Wednesday, 20 October 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.10.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 October 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १०० कोटी कोविड प्रतिबंधक लस देण्याचं उद्दीष्ट लवकरच पूर्ण होत आहे. ही उद्दीष्टपूर्ती करण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना आकाशवाणीचा सलाम. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोविड लसीच्या दुसऱ्या मात्रेच्या लसीकरणावर लक्ष केंद्रीत करण्याची केंद्रीय आरोग्य सचिवांची सूचना

·      राज्यातली उपाहारगृहं रात्री १२ वाजेपर्यंत तर इतर दुकानं रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

·      राज्यात नवे एक हजार ६३८ कोविडग्रस्त; मराठवाड्यात दोघांचा मृत्यू तर नव्या ६५ रुग्णांची नोंद

·      दीड वर्षांपासून बंद असलेली महाविद्यालयं आजपासून सुरू होणार; लस घेतलेल्यांनाच प्रवेश

·      दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी होणार जाहीर

·      शालेय पोषण आहारात बदल;  धान्यापासून बनवलेली पौष्टिक बिस्कीटं दिली जाणार

·      मराठवाड्यात काल विविध घटनांमध्ये सहा जणांचा बुडून मृत्यू

आणि

·      प्रेषित मोहमंद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलादचा सण आज भक्तिभावानं साजरा

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीचं ९९ कोटींहून अधिक नागरिकांना लसीकरण करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनुसख मांडवीय यांनी काल ट्विट संदेशात ही माहिती दिली. लवकरच देश १०० कोटी लसीकरणाचं उद्दीष्ट गाठणार असल्याचं, त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोविड लसीच्या दुसऱ्या मात्रेच्या लसीकरणावर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केली आहे. त्यांनी काल दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत, कोविड लसीकरणाचा आढावा घेतला. कोविड लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी, आणि लसीकरणाबाबत ग्रामीण भागातली स्थिती सुधारण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश राजेश भूषण यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. अनेक राज्यांमध्ये दुसऱ्या मात्रेच्या प्रतिक्षेत असणाऱ्या लोकांचं लसीकरण करण्यासाठी लसींचा पुरेसा साठा उपलब्ध व्हावा, याकडे लक्ष देण्याच्या सुचनाही भूषण यांनी यावेळी केल्या.

****

राज्यातली उपाहारगृहं रात्री १२ वाजेपर्यंत, तर इतर दुकानं रात्री ११ वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी, राज्य शासनानं दिली आहे. मात्र कोविड पार्श्वभूमीवर लागू असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं, नागरिकांना आणि आस्थापनांना काटेकोर पालन करावं लागणार आहे. पूर्णपणे लसीकरण, गर्दीच्या क्षमतेवर निर्बंध, हे नियम परिस्थिती नुसार लागू राहील. सध्या सणासुदीचे दिवस असल्यानं, खरेदीसाठी सार्वजनिक ठिकाणी लोकांची जास्त गर्दी होण्याची शक्यता लक्षात ठेवून, हा वेळ वाढवण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आल्याचं, याबाबत जारी पत्रकात म्हटलं आहे. अन्य निर्बंधांमध्ये कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. उपाहारगृहं तसंच अन्य आस्थापनांच्या वेळेसंदर्भात, स्थानिक प्रशासन आवश्यकतेनुसार निर्बंध लावू शकतं किंवा सवलत देऊ शकतं, असं आपत्ती व्यवस्थापन विभागानं म्हटलं आहे.

****

राज्यात काल एक हजार ६३८ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ९४ हजार, ८२० झाली आहे. काल ४९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार ८६५ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल दोन हजार ७९१ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६४ लाख २४ हजार ५४७ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ४२ दशांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २६ हजार ८०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ६५ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली. तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत दोघे जण बीड जिल्ह्यातले आहेत.

बीड जिल्ह्यात २७ रुग्ण आढळले, लातूर जिल्ह्यात १६, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी आठ, जालना चार, तर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. परभणी जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.

****

कोविड साथीमुळे दीड वर्षांपासून बंद असलेली महाविद्यालयं आजपासून सुरू होत आहेत. पन्नास टक्के उपस्थितीच्या मर्यादेसह ही महाविद्यालयं उघडली जाणार आहेत. यासाठी सर्व अकृषी विद्यापीठांनी आपल्या संलग्नित महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, असे निर्देश, उच्च शिक्षण विभागानं दिले आहेत. कोविड प्रतिबंधक लसींच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना, प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार आहे. विद्यार्थ्यांनी शासन आणि विद्यापीठांना घालून दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.

राज्यातली सर्व कृषी विद्यापीठं, आणि त्यांच्याशी संलग्न शासकीय आणि खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयंही, आजपासून सुरू होत असल्याचं, कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. कोविड प्रतिबंधासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि निर्देशांचं पालन करण्याचं आवाहन भुसे यांनी केलं आहे.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या, सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी, आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल, आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. हा निकाल डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डाॉट एम ए एच रिझल्ट डाॉट एन आय सी डाॉट इन या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील.

