Monday, 25 October 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.10.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 October 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ही उद्दीष्टपूर्ती करण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना आकाशवाणीचा सलाम. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

·      कोविड लसीकरण अभियानाच्या यशातून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रम आणि दृढसंकल्पाचा एक नवा आदर्श- पंतप्रधान नरेंद्र मोदी

·      राज्यात विभागीय स्तरावर कर्करोग रुग्णालयं उभारण्याचा विचार- आरोग्यमंत्री राजेश टोपे 

·      आरोग्य विभागाच्या परिक्षेत अनेक ठिकाणी गोंधळ, अनेक विद्यार्थी परिक्षा देऊ शकले नाहीत.

·      आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्यावर आठ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा साक्षीदाराचा आरोप

·      राज्यात एक हजार ४१० नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात तीन जणांचा मृत्यू तर ६३ बाधित

·      औरंगाबाद जिल्ह्यातल्या आठ बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

आणि

·      टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानकडून भारताचा पराभव, अन्य एका सामन्यात श्रीलंकेचा बांगलादेशवर विजय

****

कोविड लसीकरण अभियानाच्या यशातून आरोग्य कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम आणि दृढसंकल्पाचा एक नवा आदर्श निर्माण केला असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल आकाशवाणीच्या मन की बात  कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधताना ते बोलत होते. कोविड लसीकरणाच्या यशातून भारताचं सामर्थ्‍य प्रदर्शित होत असून, १०० कोटी मात्रानंतर आज देश नवा उत्‍साह, नव्या ऊर्जेनं पुढे जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. १०० कोटी लसीकरणाच्या यशासोबत लाखों प्रेरक प्रसंग निगडित असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

जीवनात गीत-संगीत, कला आणि संस्‍कृतीच्या महत्त्वाबाबतही पंतप्रधानांनी चर्चा केली. सरकारनं स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्‍सवातदेखील कला, संस्‍कृती, गीत आणि संगीतानं रंग भरण्याचा निर्णय घेतला आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं देशभक्ती गीतं, रांगोळी आणि अंगाई गीतं स्पर्धा घेतल्या जाणार असल्याचं, त्यांनी सांगितलं. येत्या ३१ ऑक्टोबर- सरदार पटेल यांच्या जयंतीपासून या स्पर्धांना सुरूवात होणार आहे. जीवन सार्थक बनवायचं असेल तर साऱ्या कला जीवनात उत्प्रेरकाचं, उर्जा वाढवण्याचं काम करतात असंही पंतप्रधान म्हणाले.

येत्या रविवारी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी होत आहे. या दिवसानिमित्त एकतेचा संदेश देणाऱ्या कोणत्या न कोणत्या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावं, ही आपली जबाबदारी आहे, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

****

अनुसूचित जातींच्या वर्गीकरणासाठी संसदेत विधेयक आणण्यसाठी प्रयत्न सुरु असल्याचं, केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितलं आहे. मदिगा कर्मचारी संघटनेनं आयोजित केलेल्या एका सभेत ते काल बोलत होते. राखीव जागांमधे अनुसूचित जातींचं वर्गीकरण करायला भाजपा अनुकूल असल्याची ग्वाही त्यांनी दिली. वर्गीकरणाच्या मागणीला आपला पाठिंबा असून, त्याकरता सर्वोच्च न्यायालयाकडून सात सदस्यांचं पीठ स्थापन करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असं आश्वासन त्यांनी दिलं. 

****

राज्यात विभागीय स्तरावर कर्करोग रुग्णालयं उभारण्याचा विचार असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते काल जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. स्तनाच्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण आणि त्याबाबतच्या जोखीमीचा अहवाल पाहता, हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उरलेल्या निधीचा यासाठी वापर केला जाणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

****

राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या काल झालेल्या परिक्षेत अनेक ठिकाणी गोंधळ उडाला. त्यामुळे अनेक विद्यार्थी परिक्षा देऊ शकले नाहीत. औरंगाबाद शहरात या परिक्षेसाठी अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी आले, मात्र त्यांना केंद्रंच सापडली नाही. परिक्षा देण्यासाठी उमेदवारांना धावपळ करावी लागली. सकाळच्या सत्रातल्या परिक्षेला ५४ टक्के विद्यार्थी उपस्थित राहू शकले नाही.

पुणे आणि नाशिकमध्येही परीक्षेदरम्यान गोंधळ झाला. पुण्यात अबेदा इनामदार महाविद्यालयात बऱ्याच मुलांना हॉल तिकीटचा क्रमांक मिळाला नाही. नाशिक शहरालगत असलेल्या गिरणारे इथल्या परीक्षा केंद्रावर उशिरानं आणि अपूर्ण पेपर आल्यानं विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी प्रत्यक्ष केंद्रावर भेट दिली आणि पेपर फुटला नसल्याची ग्वाही दिली. राज्यात इतरत्र ठिकाणी परिक्षा सुरळीत पार पडली. 

****


दरम्यान, आरोग्य विभागाच्या काल झालेल्या परीक्षेत तिसऱ्यांदा गोंधळ उडाल्याची टीका, भारतीय जनता पक्षानं केली आहे. या गोंधळाला आरोग्यमंत्री राजेश टोपे हेच जबाबदार असून, याची जबाबदारी स्वीकारत टोपे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केली.

****

आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबी मुंबईचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी आठ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप या प्रकरणातले पहिले साक्षीदार प्रभाकर साईल यांनी केला आहे. आर्यनच्या अटकेचा संपूर्ण घटनाक्रम साईल यांनी नोटरीच्या स्वाक्षरीने केलेल्या शपथपत्रात मांडला असून, त्यांचा व्हिडिओ देखील सामाजिक माध्यमावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, वानखेडे यांनी हे आरोप फेटाळले असल्याचं, क्षेत्रीय उप-महासंचालक मुथा अशोक जैन यांनी सांगितलं. साईल यांनी हे शपथपत्र सामाजिक माध्यमाऐवजी न्यायालयात सादर करायला पाहिजे होतं, असं ते म्हणाले.

****

राज्यात काल एक हजार ४१० नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख दोन हजार, ९६१ झाली आहे. काल १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४० हजार १६ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल एक हजार ५२० रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६४ लाख ३५ हजार ४३९ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ४६ शतांश टक्क्यांवर कायम आहे. राज्यात सध्या २३ हजार ८९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ६३ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत तीघे जण औरंगाबाद जिल्ह्यातले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात काल २० नवे रुग्ण आढळले, बीड जिल्ह्यात १८, उस्मानाबाद १६, नांदेड चार, लातूर तीन, तर हिंगोली आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. परभणी जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या आठ बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. औरंगाबाद, गंगापूर, लासूर स्टेशन, पैठण, वैजापूर खुलताबाद आणि फुलंब्री या बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी १७ जानेवारीला मतदान होईळ, तर १८ जानेवारीला निकाल घोषित होतील. कन्नड आणि सिल्लोड या बाजार समित्यांसाठी पाच फेब्रुवारीला मतदान तर सहा फेब्रुवारीला निकाल घोषित होईल. जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी काल ही माहिती दिली.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या तोंडोळी इथल्या पीडित महिलांची, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट घेऊन संवाद साधला. या महिलांची वैद्यकीय तपासणी, तसंच त्यांना जलदगतीनं आर्थिक आणि इतर मदत मिळावी, याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. पोलीस प्रशासनालाही लवकरात-लवकर आरोपपत्र दाखल करण्याबरोबरच संशयितांना ताब्यात घेण्यासंबंधी सूचना गोऱ्हे यांनी केली.

****

परभणी जिल्ह्यातल्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यासाठी सर्व धर्मगुरुंना सोबत घेवून, आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्यानं लसीकरण शंभर टक्के पुर्ण करण्यासाठी नियोजन करावं, असे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले आहेत. काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी १० रुग्णवाहिकांचं लोकार्पण मलिक यांच्या हस्ते झालं.

दरम्यान, कृषी मंत्री दादा भुसे आज परभणी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आज सकाळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.

