Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 October 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ ऑक्टोबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
आत्मनिर्भर भारताच्या संकल्पासोबत
आपण पुढच्या २५ वर्षांसाठी भारताचा पाया रचत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. प्रधानमंत्री गतीशक्ती या राष्ट्रीय बहुआयामी संपर्क बृहत आराखड्याचा शुभारंभ
केल्यानंतर ते आज बोलत होते. विविध विभागांमधल्या परस्पर समन्वयाच्या अभावामुळे आजवर
देशातल्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीचं काम योग्य रितीनं होऊ शकलं नाही. ही अडचण
दूर करण्यासाठी या बृहत आराखड्याअंतर्गत, महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी,
नियोजनाची विकेंद्रित पद्धत टाळून संस्थात्मक पातळीवर केंद्रित पद्धतीनं संर्वंकष नियोजन
केलं जाणार आहे. हा बृहत आराखडा भारताला बळ, आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेनं
घेऊन जाईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. सरकारनं केवळ वेळेत प्रकल्प पूर्ण
करण्याची कार्यसंस्कृतीच विकसित केली नाही, तर आज निर्धारित वेळेच्या आधी प्रकल्प पूर्ण
होत आहेत, असं ते म्हणाले. आता 'सरकारचा संपूर्ण सहभाग' या दृष्टीकोनासह, सरकार सामूहिक
शक्तीद्वारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी झटत आहे. यामुळे दशकांपासून प्रलंबित असलेले
अनेक प्रकल्प पूर्ण होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भारतमाला, सागरमाला, देशांतर्गत
जलमार्ग, बंदरं आणि उडाण अशा विविध मंत्रालयांच्या योजनांचा अंतर्भाव या बृहतआराखड्यात
केला जाणार आहे. यातून वस्त्रोद्योग, औषध क्षेत्र, संरक्षण, औद्योगिक कॉरिडॉर तसंच
कृषी क्षेत्राची जोडणी वाढणार आहे आणि देशातल्या व्यावसायिकांना अधिक लाभ होणार आहे.
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत
भारतानं ९६ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात ५० लाख ६३ हजार ८४५ नागरीकांचं
लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या ९६ कोटी ४३ लाख ७९ हजार २१२ मात्रा देण्यात
आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या
१५ हजार ८२३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २२६ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या, तीन कोटी ४० लाख एक हजार ७४३ झाली
असून, या संसर्गानं आतापर्यंत, चार लाख ५१ हजार १८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल
२२ हजार ८४४ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी ३३ लाख ४२ हजार ९०१ रुग्ण, कोरोना
विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख सात हजार ६५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
पूर्ण “लसीकरण” झालेल्या
व्यक्तींच्या व्याख्येत राज्य शासनातर्फे सुधारणा करण्यात आली आहे. यात १८ वर्षाखालील
व्यक्ती, तसंच वैद्यकीय कारणामुळे लस न घेऊ शकणाऱ्या व्यक्तींचाही समावेश करण्यात आला
आहे. टाळेबंदीनंतर टप्प्याटप्प्याने विविध सेवा प्रदाता तसंच सेवा प्राप्त करणारे यांच्यासाठी
कामाची परवानगी देण्यात आली असून, त्यांचं पूर्णपणे लसीकरण झालेलं असणं बंधनकारक आहे.
परंतू असं निदर्शनास आलं आहे की, अनेक प्रदाते आणि सेवा घेणाऱ्या लोकांची इच्छा असताना
सुद्धा वैद्यकीय कारणामुळे, किंवा त्यांचं वय अठरा वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे ते
लस घेऊ शकले नाही. अशा नागरिकांना ही सेवा देण्याची किंवा सेवा प्राप्त करण्याची परवानगी
देणं गरजेचे आहे, त्यानुसार लसीकरण झालेल्या लोकांच्या व्याख्येत सुधारणा करण्यात आली
आहे.
****
खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांना आकारलेल्या देयकाचं लेखापरीक्षण गतीने होण्यासाठी कार्यवाही करावी, अशा
सूचना, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. कोरोना एकल पुनर्वसन समिती आणि जन आरोग्य अभियानाच्या प्रतिनिधींनी, काल टोपे यांच्यासमोर विविध मुद्द्यांवर सादरीकरण केलं,
त्यावेळी ते बोलत होते. कोविडमुळे पती गमावलेल्या महिला, खासगी रुग्णालयांमध्ये आकारलेले जादा देयक, खासगी रुग्णालयांमध्ये
लेखापरीक्षणसाठी होणारा विलंब, अशा विविध विषयांकडे यावेळी
लक्ष वेधण्यात आलं.
****
यवतमाळ
लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांच्या विरोधात, भारतीय जनता पक्षाचे नेते
किरीट सोम्मया यांनी केलेल्या तक्रारींवर आधारित चौकशीसाठी, अंमलबजावणी संचालनालयाची
पथकं काल वाशिम जिल्ह्यात तिसऱ्यांदा दाखल झाली. संचालनालयाच्या अधिकाऱ्यांची चार पथकं
सार्वजनिक बांधकाम विभाग, धर्मदाय आयुक्त, मंगरुळपीर आणि रिसोड तालुक्यातल्या देगाव
इथं दाखल झाले आहेत. गवळी यांचे निकटवर्तीय बांधकाम व्यावसायिक सईद खान यांनी जिल्ह्यात
केलेल्या विविध कामाची या पथकांकडून चौकशी सुरू आहे.
****
राष्ट्रपिता
महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनानिमित्त निघालेली भारत ते बांग्लादेश सद्भावना सायकल
यात्रा काल वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमात पोहचली. आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू
आणि मंत्री मुकुंद मस्के यांनी सूतमाळेनं सर्व यात्रेकरुंचं स्वागत केलं. ही यात्रा
आज आनंदवन वरोरा मार्गे नागपूरच्या दिशेनं रवाना झाली.
****
परभणी
जिल्ह्यात गंगाखेड इथं अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणार्या दोघांना पोलिसांनी ताब्यात
घेतलं. त्यांच्याकडून सात लाख ४१ हजार ९९६ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
****
No comments:
Post a Comment