Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 October 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ ऑक्टोबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीच्या
९९ कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनुसख मांडवीय
यांनी ट्विट संदेशात ही माहिती दिली. लवकरच देश १०० कोटी लसीकरणाचं उद्दीष्ट गाठणार
असल्याचं, त्यांनी म्हटलं आहे. काल दिवसभरात देशभरात ८५ लाख ४६ हजारांपेक्षा जास्त
नागरीकांना लस देण्यात आली.
दरम्यान, देशात काल नव्या १३
हजार ५८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. गेल्या २३१ दिवसांतली ही सर्वात
कमी नव्या रुग्णांची संख्या आहे. तर १६४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली
एकूण कोविड बाधितांची संख्या, तीन कोटी ४० लाख ९४ हजार ३७३ झाली असून, या संसर्गानं
आतापर्यंत, चार लाख ५२ हजार ४५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल १९ हजार ४७० रुग्ण
बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी ३४ लाख ५८ हजार ८०१ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त
झाले असून, सध्या एक लाख ८३ हजार ११८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस
ईद -ए - मिलाद आज साजरी होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या
नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या
आहेत. प्रेषित मोहम्मदांचं आयुष्य बंधुता, करुणा आणि आपुलकीचं प्रतीक आहे, आणि ते नेहमीच
मानवतेला प्रेरणा देत राहतील, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
प्रेषितांची शाश्वत शिकवण यापुढेही
एक न्याय्य, मानवतापूर्ण आणि सुसंवादी समाजाच्या बांधणीसाठी आपल्याला दिशा दाखवत राहील,
अशा शब्दांत उपराष्ट्रपतींनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोविड पार्श्वभूमीवर ईद
साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन
नागपूर इथं येत्या सात डिसेंबरपासून प्रस्तावित आहे. याबाबतच्या तयारीचे नियोजन करण्यासाठी
काल विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या अध्यक्षतेखाली, सर्व संबंधित विभागांची
उच्चस्तरीय बैठक झाली.
मुंबईत पुढील आठवड्यात विधिमंडळ
कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यादृष्टीनं कालच्या बैठकीत प्राथमिक तयारीचा
आढावा घेण्यात आला. हे अधिवेशन कोविड पार्श्वभूमीवर होत आहे, त्यामुळे त्यात सहभागी
होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यत सर्वांनी कोविड लसीच्या दोन्ही मात्रा
घेतलेल्या असणं अनिवार्य करण्यात आलं आहे.
****
जलसिंचनाचे छोटे छोटे प्रयोग
गावागावात यशस्वी झाले तर राज्यावरचं दुष्काळाचं संकट दूर करता येणं शक्य असल्याचं,
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. वर्धा जिल्ह्यातल्या
जलसंधारणाच्या कामाची गडकरी यांनी काल पाहणी केली, त्यानंतर ते वार्तहरांशी बोलत होते.
शेतकऱ्यांना शेतीसाठी वेळेवर आणि मुबलक पाणी मिळालं, तर राज्यातले शेतकरी आत्महत्या
करणार नाहीत असं ते यावेळी म्हणाले.
****
हवेतील प्रदूषण टाळण्यासाठी
नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागातल्या पाचही जिल्ह्यात फटाके वाजवण्यास
बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात फटाके वाजवण्यास
बंदी घालण्यासाठी प्रयत्न करणं आणि अशा सण प्रसंगात हवेच्या गुणवत्तेची तपासणी करून
अहवाल तयार करणं, यास प्रत्येकी शंभर गुण आहेत. त्यामुळे नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव
आणि नंदुरबार इथं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांवर बंदी घालण्याचे आदेश गमे यांनी
विभागातल्या सर्व महापालिका आणि नगरपालिकांना दिले आहेत.
****
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी
शिवसेना खासदार भावना गवळी यांना सक्तवसुली संचालनालय-ईडीनं दुसऱ्यांदा समन्स बजावलं
असून, यात त्यांना उद्या २० ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. महिला
उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यासंदर्भात ही चौकशी सुरू आहे.
****
परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यात
शेळगाव जवळील फाल्गुनी नदीला पुर आल्यामुळे १७ ऑक्टोबर रोजी या नदीच्या पुलावरून वाहणाऱ्या
पाण्यातून ट्रॅक्टरसह पाचजण वाहुन गेले. अशा घटना याठिकाणी सतत घडत असून, या प्रश्नाकडे
प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधीर बिंदू
यांच्या नेतृत्वाखाली नागरीकांनी पुलावरच्या पाण्यात बसून काल आंदोलन केलं.
****
वाशिम जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक
लसीकरणाचं प्रमाण हे राज्याच्या प्रमाणात कमी आहे. त्यामुळे वाशिम जिल्हा परिषदेच्या
अधिनस्त असलेल्या सर्व विभागांनी पुढाकार घेत ज्या गावांचं लसीकरणाचं प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा
कमी आहे, त्या गावांची लसीकरणासाठी निवड केली आहे. या गावांमध्ये कार्यरत शिक्षण, कृषि,
माविम, महिला बचतगट, एकात्मिक बालविकास प्रकल्प, ग्रामपंचायत, महसूल आणि आरोग्य विभागाच्या
कर्मचाऱ्यांच्या वतीनं सदरील गावात घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येत आहे.
****
No comments:
Post a Comment