर २०११ मध्ये मंजूर केला होता.
****
देशांतर्गत बाजारपेठेत खाद्यतेलांच्या
किंमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं खाद्यतेलांच्या साठेबाजीवर मर्यादा घालण्याचा
निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत खाद्य तेलांच्या साठवणुकीवर ही मर्यादा
लागू असेल, असं अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं सांगितलं आहेत. या निर्णयामुळे देशभरातल्या
ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलांच्या किमती वाढल्यानंतर
त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही झाला; त्या पार्श्वभूमीवर केंद्रानं साठेबाजीवर
मर्यादा आणली आहे.
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत
भारतानं ९५ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात ४६ लाख ५७ हजार नागरीकांचं लसीकरण
झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या ९५ कोटी १९ लाख ८४ हजार ३७३ मात्रा देण्यात आल्या
आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या
१८ हजार १३२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १९३ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या, तीन कोटी ३९ लाख ७१ हजार ६०७ झाली
असून, या संसर्गानं आतापर्यंत, चार लाख ५० हजार ७८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल
२१ हजार ५६३ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी ३२ लाख ९३ हजार ४७८ रुग्ण, कोरोना
विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख २७ हजार ३४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन
महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याचं वेतन येत्या १० ऑक्टोबर पर्यंत तर
ऑक्टोबर महिन्याचं वेतन दिवाळीपूर्वी द्यावं, तसंच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक
वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एक रकमी दिवाळीपूर्वी द्यावी,
अशी मागणी, इंटकनं केली आहे. या संदर्भात परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील आणि महामंडळाचे
व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्याचं इंटक संघटनेचे
सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी पुण्यात प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल
किक्रेट स्पर्धेमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बगळुरु आणि कोलकत्ता नाईट राइडर्स यांच्यात
उपान्त्य सामना होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment