Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 October 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६
ऑक्टोबर
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशात १०० कोटी कोविड प्रतिबंधक लस देण्याचं उद्दीष्ट लवकरच पूर्ण होत आहे. ही उद्दीष्टपूर्ती करण्यामध्ये
योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना आकाशवाणीचा सलाम.
कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या
काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११-
२३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य
स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
केंद्राने राज्याच्या कामात हस्तक्षेप करू नये-शिवसेनेच्या दसरा
मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती
·
विजया दशमी तसंच धम्मचक्र प्रवर्तन दिन काल सर्वत्र मोठ्या उत्साहात
साजरा
·
अतिवृष्टीनं बाधित
शेतकऱ्यांसाठी सरकारकडून जाहीर मदत
तुटपुंजी - भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा आरोप
·
मध्य गोदावरी उपखोऱ्यातलं १९ पूर्णांक २९ अब्ज घनफूट अतिरिक्त
पाणी वापराला मान्यता
·
राज्यात दोन हजार १४९ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात
पाच जणांचा मृत्यू तर नव्या ७० रुग्णांची नोंद
आणि
·
चेन्नई सुपर किंग्जने पटकावलं आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद
****
केंद्राने
राज्याच्या कामात हस्तक्षेप करू नये, असा स्पष्ट सल्ला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
दिला आहे. ते काल मुंबईत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. राज्य आणि केंद्राच्या
अधिकाराबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले..
‘‘राज्याला सुद्धा केंद्राबरोबरीचे हक्क दिले आहेत. तीन
गोष्टी ज्या आहेत, त्या आणि त्याच वेळेला केंद्र राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करु
शकतो. तो म्हणजे एक आणीबाणीजन्य परिस्थितीत, दुसरं परकीय आक्रमण, आणि तिसरं विदेशाबरोबर
संबंध कसे असावे, हे ठरवण्याचं धोरण केंद्र सरकार घेऊ शकतं, अन्यथा जर केंद्राने राज्याच्या
कारभारात ढवळाढवळ केली, तर ते घटनाबाह्य ठरेल. म्हणजे थोडक्यात घटनेची दुर्घटना होईल.’’
चीनमधून
बाहेर पडणाऱ्या कंपन्या महाराष्ट्रात आणण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असताना,
अंमली पदार्थ संदर्भातली प्रकरणं काढून महाराष्ट्राला बदनाम केलं जात असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी
नमूद केलं. केंद्राकडून निधी वाटपात सापत्न वागणूक दिली असल्याचा आरोप त्यांनी केला.
औरंगाबादचं संतपीठ, तसंच मुंबईत उभारण्यात येणाऱ्या सैन्य संग्रहालयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी
आपल्या भाषणात उल्लेख केला.
****
सर्व
समाजघटकांना लागू होणारं लोकसंख्या धोरण देशासाठी अत्यावश्यक असल्याचं, राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. काल नागपूर इथं राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाच्या विजयादशमी उत्सवात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. लोकसंख्या असमतोल देशाच्या
विकासात समस्या निर्माण करू शकते, असं सांगून भागवत यांनी, देशामध्ये अवैध घुसखोरांवर
नजर ठेवण्यासाठी, राष्ट्रीय नागरिक नोंदणी तयार करण्याची गरज व्यक्त केली. डॉ भागवत
यांच्या हस्ते यावेळी शस्त्रपूजन करण्यात आलं.
दरम्यान,
नागपूरच्या दीक्षाभूमीवर ५६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी भगवान बुद्धांच्या
प्रतिमेला माल्यार्पण करून बुद्धवंदना केली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास
आठवले यांनीही काल धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिक्षाभूमीला भेट देऊन बाबासाहेबांना
अभिवादन केलं.
****
विजया
दशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन काल सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. औरंगाबाद
शहर आणि जिल्ह्यात जिल्ह्यात ठिकठिकाणी दुर्गा महोत्सव मंडळात महापूजा आणि होमहवन करण्यात
आलं.
विजयादशमी निमित्त परभणी इथं छत्रपती शिवाजी
महाराज चौकातून काढण्यात आलेल्या `श्री
दुर्गामाता दौड`मध्ये, शेकडो युवक, युवती सहभागी झाले होते. परभणीच्या
ग्रामीण भागात वैयक्तिक, परिसर आणि हाताची स्वच्छता अबाधित
रहावी, असा स्वच्छतेचा संदेश देत,
ठिकठिकाणी `जागतिक हात धुवा दिन`ही उत्साहात
साजरा करण्यात आला.