****

टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत काल दुबई इथं झालेल्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करत भारतानं दिलेलं १५२ धावांचं लक्ष्य पाकिस्ताननं एकही गडी न गमावता पूर्ण केलं.

अन्य एका सामन्यात श्रीलंकेनं बांगलादेशाचा पाच गडी राखून पराभव केला. बांगलादेशानं श्रीलंकेसमोर १७२ धावांचं लक्ष्य ठेवलं, श्रीलंका संघानं १९ व्या षटकांतच हे लक्ष्य साध्य केलं.

****

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त काल धुळे जिल्ह्यातल्या मुकटी इथं गांधी शांती परीक्षा घेण्यात आली.  लोकहिताय ग्रामीण विकास संस्था आणि सर्वोदय संवाद यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या या परीक्षेत, युवक, युवती मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. युवा-युवतींची वैचारिक बुद्धी प्रगल्भ व्हावी आणि वाचनाची आवड निर्माण व्हावी, या हेतूनं ही परीक्षा घेण्यात आली.

****

औरंगाबाद इथं लाचलुचपत प्रतिबंधक विभागातेर्फे उद्यापासून एक नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह २०२१चं आयोजन करण्यात आलं आहे. याकाळात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

****

लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देण्यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे शिफारस करावी, यासह इतर मागण्यांसाठी काल परभणी इथं लिंगायत समन्वय समितीतर्फे महामोर्चा काढण्यात आला. राज्यातल्या लिंगायत धर्मियांना अल्पसंख्याक दर्जा लागू करावा, राज्यात महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं, परभणी शहरात महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास हा समाज आक्रमकपणे आंदोलन करेल, असा इशारा समितीनं यावेळी दिला.

****

हिंगोली लोकसभा मतदारसंघातला कोणताही दिव्यांग बांधव शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेणार असल्याचं, खासदार हेमंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल हिंगोलीत दिव्यांगांना आवश्यक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. खासदार म्हणून मिळणारं वेतन, आपल्या मतदारसंघातल्या दिव्यांग बांधवांचा विमा काढण्यासाठी देत असल्याची घोषणा, खासदार पाटील यांनी यावेळी केली. या कार्यक्रमात तीन हजारावर लाभार्थींना, सुमारे दोन कोटी ७७ लाख रुपयांच्या साहित्याचं वाटप करण्यात आलं.

****

आज २५ ऑक्टोबर रोजी लातूर शहर महानगरपालिकेच्या स्थापनेस १० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त दशकपूर्ती महोत्सव साजरा केला जाणार असून, पुढील महिनाभर विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी ही माहिती दिली. या अंतर्गत क्रीडा, शैक्षणिक तसंच कार्यालयीन स्पर्धांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे. या काळात शहरातल्या महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्रीचे स्टॉलही उभे केले जाणार आहेत.

****

बीड जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने काल अंबाजोगाई इथं कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार रजनी पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला. मेळाव्याला उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी शहराच्या विविध भागातून वाहनफेरी काढली.

****

नमामि गोदा फाउंडेशन या संस्थेनं नदीचं राष्ट्रगान तयार केलं आहे. काल नाशिक इथं जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि जलतज्ञ राजेंद्रसिंह यांच्या हस्ते, या नदीच्या राष्ट्रगानचं लोकार्पण करण्यात आलं. प्रख्यात गायक शंकर महादेवन यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत, नाशिकच्या शिक्षण उपसंचालकांनी सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीताप्रमाणे सक्तीचं केलं आहे. नाशिक मधले पर्यावरण प्रेमी अनेक वर्षांपासून, गोदावरी नदीच्या स्वच्छतेपासून तिच्या संवर्धनासाठी शासकीय यंत्रणेचं लक्ष वेधण्यासाठी काम करत आहेत. फक्त शासकीय यंत्रणांनीच नव्हे तर नागरिकांनी सर्वच नद्यांचं पावित्र्य जपावं आणि नदीचा सन्मान करावा यासाठी, हे गीत तयार करण्यात आलं आहे.

****

 

हवामान

येत्या दोन दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील, असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.

****

No comments:

Post a Comment