Monday, 11 October 2021

TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 11.10.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 ११ ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर खेरी इथल्या हिंसाचार प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीनं आज राज्यात बंद पुकारला आहे. राज्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई बंद पाळला जात असून, काल मध्यरात्रीपासून आतापर्यंत आठ बसेसची तोडफोड झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. मुंबईतली दुकानं आणि बाजारपेठा दुपारी चार पर्यंत बंद ठेवण्यात येतील अशी माहिती व्यापारी संघानं दिली आहे. मुंबईतल्या डबेवाल्यांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेना या आंदोलनात पूर्ण ताकतीने उतरेल असं स्पष्ट केलं आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात महाराष्ट्र बंदला काही ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे, तर काही ठिकाणी आस्थापना सुरु आहेत. पाचोड इथं सकाळपासून सर्व व्यापाऱ्यांनी बंद पाळला आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारतीय अंतराळ संघटनेचा आरंभ करणार आहेत. दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून होणार्या या कार्यक्रमात पंतप्रधान अंतराळ उद्योगातल्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. भारतीय अंतरळा संघटना ही अंतरीक्ष आणि उपग्रह कंपन्यांसाठी मुख्य औद्योगिक संघटना राहणार असून, ही संघटना सरकार आणि त्यांच्या संस्थांसह भारतीय अंतरीक्ष विभागाशी सर्व भागधारकांना सल्ला देण्याचं काम करणार आहे.

****

कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेत देशानं ९५ कोटीचा पार केला आहे. लवकरच १०० कोटीच्या लक्ष्याकडे झपाट्यानं वाटचाल सुरु असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम पूर्ण क्षमतेनं सुरु असून, नागरिकांनी आपले कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांना लसीकरणासाठी प्रोत्साहन द्यावं असं आवाहन. त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात केलं आहे.

****

उस्मानाबाद तालुक्यात वाडी बामणी इथला एक आठ वर्षांचा मुलगा काल वीज कोसळून जखमी झाला.

दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात काल सलग तीन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. कापुस पिकासह सोयाबीन, तूर, ऊस ही पिके हातची जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

****

मराठवाड्यात काल ७१ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

****

No comments:

Post a Comment