Tuesday, 19 October 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 19.10.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 १९ ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद-ए-मिलाद आज साजरी होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मदांचं आयुष्य बंधुता, करुणा आणि आपुलकीचं प्रतीक आहे आणि ते नेहमीच मानवतेला प्रेरणा देत राहतील, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

प्रेषितांची शाश्वत शिकवण यापुढेही एक न्याय्य, मानवतापूर्ण आणि सुसंवादी समाजाच्या बांधणीसाठी आपल्याला दिशा दाखवत राहील, अशा शब्दांत उपराष्ट्रपतींनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोविड पार्श्वभूमीवर ईद साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईनं दहावी आणि बारावीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. दहावीच्या महत्वाच्या विषयांच्या परीक्षा ३० नोव्हेंबरपासून, तर बारावीच्या परीक्षा एक डिसेंबरपासून सुरु होतील. इतर विषयांसाठीचं वेळापत्रक शाळांना स्वतंत्रपणे पाठवलं जाईल, असं सीबीएसईनं सांगितलं आहे.

****

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ९८ कोटींचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात देशभरात ८५ लाख ४६ हजारापेक्षा जास्त नागरीकांना लस देण्यात आली. देशात आतापर्यंत या लसीच्या ९८ कोटी ६७ लाख ६९ हजार ४११ मात्रा देण्यात आल्या आहेत. 

****

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या वारंगा फाटा इथं शेतातून चारा घेऊन जाणाऱ्या एका शेतकऱ्याचा वीजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. काल सायंकाळी ही घटना घडली. घोडा कामठा इथून डोंगरकडा ३३ केव्ही उपकेंद्रास विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत तारा डोक्याला सहजच लागतील अशा पद्धतीने लोंबकळलेल्या आहेत. त्या तारांचा धक्का लागून मंगेश कदम या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

****

टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत काल दुबईत झालेल्या पहिल्या सराव सामन्यात भारतानं इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडनं दिलेलं १८९ धावांचं लक्ष्य भारतानं १९व्या षटकातच पूर्ण केलं. भारताचा दुसरा सराव सामना उद्या ऑस्ट्रेलियासोबत होणार आहेत.

****

No comments:

Post a Comment