आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१६ ऑक्टोबर २०२१
सकाळी ११.०० वाजता
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरणानं
९७ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल आठ लाख ३६ हजार ११८ नागरीकांचं लसीकरण करण्यात आलं.
देशात आतापर्यंत या लसीच्या ९७ कोटी २३ लाख ७७ हजार ४५ मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या प्रथम सत्र परीक्षा
ऑफलाईन पद्धतीनं, येत्या नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात घेतल्या
जाणार आहेत. या परीक्षेचं वेळापत्रक येत्या सोमवारी जाहीर केलं जाईल, असं मंडळानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. द्वितीय सत्र परीक्षा मार्च
आणि एप्रिल महिन्यात घेतली जाईल. या परीक्षेचं स्वरूप त्यावेळी देशात असलेल्या कोरोना
परिस्थितीनुसार ठरवण्यात येईल. दोन्ही सत्र परीक्षा झाल्यानंतरच अंतिम निकाल जाहीर
केला जाईल. प्रात्यक्षिक परीक्षा तसंच अंतर्गत मूल्यमापन प्रथम सत्र परीक्षेपूर्वीच
घेण्यात येणार असल्याचं, या पत्रकात म्हटलं आहे.
****
मध्य
गोदावरी उपखोऱ्यातलं १९ पूर्णांक २९ अब्ज घनफूट अतिरिक्त पाणी वापराला मान्यता देण्याचा
निर्णय, राज्य शासनानं घेतला आहे. जलसंपदा विभागानं पूर्वीच्या मंजूर पाणी वापरातल्या
त्रुटी आता दूर केल्या असल्याचं, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं. बीड, हिंगोली,
नांदेड या भागातल्या पाण्याचे प्रश्न तसंच प्रकल्पांतले अडथळे आता दूर होतील, आणि या
भागातल्या सिंचन क्षमतेत वाढ होण्यास मदत मिळेल असं पाटील यांनी सांगितलं.
****
दसऱ्याच्या
मुहूर्तावर काल ठिकठिकाणच्या साखर कारखान्यांचे बॉयलर प्रदीपन सोहळा पार पडला. नांदेड
जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर
प्रदीपन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
लातूर
जिल्ह्यात विलास साखर कारखाना युनीट एक आणि युनीट दोन च्या गळीत हंगाम सन २१-२२ ची
तयारी पूर्ण झाली आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे यांच्याहस्ते बॉयलर प्रदीपन
करण्यात आलं.
****
मराठवाड्यात काल ७० नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये
बीड जिल्ह्यातल्या तीन, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment