Tuesday, 12 October 2021

TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 12.10.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 October 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-19ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      लखीमपूर खेरी प्रकरणाच्या निषेधार्थ सत्ताधारी महाविकास आघाडीनं पुकारलेल्या बंदला मराठवाड्यासह राज्यभरात संमिश्र प्रतिसाद

·      राज्यातील महामार्गांच्या कामासाठी भूसंपादन आणि वन विभागाशी संबंधित अडचणी सोडवण्यासाठी सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सूचना

·      माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातल्या निवासस्थानावर सीबीआयचा पुन्हा छापा

·      राज्यात एक हजार ७३६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात दोन जणांचा मृत्यू तर ७२ बाधि

·      देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीसाठी २१ जणांचे उमेदवारी अर्ज वैध

आणि

·      परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी सर्व दुकानं आणि कार्यालयांसह विविध आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना लसीच्या दोन्ही मात्रा घेणं बंधनकारक

****

उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर खेरी इथल्या हिंसाचार प्रकरणाच्या निषेधार्थ सत्ताधारी महाविकास आघाडीनं काल पुकारलेल्या बंदला मराठवाड्यासह राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

औरंगाबाद इथं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं. लखीमपूर इथल्या मृत शेतकऱ्यांना क्रांती चौक इथं आदरांजली वाहण्यात आली, यावेळी केंद्र सरकार विरोधात निषेध सभाही घेण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात लोहा, अर्धापूर, भोकर, मुदखेड, हिमायतनगर, नायगाव इथंही बंद पाळण्यात आला.

परभणी जिल्हात बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. सोनपेठ शहरात व्यापाऱ्यांनी बंद पाळला नाही. परभणी शहरातल्या बाजारपेठाही नेहमीप्रमाणे खुल्या होत्या. वसमत रोड, जिंतूर रोड आदी भागात काही काळ बाजारपेठा बंद होत्या, तर शाळा, महाविद्यालयं सुरु होती.

जालना जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी जालना शहरातून फेरी काढून व्यापाऱ्यांना आपली दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन केलं. भोकरदन, परतूर, अंबड, घनसावंगी, बदनापूर इथं बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुपारनंतर बहुतांश भागातली दुकानं सुरू करण्यात आली.

हिंगोलीत बंदचं आवाहन केल्यानंतरही काही व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठानं सुरूच ठेवल्याचं दिसून आलं. सेनगांव, वसमत, हिंगोलीत दुपार पर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला, त्यानंतर व्यापारपेठ सुरू झाली.

लातूर जिल्ह्यात बंद उत्स्फुर्तपणे पाळण्यात आला. जिल्ह्यात तालुकानिहाय रॅली काढून सरकारचा निषेध करण्यात आला. या बंदमध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मुंबई, नाशिक धुळे, रायगड, पालघर, वाशिम, यवतमाळ, सोलापूर, वर्धा, सांगली, सातारा, आदी जिल्ह्यातही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

या बंदला राज्यातल्या जनतेनं आणि व्यापाऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचं प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. बंदला विरोध करून भाजपानं आपला खरा शेतकरी विरोधी चेहरा दाखवून दिला आहे. मात्र, राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी कडकडीत बंद पाळून भाजपाला सणसणीत चपराक लगावली आहे, असं ते म्हणाले.

****

आजच्या सरकार-पुरस्कृत बंदची न्यायालयानं दखल घ्यावी आणि झालेल्या नुकसानाची भरपाई राज्य सरकारकडून घ्यावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस यांनी केली. महाविकास आघाडीचा बंद म्हणजे ढोंगीपणाचा कळस असल्याची टीकाही त्यांनी केली. लखीमपूर इथली घटना गंभीर आहे, पण हा बंद ही त्या घटनेबाबत संवेदना नसून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

****

राज्यातील महामार्गांच्या कामासाठी भूसंपादन आणि वन विभागाशी संबंधित अडचणी सोडवण्यासाठी सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा- आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची सूचना, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत राज्यातल्या रस्ते प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पुणे-अहमदनगर- औरंगाबाद ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे, नांदेड-जालना- अहमदनगर- पुणे, अहमदनगर- सोलापूर- अक्कलकोट अशा विविध महामार्गांच्या तसंच रिंगरोडच्या कामांच्या सद्यस्थितीवर यावेळी चर्चा करण्यात आली. भूसंपादन आणि वन विभागाशी संबंधित बाबींमुळे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा लवकरच निर्णय घेऊन ही कामं मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मराठवाड्यातल्या महामार्गांच्या स्थितीविषयी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी सूचना मांडल्या.