नांदेड
जिल्ह्यात ठिकठिकाणी पारंपारिक पध्दतीनं दसरा सण साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी मिरवणूक
काढून सीमोल्लंघन करून आपट्याच्या सोनं लुटण्यात आलं. सचखंड गुरूद्वाऱ्यात दशहरा महोत्सवानिमित्त
देशविदेशातून शीख बांधव सहभागी झाले. सायंकाळी गुरू ग्रंथसाहेब यांची मिरवणूक काढण्यात
आली. वजिराबाद महावीर चौकातून प्रतिकात्मक हल्लाबोल करण्यात आला.
हिंगोली
जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं नागेश्वराची विजयादशमी निमित्त काढण्यात येणारी पालखी मिरवणूक
प्रशासनानं रद्द केली होती, परंतू परंपरा कायम राहावी म्हणून चारचाकी वाहनातून, नागनाथाच्या
मुकुटची पालखी मिरवणूक मोजक्याच पुजारी आणि पदाधिकारी यांच्या उपस्थित काढण्यात आली. कोविडच्या पार्श्वभूमीवर चार फुटाच्या रावणाचं दहन
करून साध्या पद्धतीने दसरा महोत्सव साजरा करण्यात आला.
लातूर
इथं पालकमंत्री अमित देशमुख यांनी काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क इथं भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
तुळजापूर
इथं तुळजाभवानी देवीचा सीमोल्लंघन सोहळा काल साजरा झाला. त्यानंतर देवीच्या पाच दिवसीय
मंचकी निद्रेला प्रारंभ झाला.
उस्मानाबाद
इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव साजरा झाला, लातूर विभागाचे प्रचारक
राजेश संन्यासी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, हिंदू संस्कृती रक्षणाचा
संकल्प करण्याचं आवाहन केलं. स्मृती बुद्ध विहार समितीच्या वतीने काल सायंकाळी बुद्ध
धम्म फेरी काढण्यात आली.
बीड
जिल्ह्यात अंबाजोगाई इथं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन उत्साही वातावरणात शिस्त
आणि नियोजनबद्धरित्या पार पडलं. धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत बुद्ध वंदना घेण्यात आली.
****
अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं घोषित केलेली मदत ही तुटपुंजी
असून, भरीव मदत द्यायला
आपण सरकारला भाग पाडू, आणि त्याकरता वेळ
पडल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे
यांनी दिला आहे. त्या काल बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यात सावरगाव घाट इथं, भक्तीशक्ती दसरा
मेळाव्यात बोलत होत्या. बीड जिल्ह्यातली जनता सध्या कठीण
परिस्थितीतून जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी देत असलेल्या
दोन हजार रुपयांच्या व्यतिरिक्त एक पैसाही
शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा आरोप, मुंडे यांनी यावेळी केला.
****
अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात सुरु करण्यात आलेल्या शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या, आणि उच्च शिक्षण
घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना त्यांच्या आहाराकरता, आता
रोख रक्कम देण्यात येणार आहे. अल्पसंख्याक
विकास मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. ही रक्कम
विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. अ, ब आणि क वर्ग महापालिका तसंच विभागीय शहरातल्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना, मासिक साडे
तीन हजार रुपये, तर जिल्हा आणि तालुकास्तरावरच्या वसतिगृहात राहणाऱ्या
विद्यार्थ्यांना, मासिक तीन हजार रुपये
देण्यात येणार आहेत. चालू शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं मलिक यांनी
सांगितलं.
****
मध्य
गोदावरी उपखोऱ्यातलं १९ पूर्णांक २९ अब्ज घनफूट अतिरिक्त पाणी वापराला मान्यता देण्याचा
निर्णय, राज्य शासनानं घेतला आहे. जलसंपदा विभागानं पूर्वीच्या मंजूर पाणी वापरातल्या
त्रुटी आता दूर केल्या असून, मध्य मराठवाड्यासाठी ही दसऱ्याची भेट असल्याचं, जलसंपदा
आणि लाभविकास क्षेत्र मंत्री जयंत पाटील यांनी या निमित्त नमूद केलं. बीड, हिंगोली,
नांदेड या भागातल्या पाण्याचे प्रश्न तसंच प्रकल्पांतले अडथळे आता दूर होतील, आणि या
भागातल्या सिंचन क्षमतेत वाढ होण्यास मदत मिळेल असं पाटील यांनी सांगितलं. ते म्हणाले..
