Tuesday, 19 October 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 19.10.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 October 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १०० कोटी कोविड प्रतिबंधक लस देण्याचं उद्दीष्ट लवकरच पूर्ण होत आहे. ही उद्दीष्टपूर्ती करण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना आकाशवाणीचा सलाम. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच,णि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

·     राज्यातली चित्रपटगृहं सुरू करण्यापूर्वी अग्नीसुरक्षा तसंच स्थापत्यविषयक योग्य त्या सुरक्षा तपासण्या करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना

·      राज्यात नवे एक हजार ४८५ कोविडग्रस्त; मराठवाड्यात दोन रुग्णांचा मृत्यू तर ५६ नव्या बाधितांची नोंद

·      कोविड लसीच्या मात्रांबाबत तज्ज्ञांची मतं विचारात घ्यावीत- केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार यांचा सल्ला

·      राज्यातले बंद असलेले ४० साखर कारखाने तातडीनं सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय

·      एमजीएम संस्थेचे महात्मा गांधी मराठवाडा भूषण पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान

·      हिंगोली-रिसोड राज्य महामार्गावर ११ क्विंटल ५० किलो गांजा जप्त; चौघांना अटक

आणि

·      ईद-ए-मिलाद कोविड नियमांचं पालन करून साजरी करण्याचं आवाहन

 

राज्यातली चित्रपटगृहं सुरू करण्यापूर्वीग्निसुरक्षा तसंच स्थापत्यविषयक योग्य त्या सुरक्षा तपासण्या करण्याची सूचना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. येत्या २२ तारखेपासून चित्रपटगृहं सुरू होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर, चित्रपट चालक आणि मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. चित्रपट गृहांच्या परवान्यांचं विनामूल्य नूतनीकरण करून द्यावं, वस्तू आणि सेवा कर भरल्यानंतर प्रत्येक तिकीटामागे २५ रुपये सेवा शुल्क आकारण्यास परवानगी द्यावी, मिळकत कर आकारू नये, अशा मागण्या यावेळी संघटनेतर्फे करण्यात आल्या.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स, बस वाहतूक महासंघाच्या शिष्टमंडळानं, काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शहरांमध्ये बस आणि ट्रक यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात वाहनतळ उभारणं, तपासणी नाक्यांजवळ ट्रॉमा केअर सेंटर उभारणं, वार्षिक मोटार वाहन कर तसंच व्यवसाय करात सूट मिळणं, अवजड वाहनांना शहरांत १० ते १६ तास करण्यात आलेली प्रवेश बंदी उठं, यासारख्या विविध मागण्या वाहतूक महासंघानं यावेळी केल्या. कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा काढला जाईल,सं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

 

मुख्यमंत्र्यांनी काल राज्य कृती दलाची आढावा बैठक घेतली. मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणं, तसंच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाचं नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागास केल्या. कोविड नियमांच्या पालनाबाबत जनजागृती करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. दुकानं तसंच उपाहारगृहांच्या वेळांसंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या शिष्टमंडळानंही, काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत संयुक्त समिती स्थापन करावी असे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.

****

राज्यात काल एक हजार ४८५ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ९३ हजार, १८२ झाली आहे. काल २७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार ८१६ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल दोन हजार ७८ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६ लाख २१ हजार ७५६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ४ दशांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २८ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ५६ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली. तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात काल १७ रुग्ण आढळले, बीड दहा, औरंगाबाद नऊ, लातूर सहा, नांदेड आणि जालना जिल्ह्यात पाच, तर परभणी जिल्ह्यात चार रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.

****

कोविड लसीच्या मात्रांबाबत तज्ज्ञांची मतं विचारात घ्यायला हवीत, असा सल्ला केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार यांनी दिला आहे. त्या काल पुण्यात बोलत होत्या. कोविड लसीची एक मात्रा घेतलेल्या नागरिकांना प्रवास, मॉल किंवा इतर ठिकाणी जाण्यास परवानगी देण्याची शिफारस तज्ज्ञांनी केलेली नाही, असं त्यांनी सांगितलं. लसीच्या दोन मात्रांमधलं अंतर कमी करण्याची मागणी राज्य सरकारनं केली आहे, मात्र हा राजकीय विषय नाही, याबाबत ‘शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करून निर्णय होणं अपेक्षित असल्याचं, डॉ. पवार म्हणाल्या. कोविड काळात पुणे महापालिकेनं केंद्र सरकारच्या निर्देशानुसार केलेल्या कामाचं त्यांनी कौतुक केलं. पुणे महापालिकेनं जवळपास तिप्पट प्राणवायू प्रकल्प सुरू केले, रुग्णालयांच्या देयकांसंदर्भात तक्रारींचा निपटारा करून, सुमारे साडे सहा कोटी रुपयांची देयकं कमी केली, अशी माहितीही पवार यांनी दिली.