****

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातल्या निवासस्थानावर केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं काल पुन्हा छापा घातला. सीबीआयच्या पथकानं काल सुमारे आठ तास देशमुख कुटुंबाची चौकशी करत, काही महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतले. देशमुख गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता आहेत. वारंवार समन्स बजावल्यानंतरही  देशमुख हे चौकशीसाठी हजर होत नसल्यानं त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, असा विनंतीअर्ज सक्तवसुली संचालनालय- ईडीनं, अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दाखल केला होता, न्यायालयानं शुक्रवारी या अर्जाची दखल घेत, देशमुख यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

दरम्यान, नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्या घरासमोर एकत्र येत सीबीआय तसंच ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत काही वेळानंतर सोडून दिलं.

****

ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीकरिता पैशांची मागणी करून, आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास, सबंधितांवर कारवाई करावी, असे आदेश, सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांची लेखी स्वरूपात अशी तक्रार साखर कारखान्याच्या शेती अधिकाऱ्यांकडे आल्यानंतर त्यावर लगेच कार्यवाही करावी, तसंच तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांनी साखर आयुक्तालयाच्या शेतकरी डॉट मदत ॲट द रेट जीमेल डॉकॉम, या ईमेलचा वापर करावा, असंही पाटील यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

****

राज्यात काल एक हजार ७३६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ७ हजार, ६०८ झाली आहे. काल ३६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार ५७८ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल तीन हजार ३३ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६ लाख चार हजार ३२० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ३ हजार ११५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ७२ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात काल २३ नवे रुग्ण आढळले, बीड जिल्ह्यात २२, औरंगाबाद १६, लातूर पाच, तर जालना, नांदेड तसंच परभणी जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.

****

नांदेड जिल्ह्यात देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची काल छाननी करण्यात आली. या छाननीत २१ जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले, तर विक्रम साबणे आणि शीतल अंतापूरकर या दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.

****

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सुधारित मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत. त्यात सर्व दुकानं, कार्यालयं, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहं, मद्यालयं, मॉल मालक आणि इतर आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना, कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसंच ग्राहकांनीही लसीकरण केलेलं असावं, असे निर्देश जिल्हाधिकारी गोयल यांनी दिले आहेत. नियमांचं पालन न करणाऱ्यास पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाईल, असं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी, ग्रामीण भागातले जे नागरिक कोविड १९ ची लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत, अशा नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचं लसीकरण केलं.

पूर्णा तालुक्यातल्या पांगरा ढोणे या ग्रामपंचायतीमध्ये, आझादी का अमृत महोत्सव -स्वच्छता ही सेवा आणि मिशन कवचकुंडल विशेष मोहिम कार्यक्रमानिमित्त, टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण कार्यक्रम राबवण्यात आला. नागरिकांनी वैयक्तिक स्वछता राखावी, घराचा आणि गावाचा परिसर स्वच्छ ठेवावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

बीड जिल्ह्यात कोविड लसीकरणाला गती मिळावी आणि अधिकाधिक नागरिकांना कोविडपासून सुरक्षित करता यावं, या उद्देशानं, मिशन कवचकुंडल अभियानात जिल्हा प्रशासनानं गाव पातळीवर विशेष नियोजन केलं आहे. कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन जनजागृती करण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केलं.

****

देशात आर्थिक विकासाला १५ व्या शतकानंतरच गती मिळाली. व्यावहारिक आर्थिक प्रश्न, अर्थशास्त्र विचाराला प्रेरणा देऊ शकतात. त्याप्रमाणेच ते विचार व्यावहारिक घटनांना नवी दिशा आणि गती देऊ शकतात, असं मत, धुळ्याच्या विद्यावर्धिनी महाविद्यालयातले प्राध्यापक सतीश निकम यांनी व्यक्त केलं आहे. आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत होणाऱ्या आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत, "भारतातील आर्थिक राष्ट्रवादाचा उदय", या विषयावरच्या व्यख्यानात निकम बोलत होते, ते म्हणाले…

व्यवहारिक आर्थिक प्रश्न अर्थशास्त्र विषयक विचाराला प्रेरणा देऊ शकतात. त्याप्रमाणे ते विचार व्यावहारिक घटनांना नवी दिशा आणि गती देऊ शकतात.

कुठल्याही राष्ट्राची आर्थिक विचारधारा त्याचवेळी आर्थिक राष्ट्रवाद म्हटली जाते जेंव्हा ते राष्ट्र आपले अर्थतंत्र, श्रमशक्ती आणि देशांतर्गत भांडवल निर्मितीवर राष्ट्रीय नियंत्रण प्रस्थापित करण्यावर भर देते. आणि गरज भासल्यास त्यासाठी वेग- वेगळे कर लादण्यास ते राष्ट्र जराही कचरत नाही.

आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून आज सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी हे व्याख्यान प्रसारित होईल.

****

हवामान -

येत्या ४८ तासांत कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊ शकतो. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर विदर्भात मात्र हवामान कोरडे राहील.

****

No comments:

Post a Comment