Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 October 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ ऑक्टोबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
भारत मानवाधिकारांबद्दल अत्यंत
संवेदनशील असून, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारताच्या नैतिक संकल्पांना बळ देत असल्याचं,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या २८ व्या
स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. देशाचं स्वातंत्र्यासाठीचं
आंदोलन हे मानवाधिकाराच्या प्रेरणेचा, मानवाधिकाराच्या मूल्यांचा मुख्य स्रोत असल्याचं
ते म्हणाले. आपण अनेक वर्ष आपल्या अधिकारासाठी लढा दिला, एक राष्ट्र आणि एक समाज म्हणून
अन्यायाला विरोध केला, असं त्यांनी नमूद केलं. आज देश सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास
आणि सबका प्रयास, या मंत्रावर चालत असून, ही एकप्रकारे मानवाधिकार सुनिश्चित करण्याची
मूळ भावना असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. गरिबांना सुविधा देण्यासाठी सरकार घराघरा पर्यंत
पोहचत आहे, दिव्यांग व्यक्तीच्या सशक्तीकरणासाठी अनेक पावलं सरकार उचलत असल्याचं सांगत
पंतप्रधानांनी, मानवाधिकारासाठी सरकारनं केलेल्या कार्याची माहिती दिली.
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत
भारतानं ९५ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात ६५ लाख ८६ हजार ९२ नागरीकांचं
लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या ९५ कोटी ८९ लाख ७८ हजार ४९ मात्रा देण्यात
आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या
१४ हजार ३१३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १८१ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या, तीन कोटी ३९ लाख ८५ हजार ९२० झाली
असून, या संसर्गानं आतापर्यंत, चार लाख ५० हजार ९६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल
२६ हजार ५७९ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी ३३ लाख २० हजार ५७ रुग्ण, कोरोना
विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख १४ हजार ९०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या
व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लसीची तिसरी मात्रा दिली जावी, अशी शिफारस जागतिक आरोग्य
संघटनेनं केली आहे. कोरोना लसीच्या दोन मात्रा देऊनही रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या
व्यक्तींमध्ये पुरेशी प्रतिकार शक्ती निर्माण होण्याची शक्यता कमी असल्यानं, त्यांना
प्राथमिक गरज म्हणूनच तिसरी मात्रा दिली जावी, अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटनेच्या
तज्ज्ञांच्या समितिनं केली असली, तरी सरसकट सगळ्या लोकांना तिसरी मात्रा देण्याची शिफारस
तज्ज्ञांनी केलेली नाही.
****
परभणीचे उपजिल्हाधिकारी रामदास
जगताप यांच्या बदलीच्या मागणीसाठी काल पालम तालुक्यातल्या तलाठ्यांनी तहसील कार्यालयासमोर
निदर्शने केली. ई-फेरफार, ई-चावडी आणि ई-पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी
जगताप यांनी तलाठी संघटनेच्या पदाधिकार्यांना आक्षेपार्ह भाषा वापरत चुकीची वागणूक
दिल्याचं तलाठ्यांनी सांगितलं. जगताप यांची बदली होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच
ठेवण्याचा निर्धार तलाठी संघानं केला आहे.
****
भारतीय स्वातंत्र्याच्या
अमृतमहोत्सवानिमित्त उस्मानाबाद शहरातल्या आर्य चाणक्य विद्यालयात विधी साक्षरता शिबिराचं
आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्ताने विधी सेवा प्राधिकरण कार्यालय ते आर्य चाणक्य
विद्यालयापर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली होती.
****
शारदीय नवरात्र महोत्सवात
आज सहाव्या दिवशी तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात
आली. छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्म रक्षणासाठी श्री तुळजाभवानी मातेनं प्रसन्न
होऊन आपल्या हाताने भवानी तलवार देऊन आर्शीर्वाद दिला म्हणून या दिवशी ही अवतार पूजा
मांडण्यात येते.
****
किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी
नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण भागात पहिल्यांदाच सखी प्रेरणा भवन हा अभिनव उपक्रम राबवण्यात
आला. मासिक पाळीसारख्या विषयावर महिलांमध्ये खुलेपणानं चर्चा होणं ही काळाची गरज असून,
हीच चर्चा सखी प्रेरणा भवन माध्यमातून नंदुरबार तालुक्यातल्या श्रीरामपूर सारख्या लहानश्या
गावातून सुरु झाली आहे. सखी प्रेरणा भवन म्हणजे ग्रामीण पातळीवर महिलांसाठी तयार करण्यात
आलेली एक प्रतिष्ठा खोली आहे. यात महिलांना सॅनिटरी नॅपकिन सोबत त्यांच्याशी निगडीत
समस्यांचं निराकरण देखील होणार आहे. श्रीरामपूर ग्रामपंचायत आणि फिनिश सोसायटी यांच्या
संयुक्त विद्यमानं या सखी प्रेरणा भवनाची संकल्पना साकारली गेली आहे.
****
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी
आणि पुरामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारकडून ५३ कोटी ७५ लाख रुपयांचं अनुदान
प्राप्त झालं आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी ही माहिती दिली. वाळवा,
शिराळा, मिरज, तासगाव आणि पलूस या पाच तालुक्यात शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर
हे अनुदान जमा केलं जाणार आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल
क्रिकेट स्पर्धेत काल शारजा इथं झालेल्या बाद फेरीच्या सामन्यात कोलकता नाइट रायडर्स
संघानं, रॉयल चॅलेंजर बंगळूर या संघाचा चार गडी राखून पराभव केला.
****
No comments:
Post a Comment