गोदावरी खोऱ्यात जे १९७५ आधी पाणी वापर आपण
केलेला होता. त्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या होत्या. त्या त्रुटी दुरुस्त करुन आणि
आता १९ पूर्णांक २९ टीएमसी हा अतिरिक्त पाणी वापर आपल्याला आता मंजूर झालेला आहे. त्याचा
अर्थ १२१ पूर्णांक २९ टीएमसी पाणी वापर आता गोदावरी खोऱ्यात, मराठवाड्यात आता आपल्याला
करता येणार आहे. जे प्रकल्प पाण्यावाचून थांबलेले होते. आता हे प्रकल्प आता आपल्याला
करता येतील.
****
राज्यात काल दोन हजार १४९ नवे
कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ८८ हजार, ४२९ झाली आहे. काल २९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार ७३४ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल एक हजार ८९८ रुग्ण बरे झाले, राज्यात
आतापर्यंत ६४ लाख १५ हजार ३१६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून,
कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ३७ शतांश टक्के
झाला आहे. राज्यात सध्या २९ हजार ७८२
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ७० नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या तीन, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या
दोन रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी १८ नवे रुग्ण आढळले. उस्मानाबाद १४,
जालना ११, लातूर सहा, परभणी दोन, तर नांदेड जिल्ह्यात एक रुग्ण आढळला. हिंगोली
जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.
****
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील लोकसंख्या ५०० किंवा त्याहून अधिक असलेल्या
गावांमध्ये, अद्ययावत 'संविधान सभागृह' उभारण्यात येणार असल्याची घोषणा, राज्याचे सामाजिक
न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. ते काल परळी इथं पत्रकारांशी
बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार गावागावात पोहोचावेत, विद्यार्थ्यांना
वाचनाची आवड निर्माण व्हावी, तसंच शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागात पोहचावी,
या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. या संविधान सभागृहात बाबासाहेबांच्या जीवन
चरित्रावर आधारित साहित्य, ग्रंथालय, त्याचबरोबर विविध शासकीय योजनांची माहिती एका
छताखाली उपलब्ध असेल.
****
इंडियन
प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद चेन्नई सुपर किंग्जने पटकावलं आहे.
काल झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नई संघानं कोलकाता नाईट रायडर्स संघाचा २७ धावांनी
पराभव केला. प्रथम फलंदाजी करत चेन्नई संघानं दिलेलं १९२ धावांचं लक्ष्य गाठताना कोलकाताचा
संघ निर्धारित षटकात १६५ धावाच करु शकला. या स्पर्धेतलं चेन्नई सुपर किंग्ज संघाचं
हे चौथं विजेतेपद आहे.
****
प्राप्तीकर
विभागानं मुंबईतल्या दोन बांधकाम व्यवसाय समूह आणि त्यांच्याशी संबंधित काही व्यक्ती,
तसंच संस्थांच्या कार्यालयांवर नुकत्याच टाकलेल्या छाप्यात, सुमारे १८४ कोटी रुपयांचे
बेहिशेबी उत्पन्नाचे पुरावे आढळले आहेत. सात ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या कारवाईत,
मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर इथल्या, सुमारे ७० ठिकाणी हे छापे टाकण्यात आले.
दोन कोटी रुपये बेहिशेबी रोख रक्कम आणि चार कोटी ३२ लाख रुपयांचे दागिने, या कारवाईदरम्यान
जप्त करण्यात आले आहेत. बोगस शेअर प्रीमियम, संशयास्पद असुरक्षित कर्ज, विशिष्ट सेवांसाठी
आगाऊ रक्कम, अस्तित्वात नसलेल्या वादातून लवाद सौदे, यासारख्या विविध संशयास्पद मार्गानं,
ही अपसंपदा जमवण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी काल
दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे
यांनी, जांब इथं शंभर टक्के लसीकरण
पूर्ण केलं. गावामध्ये एकूण उद्दीष्ट
असलेल्या तीन हजार ४०१ एवढ्या नागरिकांना कोविड लसीची
पहिली मात्रा तर, एक हजार ३५६ नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात
आली.
****
राज्य विधानमंडळ अंदाज समिती येत्या २७ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर
दरम्यान परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. ही समिती जिल्ह्यातल्या विविध विभागांकडून
राबवण्यात येणारे प्रकल्प आणि कामांना प्रत्यक्ष भेटी देवून पाहणी करणार असून, इतर
विषयांचा आढावाही घेणार आहे.
****
No comments:
Post a Comment