Wednesday, 13 October 2021

TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 13.10.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 १३ ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रधानमंत्री गतीशक्ती या राष्ट्रीय बहुआयामी संपर्क बृहत आराखड्याचा शुभारंभ करणार आहेत. नवी दिल्ल्लीतल्या प्रगती मैदानावर हा कार्यक्रम होईल. विविध विभागांमधल्या परस्पर समन्वयाच्या अभावामुळे आजवर देशातल्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीचं काम योग्य रितीनं होऊ शकलं नाही. ही अडचण दूर करण्यासाठी या बृहत आराखड्याअंतर्गत, महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी, नियोजनाची विकेंद्रित पद्धत टाळून संस्थात्मक पातळीवर केंद्रित पद्धतीनं संर्वंकष नियोजन केलं जाणार आहे. भारतमाला, सागरमाला, देशांतर्गत जलमार्ग, बंदरं आणि उडाण अशा विविध मंत्रालयांच्या योजनांचा अंतर्भाव या बृहतआराखड्यात केला जाणार आहे.

****

देशात आत्तापर्यंत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांची संख्या ९६ कोटी ३३ लाखांच्या पुढे गेली आहे. यापैकी ६८ लाख ३३ हजार जणांना पहिली, तर २७ लाख ३५ हजार जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. देशात काल ४६ लाख २३ हजार लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

****

नांदेड जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या दीडपट पाऊस झाला असून, हा पाऊस रब्बी हंगामातील हरबरा पिकासाठी उपयुक्त ठरणारा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानावरील हरभरा बियाणाचा लक्षांक दुप्पट करावा, तसंच शेतकऱ्यांना हरभरा बियाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावं अशी मागणी, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी एका निवेदनाद्वारे, कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्ल्या यांनी काल मनमाड ते परभणी रेल्वे व्यवस्थेचा आढावा घेतला. औरंगाबाद, जालना, रोटेगाव, नगरसोल आदी रेल्वे स्थानकाला भेट देऊन, त्यांनी सोयीसुविधा तसंच मालवाहतुक व्यवस्थेची पाहणी केली.

दरम्यान, दसरा आणि दिवाळीच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेवून, दक्षिण मध्य रेल्वे अकोला-तिरुपती-अकोला दरम्यान ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात उत्सव विशेष गाडीच्या दहा फेऱ्या चालवणार आहे. ही गाडी वाशीम, हिंगोली, वसमत, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धर्माबाद, निझामाबाद, मार्गे धावणार आहे.

****

No comments:

Post a Comment