Thursday, 14 October 2021

TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 14.10.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 October 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १०० कोटी कोविड प्रतिबंधक लस देण्याचं उद्दिष्ट लवकरच पूर्ण होत आहे. ही उद्दिष्टपूर्ती करण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना आकाशवाणीचा सलाम. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच,णि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारची दहा हजार कोटी रूपयांच्या मदतीची घोषणा; दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जिरायतीसाठी १० हजार, बागायतीसाठी १५ हजार तर बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे मदत मिळणार

·      राज्यातल्या ५६ हजार एकल कलावंतांनाही प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय

·      राज्यातली विद्यापीठं आणि महाविद्यालयीन वर्ग २० ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता

·      राज्यात दोन हजार २१९ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात दोन जणांचा मृत्यू तर ७८ बाधि

·      देगलूर विधानसभा पोट निवडणुकीत जणांची माघार, १२ उमेदवार रिंगणात

आणि

·      नांदेड वाघाळा महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री पावडे यांची बिनविरोध निवड

****

राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रूपयांची मदत करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळानं काल घेतला.

जून ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या या अतिवृष्टीमध्ये ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झालं. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्त्ती निवारण निधी- एनडीआरएफच्या निकषाची वाट न पाहता १० हजार कोटीं रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिरायती शेतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर, तर बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे मदत दिली जाणार आहे. जास्तीत जास्त २ हेक्टर मर्यादेत ही मदत करण्यात येणार आहे.

****

पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्याचा निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मागासवर्गीयांची पदोन्नती आणि सरळ सेवेतील प्रतिनिधींच्या शासन सेवेतील आरक्षणाबाबतच्या अहवालावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र आरक्षण अधिनियम २००१ प्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात आलं असून ते कायम ठेवण्यात यावं, असं मत सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.

****

प्रयोगात्मक कलांवर उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या राज्यातल्या ५६ हजार एकल कलावंतांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या साठी आर्थिक मदत म्हणून २८ कोटी रुपये तर प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील राज्यातल्या ८४७ संस्थांना ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

****

सहकारी संस्थांच्या निवडणूका कोविड- १९ मुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे बऱ्याचशा सहकारी संस्थांच्या समिती सदस्यांना नियमित असल्याचं सरंक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली.

****

अकृषी विद्यापीठं आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील बिगर नेट सेट अध्यापकांना निवृत्तीवेतनाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला. जे अध्यापक २३ ऑक्टोबर १९९२ ते ३ एप्रिल २००० या कालावधीत नियुक्त होते अशांना हे निवृत्तीवेतन देण्यात येईल.

****

राज्यातली कृषी वगळता अन्य सर्व विद्यापीठं, आणि संलग्नित महाविद्यालयातले नियमित वर्ग २० ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल मंत्रालयात पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. हे वर्ग पूर्णपणे की ५० टक्के क्षमतेने सुरु करावे, याबाबत स्थानिक प्राधिकरणांशी विचारविनिमय करुन विद्यापीठांनी आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा, असंही सामंत यांनी सांगितलं आहे. कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेले विद्यार्थी या वर्गांना प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. ज्या विद्यार्थ्यांनी लस घेतलेली नाही, त्यांच्यासाठी विद्यापीठाने संबंधित संस्थांच्या मदतीने, जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवावी, शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचंही लसीकरण प्राधान्याने करुन घ्यावं, असं सामंत यांनी सांगितलं.

****

राज्यात काल दोन हजार २१९ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ८३ हजार, ८९६ झाली आहे. काल ४९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार ६७० झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल तीन हजार १३९ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६ लाख ११ हजार ७५ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २९ हजार ५५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ७८ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर २ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात काल  २९ नवे रुग्ण आढळले, औरंगाबाद २१,  बीड जिल्ह्यात १६, लातूर ०५, नांदेड ३ तर जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.

****

आयकर, गुन्हे अन्वेषण विभाग आणि सक्तवसुली संचालनालय यासारख्या संस्थांचा केंद्र सरकार विरोधी पक्षातले नेते आणि त्यांच्या नातेवाईकांवर दबाव आणण्यासाठी उपयोग करत असल्याचा आरोप राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला आहे. मुंबईत काल ते वार्ताहरांशी बोलत होते. लखीमपूर घटनेची जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

****

शारदीय नवरात्र महोत्सवात काल दुर्गाष्टमीच्या निमित्तानं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी देवीची महिषापूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली.

दरम्यान, काल अष्टमीला वैदिक होम हवनासह मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याहस्ते पूर्णाहुती देण्यात आली. आज महानवमी निमित्त श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा केल्यानंतर अहमदनगरहून येणाऱ्या पलंग पालखीची, रात्री मिरवणूक काढण्यात येणार आहे.

****

कोल्हापूरच्या करवीर संस्थानचा ऐतिहासिक दसरा सोहळा यावर्षी पारंपारिक पद्धतीनं साजरा होणार आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी ही माहिती दिली. कोविड साथीचे नियम पाळून १५ तारखेला सायंकाळी श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी, गुरु महाराज यांच्या पालखीसह हा सोहळा साजरा होणार असल्याचं शाहू महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोट निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या काल शेवटच्या दिवशी एकूण ९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे आता देगलूर विधानसभा पोट निवडणूकीच्या रिंगणात १२ उमेदवार उरले आहेत. यात काँग्रेसचे जितेश अंतापूरकर, भाजपचे सुभाष साबणे, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे विवेक केरूरकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्तम इंगोले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे गटाचे डी. डी. वाघमारे, बहुजन भारत पार्टीचे उमेदवार परमेश्वर शिवदास वाघमारे यांच्यासह सहा अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीसाठी येत्या ३० ऑक्टोबरला मतदान होणार आहे.

****

दरम्यान, नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेस पक्षाच्या जयश्री निलेश पावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पदासाठी पावडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. मोहिनी येवनकर यांनी राजीनामा दिल्यामुळे नांदेडचं महापौरपद रिक्त झालं होतं.

****

लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झालेल्या पाच बालकांचं दायित्व स्वीकारून त्यांच्याशी संबंधितांच्या खात्यावर पाच लाख रुपये शासनातर्फे जमा करण्यात आले आहेत. एकल पालक असलेल्या २८५ बालकांपैकी २०८ बालकांची गृह चौकशी पूर्ण झाली असून उर्वरित बालकांच्या घरी भेटी देवून त्यांच्या सुरक्षेची खात्री करुन घ्यावी, असे आदेश लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी काल यासंदर्भातील बैठकीत दिले.

****

 हवामान -

येत्या २४ तासांत कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र तसंच विदर्भात  हवामान कोरडं राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.

****

No comments:

Post a Comment