Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 October 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ ऑक्टोबर
२०२१ सायंकाळी ६.१०
****
देशात १०० कोटी कोविड
प्रतिबंधक लस देण्याचं उद्दिष्ट लवकरच पूर्ण होत आहे. ही उद्दिष्टपूर्ती करण्यामध्ये
योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना ‘आकाशवाणीचा सलाम’. कोरोना विषाणू संसर्गाचा
धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही
लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित
अंतर राखा, हात आणि चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि
मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२
७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
कोविड लसीच्या मात्रांबाबत तज्ज्ञांची
मतं विचारात घ्यावीत - केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार यांचा सल्ला.
·
राज्यातली चित्रपटगृहं सुरू करण्यापूर्वी
अग्नीसुरक्षा तसंच स्थापत्यविषयक योग्य त्या सुरक्षा तपासण्या करण्याची मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांची सूचना.
·
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शिवसेना
खासदार भावना गवळी यांना ईडीकडून दुसऱ्यांदा समन्स.
आणि
·
टी-२० किक्रेट विश्वचषक स्पर्धेत
आज भारत इंग्लंड यांच्यात सराव सामना.
****
कोविड लसीच्या मात्रांबाबत तज्ज्ञांची
मतं विचारात घ्यायला हवीत, असा सल्ला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी
दिला आहे. त्या आज पुण्यात बोलत होत्या. कोविड लसीची एक मात्रा घेतलेल्या नागरिकांना
प्रवास, मॉल किंवा इतर ठिकाणी जाण्यास परवानगी देण्याची शिफारस तज्ज्ञांनी केलेली नाही,
असं डॉ पवार यांनी सांगितलं. लसीच्या दोन मात्रांमधलं अंतर कमी करण्याची मागणी राज्य
सरकारने केली आहे, पण हा राजकीय विषय नाही. याबाबत ‘शास्त्रीय दृष्टीकोनातून’ अभ्यास
करून निर्णय होणं अपेक्षित असल्याचं डॉ पवार म्हणाल्या. कोविड काळात पुणे महापालिकेने
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार केलेल्या कामाचं त्यांनी कौतुक केलं. पुणे महापालिकेने
जवळपास तिप्पट प्राणवायू प्रकल्प सुरू केले, रुग्णालयांच्या देयकांसंदर्भात तक्रारींचा
निपटारा करून सुमारे साडे सहा कोटी रुपयांची देयकं कमी केली, अशी माहितीही डॉ पवार
यांनी दिली.
****
राज्यातली चित्रपटगृहं सुरू करण्यापूर्वी
अग्नीसुरक्षा तसंच स्थापत्यविषयक योग्य त्या सुरक्षा तपासण्या करण्याची सूचना मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी केली आहे. येत्या २२ तारखेपासून चित्रपटगृहं सुरू होत आहेत, त्या
पार्श्वभूमीवर चित्रपट चालक आणि मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सह्याद्री अतिथीगृह
इथं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. चित्रपटगृहांच्या
परवान्यांचं विनामूल्य नूतनीकरण करून द्यावं, वस्तू आणि सेवा कर भरल्यानंतर प्रत्येक
तिकीटामागे २५ रुपये सेवा शुल्क आकारण्यास परवानगी द्यावी, मिळकत कर आकारू नये, अशा
मागण्या यावेळी संघटनेतर्फे करण्यात आल्या.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो,
टँकर्स बस वाहतूक महासंघाच्या शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृह
इथं भेट घेतली. कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो
तोडगा काढला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. राज्यातील शहरांमध्ये
बस आणि ट्रक यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात वाहनतळ उभारणे, तपासणी नाक्यांजवळ ट्रॉमा
केअर सेंटर उभारणे, वार्षिक मोटार वाहन कर तसंच व्यवसाय करात सूट मिळणे, अवजड वाहनांना
शहरांत १० ते १६ तास करण्यात आलेली प्रवेश बंदी उठवणे यासारख्या विविध मागण्या वाहतूक
महासंघानं यावेळी केल्या.
****
राज्यातील बंद असलेले ४० साखर कारखाने
तातडीनं सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे, सहकार आणि कृषी राज्यमंत्री
डॉ. विश्वजित कदम यांनी ही माहिती दिली. राज्यात या गाळप हंगामात ऊसाचे क्षेत्र जास्त
आहे. या परिस्थिती बंद असलेल्या साखर कारखान्यांमुळे शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये,
हा यामागचा उद्देश असल्याचं कदम यांनी सांगितलं. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाचे
१०० टक्के गाळप होईल आणि कारखाने ऊसाला योग्य दर देतील याची जबाबदारी सहकार खात्याच्या
माध्यमातून आम्ही घेऊ, असा विश्वासही कृषी राज्यमंत्री कदम यांनी व्यक्त केला आहे.
****
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर
इथं सात डिसेंबरपासून प्रस्तावित आहे. याबाबतच्या तयारीचे नियोजन करण्यासाठी आज विधिमंडळाचे
प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागांची उच्चस्तरीय
बैठक झाली.
मुंबईत पुढील आठवड्यात विधिमंडळ कामकाज
सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यादृष्टीनं आजच्या बैठकीत प्राथमिक तयारीचा आढावा
घेण्यात आला. हे अधिवेशन कोविड पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या
विधिमंडळ सदस्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यत सर्वांनी कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या
असणं अनिवार्य करण्यात आलं आहे.
****
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शिवसेना खासदार
भावना गवळी यांना सक्तवसुली संचालनालय-ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावले असून यात त्यांना
परवा २० ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये
झालेल्या कथित घोटाळ्यासंदर्भात ही चौकशी सुरू आहे. याआधी गवळी यांना २७ सप्टेंबरला
समन्स बजावून ४ ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होते. त्यांचे निकटवर्तीय सईद खान
यांना देखील ईडीकडून अटक करण्यात आली होती.
****
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नुकसानग्रस्त
शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तोकडी आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत
दिली पाहीजे, ही भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा ची भूमिका आहे. या मागणीसाठी येत्या
गुरुवारी २१ ऑक्टोबरला औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दुपारी साडे अकरा
ते चार दरम्यान भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेवराव काळे यांच्या नेतृत्वाखाली
जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद इथल्या
ख्वाजा जरजरी जर बक्ष दर्गा ऊर्स आणि ईद - ए - मिलाद निमित्त महसूल तथा ग्रामविकास
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली खुलताबाद शासकीय विश्रामगृह इथं आढावा
बैठक आज घेण्यात आली. या बैठकीनंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दर्गाला भेट दिली.
यावेळी दर्गा समितीच्या वतीनं राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार
करण्यात आला.
****
टी-२० वर्ल्ड कपमध्ये गट साखळी फेरीच्या
सामन्यांना सुरुवात होण्याआधी भारताचा संघ आज इंग्लंड विरोधात सराव सामना खेळणार आहे.
संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. तर २० ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया
विरोधात, त्यानंतर गट साखळी फेरीत २४ ऑक्टोबरला पाकिस्तानसोबत भारताचा सलामीचा सामना
होणार आहे. या विश्वचषकाचे सामने ओमानसह दुबई, शारजा आणि अबुधाबी इथं होणार आहेत.
****
No comments:
Post a Comment