Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 October 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ ऑक्टोबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
भारत
सरकारनं चार्टर्ड विमानांद्वारे येणाऱ्या परदेशी पर्यटकांना देशात प्रवेश करण्यास परवानगी
दिली असून, त्यांना कालपासून नवीन पर्यटक व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. कोविड-19
नियमांचं पालन करणं परदेशी पर्यटक आणि त्यांना आणणाऱ्या कंपन्यांना अनिवार्य असल्याचं
गृह मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
देशात
कोविड प्रतिबंधक लसीकरणानं ९७ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल आठ लाख ३६ हजार ११८ नागरीकांचं
लसीकरण करण्यात आलं. देशात आतापर्यंत या लसीच्या ९७ कोटी २३ लाख ७७ हजार ४५ मात्रा
देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या १५ हजार ९८१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १६६ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या, तीन कोटी ४० लाख
५३ हजार ५७३ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत, चार लाख ५१ हजार ९८० रुग्णांचा मृत्यू
झाला आहे. काल १७ हजार ८६१ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी ३३ लाख ९९ हजार
९६१ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख एक हजार ६३२ रुग्णांवर उपचार
सुरु आहेत.
****
राष्ट्रीय
सुरक्षा बल - एनएसजीचा आज ३७वा स्थापना दिवस आहे. यानिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी
राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. एन एस जी सर्व प्रकारच्या दहशतवादा
विरोधात लढण्यासाठी राज्य स्तरावरील एकमेव प्रशिक्षित दल असल्याचं त्यांनी ट्विट संदेशात
म्हटलं आहे. हा बल सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा या आपल्या सिद्धांताचं पालन करण्यासाठी
सदैव तत्पर असून, देशाला एनएसजीचा अभिमान असल्याचं, शहा यांनी म्हटलं आहे.
****
शिवसेना
हा पक्ष जनतेच्या मताशी बेइमानी करून सत्तेवर आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र
फडणवीस यांनी केला आहे. शिवसेनेच्या दसर्या मेळाव्यात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना फडणवीस बोलत होते. सक्तवसुली संचालनालय तसंच इतर
केंद्रीय तपास संस्था नेमण्याचा निर्णय हा उच्च न्यायालयाचा होता, केंद्रीय तपास यंत्रणांचा
गैरवापर पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच करत नाही. जर या यंत्रणांचा वापर सरकार विरोधात
केला असता राज्याचं अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात असलं असतं, असं फडणवीस म्हणाले.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या २४ ऑक्टोबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८२ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या
सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर,
माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नमो ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नाशिक
जिल्ह्यात दसऱ्या च्या मुहूर्तावर काल लाल कांदा लिलावाचा प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी
प्रतिक्विंटल पाच हजार १५१ रुपयांचा भाव उमराणे इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला.
कांदा
लिलावाचा प्रारंभ बाजार समितीचे प्रशासक फयाज मुलानी यांच्या हस्ते करण्यात आला. चालू वर्षी सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस
असल्यानं लाल पावसाळी कांदा लागवडीवर याचा विपरीत परिणाम होऊन लाल कांद्यांच्या क्षेत्रात
कमालीची घट झाली आहे. त्यामुळे साठवून ठेवलेल्या उन्हाळी कांद्यांच्या दरात तेजी राहण्याची
शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
****
समाजातील
प्रत्येकाने जर आपली जबाबदारी ओळखून त्याबाबत प्रयत्न केले तर समाजाचा नक्कीच विकास
होईल. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर वसलेल्या बोदड सुभानपूर या गावांनं कोविड
प्रतिबंधक लसीच्या पहिल्या मात्रेचं शंभर टक्के लसीकरण पूर्ण केलं आहे. अमरावती जिल्ह्यातल्या
या छोट्याश्या गावातल्या नागरिकांनी आणि ग्रामपंचायतीने एकत्रितपणे हा टप्पा पार केला
आहे. सर्वांच्या मदतीनं जनजागृती आणि आवाहन करत हे उद्दिष्ट या गावांनं पार केलं असल्याचं,
सरपंच दीपक गवई यांनी सांगितलं.
****
सात
वेळा अजिंक्यपद भूषवलेला भारतीय संघ आज मालदीवच्या माले इथं दक्षिण आशियायी फुटबॉल
महासंघ अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत नेपाळ विरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघानं बुधवारी
मालदीवला हरवून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. यापूर्वी बांग्लादेश आणि श्रीलंकेशी
बरोबरीत खेळून भारतीय संघ या स्पर्धेत अजिंक्य राहिला.
****
येत्या
१९ तारखेपर्यंत नैर्ॠत्य मान्सून भारताचा निरोप घेईल आणि दक्षिणेत हिवाळी पाऊस घेऊन
येणारा ईशान्य मान्सून २० ऑक्टोबरपासून सुरू होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. हवामानातल्या
या बदलामुळे सध्या मध्य आणि उत्तर भारतात दिवसाच्या तापमानात वाढ होत असली; तरी लवकरच
किमान तापमानात घट सुरू होऊन थंडीची चाहूल लागेल अशी अपेक्षा आहे.
दरम्यान,
मान्सूननं राज्याचा निरोप परवाच घेतला असला तरी ओडीशाच्या किनाऱ्याकडून आलेल्या वाऱ्यांमुळे
विदर्भात आणखी तीन दिवस तरी अनेक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे. याबरोबरच मराठवाडा आणि
मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो.
****
No comments:
Post a Comment