****

राज्यातले बंद असलेले ४० साखर कारखाने तातडीनं सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे, सहकार आणि कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी काल ही माहिती दिली. राज्यात या गाळप हंगामात ऊसाच क्षेत्र जास्त आहे, या परिस्थिती बंद असलेल्या साखर कारखान्यांमुळे शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये, हा यामागचा उद्देश असल्याचं, त्यांनी सांगितलं. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाच १०० टक्के गाळप होईल, आणि कारखाने ऊसाला योग्य दर देतील याची जबाबदारी सहकार खात्याच्या माध्यमातून आम्ही घेऊ, असा विश्वासही कदम यांनी व्यक्त केला.

****

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता आणि नऊ टक्के घरभाडवाढ लागू करण्यात आल आहे. शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी ही माहिती दिली. शासनाच्या निर्णयानुसार एक जुलैपासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित दराने घरभाडे भत्ता लागू करण्याची मागणी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं करण्यात आली होती. एक जुलै २०१९ ते ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंतचा पाच महिन्यांचा महागाई भत्ता, फरकासह वाढीव घरभाडे भत्ता, तसंच ऑक्टोबर महिन्याचं नियमित वेतन दिवाळीपूर्वी मिळणार असल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

****

औरंगाबाद इथल्या एमजीएम संस्थेचे महात्मा गांधी मराठवाडा भूषण पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. जल आणि मृदसंधारण क्षेत्रात भरीव योगदान देणारे कृषीरत्न विजयअण्णा बोराडे आणि जगप्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. सन्मानचिन्ह आणि ५० हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. अत्यंत कृतीशील आणि वास्तववादी व्यक्तींचा एमजीएमकडून गौरव होत असल्याची भावना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांनी यावेळी व्यक्त केली. 

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालयं उद्या २० ऑक्टोबरपासून सुरु होत आहेत. कोविड प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेले विद्यार्थी विद्यापीठ किंवा महाविद्यालयात उपस्थित राहू शकतील. ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही, त्यांच्यासाठी महाविद्यालयानं ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही शासनाकडून देण्यात आले आहेत.

****

वाशिम जिल्ह्यात हिंगोली-रिसोड राज्य महामार्गावर काल वाशिम जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली, ११ क्विंटल ५० किलो गांजा पकडण्यात आला. रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सारंग नवलकर यांनी केलेल्या या कारवाईत चार आरोपींसह एक आयशर ट्रक, असा एकूण तीन कोटी ६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

****

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत दिली पाहीजे, ही भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा ची भूमिका आहे. या मागणीसाठी येत्या गुरुवारी २१ ऑक्टोबरला औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर, दुपारी साडे अकरा ते चार दरम्यान, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.

****

मुस्लीम बांधवांचा ईद-ए-मिलाद हा सण आज साजरा हो आहे. यासाठी राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सर्व सूचनांचं पालन करावं, कोविड परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबिरं, आरोग्य शिबिरं असे उपक्रम राबवावेत, या उपक्रमांमधे स्वच्छतेबाबत जनजागृती करावी, असंही याबाबत जारी पत्रकात म्हटलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईद -ए -मिलाद निमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला हा सण त्यांच्या मानवतावादी कार्याचं, तसच परोपकाराच्या शिकवणीच स्मरण करुन देतो, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ईद-ए-मिलाद’निमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या असून, ईदच्या निमित्तानं समाजातल्या गरजू, गरीब बांधवांना आपल्या आनंदात सहभागी करुन घेण्याचं आवाहन केलं आहे.

निसर्ग आणि कृषी संस्कृतीशी नातं सांगणारी कोजागरी पौर्णिमा राज्यातल्या प्रत्येक घरात धन-धान्य, सुख-शांती, उत्तम आरोग्याची समृद्धी घेऊन येवो, अशा शुभेच्छाही पवार यांनी दिल्या आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद इथल्या ख्वाजा जरजरी जर बक्ष दर्गा ऊर्स आणि ईद - ए - मिलाद निमित्त, महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली, काल खुलताबाद इथल्या शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर सत्तार यांनी दर्ग्याला भेट दिली. यावेळी दर्गा समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला.

****

लातूर जिल्ह्यातले सर्व रस्ते तसंच पाणंद रस्ते दुरुस्ती करुन सक्षम करावेत, असे निर्देश, जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. लातूर जिल्ह्यातल्या रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती, याबाबत काल शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातल्या रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजवण्याची कामं तसंच अपूर्ण रस्ते लवकर तसंच गुणात्मकदृष्ट्या दर्जेदार तयार करावेत, असंही देशमुख यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद इथं काल प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमालेत 'अनाथ ? नव्हे स्वअनाथ' या विषयावर तर्पण फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांचं व्याख्यान झालं. यावेळी त्यांनी अनाथांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. या तीन दिवसीय व्याख्यानमालेचा काल समारोप झाला.

****

महाराष्ट्र ज्युदो संघटनेच्या निवडणुकीत औरंगाबाद जिल्हा ज्युदो संघटनेचे तांत्रिक समिती अध्यक्ष दत्ता आफळे यांची राज्य तांत्रिक समिती सचिवपदी निवड झाली आहे. जिल्हा सचिव अतुल बामनोदकर आणि जिल्हा ज्युदो संघटनेचे सहसचिव विश्वास जोशी यांची राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाली आहे.

****

हवामान

येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.

****

No comments:

Post a Comment