Saturday, 23 October 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.10.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचं लोकार्पण आज सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या हस्ते झालं. केंद्रीय कायदे आणि न्यायमंत्री किरेन रिजीजू, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलिल, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासह उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यावेळी उपस्थित होते.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाच्या लाभार्थी आणि भागधारकांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, संवाद साधणार आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’ साकारण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनापासून प्रेरणा घेऊन एक ऑक्टोबर २०२० रोजी स्वयंपूर्ण गोवा हा उपक्रम सुरु करण्यात आला.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणानं १०१ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. यापैकी ७१ कोटी चार लाख नागरीकांना पहिली मात्रा, तर अंदाजे ३० कोटी नागरीकांना दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत. काल देशात ६८ लाख ४८ हजारांहून अधिक नागरीकांचं लसीकरण करण्यात आलं. 

****

परभणी जिल्ह्यात कोवीड संक्रमणाने मयत झालेल्यांच्या वारसांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमधून तत्काळ ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावं, अशी मागणी, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन काल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलं.

****

लोककलेचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातल्या सावळज इथं काल पहिला तमाशा महोत्सव साजरा करण्यात आला. कोविड संकटानंतर तमाशा फडांना प्रेरणा मिळावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

****

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. महिला एकेरीच्या काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत पी. व्ही. सिंधुला दक्षिण कोरियाच्या आन से-यौंग कडून पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतही समीर वर्माचा पराभव झाला.

****

No comments:

Post a Comment