****

शालेय पोषण आहारात बदल करण्यात आला आहे. आता ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी, सोयाबीन हे मुख्य घटक, तसंच लोहयुक्त गव्हाचं पीठ, पिठीसाखर, खाद्य तेल, स्किम्ड दूध आणि इतर उपघटक वापरून तयार करण्यात आलेली, 'न्यूट्रिटीव्ह स्लाईस' - बिस्किटं, विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. पहिली ते पाचवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा सहा पाकिटं, तर इयत्ता सहावी ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांला, दरमहा बिस्किटांची नऊ पाकिटं देण्यात येणार आहेत. प्रत्येक पाकिटात १६ बिस्किटं असून, पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आठवड्यातून पाच दिवस दररोज चार बिस्किटं, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी दररोज सहा बिस्किटं खाण्याची सूचना, शिक्षण विभागाच्या वतीनं करण्यात आली आहे.

****

दुष्काळ आणि कोविड-काळातील परिस्थितीमुळे राज्यातली साखर कारखानदारी आणि संबंधित सहकार क्षेत्र अडचणीत आलं असून, साखर कारखानदारीला उर्जितावस्था आणणं गरजेचं असल्याचं मत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. यासंदर्भात केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ते काल माध्यमांशी बोलत होते. राज्यातल्या साखर कारखानदारांना सवलती देण्याबाबत राज्य सरकार भेदभाव करत आहे. संपूर्ण सहकार क्षेत्राला प्रगती करण्याची सामान संधी देणं आवश्यक असल्याचं, ते म्हणाले. साखर कारखानदारांनी रास्त आणि किफायतशीर दरापेक्षा अधिक दर दिल्यानं, आयकर विभागानं त्यासंदर्भात सूचनापत्रकं काढली आहेत, त्यामुळे साखर कारखानदारांच्या अडचणीत वाढ होत असल्याची चिंता, बैठकीदरम्यान फडणवीसांनी व्यक्त केली. राज्यातल्या कारखानदारांवर कडक कारवाई होणार नाही, आणि या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन, अमित शाह यांनी दिल्याचं फडणवीस यावेळी सांगितलं.

****

मराठवाड्यात काल विविध घटनांमध्ये सहा जणांचा बुडून मृत्यू झाला.

बीड जिल्ह्यात पाली इथल्या बिंदूसरा प्रकल्पात शिंदेनगर इथल्या दोन १६ वर्षीय मुलांचा बुडून मृत्यू झाला. ओंकार काळे आणि शिव पिंगळे अशी मृतांची नावं असून, प्रकल्पावर पोहण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडली. अन्य एका घटनेत गेवराई तालुक्यातल्या सुरळेगाव इथं गोदावरी नदीच्या डोहात बुडून तान्हाजी अरबड या १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या एकोजी मुदगड इथं शेततळ्यात बुडून दोन शेतमजुरांचा मृत्यू झाला. भेवनाथ तोरंबे आणि रणजित इंगळे हे शेततळ्यात पाणी आणायला गेले असता, पाय घसरुन तळ्यात पडले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

जालना शहरातल्या रोहनवाडी शिवारातल्या कुंडलिका नदीपात्रात एक मृतदेह सापडला असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.  

****

सोलापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं काल सकाळी अवैध मद्यसाठा जप्त केला. शेटफळ ते कुर्डुवाडी रस्त्यावर करण्यात आलेल्या या कारवाईत, चार जणांच्या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून एक आयशर टॕम्पो, स्विफ्ट कार, दारूच्या बाटल्यांच्या १९० पेट्या, असा एकूण २६ लाख २० हजार ३२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती, अधिक्षक नितिन धार्मिक यांनी दिली.

****

लातूर इथल्या सौर ऊर्जा प्रकल्पांचं काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश, जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. ते लातूर इथं या संदर्भातल्या आढवा बैठकीत बोलत होते. लातूर सौर ऊर्जा प्रकल्पाचा आढावा घेऊन, संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीसाठी त्यांनी सूचना केल्या. महावितरण आणि सौर ऊर्जा विभागानं समन्वय साधून काम करावं, काही अडचणी असतील तर आपण वीज खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्या सोडवू, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली

****

देगलूर विधानसभा पोट निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. काल महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारार्थ, पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी, टाकळी, झरी या गावात प्रचार सभा घेतली. तर भाजपा, रिपाइं, शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकात पाटील आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी सगरोळी इथं बैठक घेतली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचा अहवाल तात्काळ केंद्र सरकारला पाठवावा, अशी विनंती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राज्यभरातून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या माहितीचं संकलन करण्याची प्रक्रिया जलद गतीनं होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यक्तीगत लक्ष देण्याची विनंती पाटील यांनी केली आहे.

****

प्रेषित मोहमंद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलादचा सण काल भक्तिभावानं साजरा झाला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद इथं मोहंमद पैगंबर यांचा पवित्र पोशाख आणि पवित्र केस या दिवशी भाविकांना दर्शनासाठी खुला केला जातो. भाविकांनी काल सकाळपासूनच याठिकाणी गर्दी केली होती.

उस्मानाबाद इथं शहरात ईद-ए-मिलाद निमित्ताने रक्तदान शिबिर, तसंच कोविड लसीकरण मोहीम घेण्यात आली. आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते या शिबीराचं उद्घाटन करण्यात आलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या झरी गावात काल घरोघरी जाऊन उर्वरित नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पथकानं गावातल्या प्रत्येक घरी जाऊन, तसंच रस्त्यावरील वाहनधारकांना थांबवून, लस न घेतलेल्या नागरिकांचं लसीकरण केलं.

****

हवामान

मराठवाड्याच्या अनेक भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. तर राज्याच्या उर्वरित भागांत काल कमाल तापमान सरासरी इतकं होतं. येत्या दोन दिवसांत राज्यभरात हवामान कोरडं राहील, असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.

No comments:

Post a Comment