Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 November 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ नोव्हेंबर २०२१ सायंकाळी ६.१०
****
केंद्र आणि राज्य
सरकारनं घरोघरी जाऊन कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या
मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी
अद्याप लस घेतली नाही. त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करावं, कोरोना विषाणू संसर्गाचा
धोका अद्याप संपलेला नाही, हे विसरू नका. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या.
मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित
अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी
किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** राज्यात सर्व मराठी शाळांमध्ये पहिलीपासून द्वैभाषिक अभ्यासक्रम लागू करणार
** एसटीच्या उस्मानाबाद विभागात
साडे तीनशे एसटी कर्मचारी आज कामावर हजर
** महाविकास आघाडी सरकारचा जनता जनार्दनच योग्य वेळी निकाल
लावेल - भाजप आमदार गिरीश महाजन यांची टीका
आणि
** इंडोनेशिया खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत भारताचं आव्हान
संपुष्टात
****
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व मराठी माध्यम शाळांत पहिलीपासून द्वैभाषिक अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे.
शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना मराठी बरोबरच इंग्रजी भाषेतील संज्ञा, संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात, इंग्रजी भाषेतील शब्दांची ओळख व्हावी, हा या मागचा हेतू असल्याचं त्या म्हणाल्या. सध्या ४८८ आदर्श शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर
पहिलीच्या अभ्यासक्रमात एकात्मिक तसंच द्वैभाषिक पुस्तकांचा
समावेश करण्यात आला आहे. या पथदर्शी प्रकल्पाचं यश पाहता
मराठी शाळांत याची अंमलबजावणी करण्यात येईल, त्यानंतर
टप्प्याटप्प्याने पुढील वर्गाच्या अभ्यासक्रमात इतर शाळांमध्ये याची अंमलबजावणी केली
जाणार आहे. मराठी शब्दांच्या जोडीला सोप्या इंग्रजीमधील शब्द,
वाक्यांचा उपयोग समजावा, अशाप्रकारे पाठ्यपुस्तकांची रचना
करावी, असे निर्देश राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि
अभ्यासक्रम संशोधन मंडळाना दिले असल्याचं प्राध्यापक गायकवाड यांनी सांगितलं.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या उस्मानाबाद विभागातील दोन हजार सातशे कर्मचाऱ्यांपैकी साडे तीनशे कर्मचारी आज कामावर हजर झाले. यांत्रिकी, प्रशासकीय विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. कामावर हजर झालेल्या चालक, वाहकांच्या मदतीने तुळजापूर आणि उमरगा आगारातून प्रत्येकी दोन बस सोडण्यात आल्या आहेत. दरम्यान, उस्मानाबाद आगारातील एका बसला डेपो बाहेर काढतांना चालक चक्कर येऊन कोसळला. त्याला उचलण्यासाठी गेलेल्या आगार संचालकाच्या अंगावर आंदोलनकर्ते धावून गेल्याने काही काळ उस्मानाबाद बस स्थानकात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी संबंधितकर्मचाऱ्याला वैद्यकीय उपचारांसाठी तात्काळ दवाखान्यात दाखल केलं. महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याचं आवाहन विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी केल आहे.
****
धुळे आगारात एसटी कामगारांचा संप
मोडून काढण्यासाठी आता कठोर पावले उचलली जात आहेत. बसस्थानकात आंदोलनासाठी
उभारलेला मंडप आज हटवण्यात आला. दरम्यान आज ४ कामगार कामावर रुजू झाले असून, इतर कामगार मात्र
आंदोलनावर ठाम आहेत. आंदोलन मागे घेवून त्वरीत काम सुरु करावं, अन्यथा बडतर्फीची कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
****
केंद्रीय तपास यंत्रणांकडून अनिल देशमुखांसारखी कारवाई
होईल या भीतीमुळे नबाव मलिक केंद्रीय तपास यंत्रणेवर आरोप करत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष
नेते प्रवीण दरेकर यांनी केली
आहे. आज दरेकर यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या सातपुडा तापी परिसर सहकारी कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यसरकार
हे वसुली सरकार म्हणून बदनाम झालं असल्याचं सांगत, तपास यंत्रणा आपल्या चौकटीतच काम करत असल्याचं ते म्हणाले.
****
भ्रष्टाचाराच्या, गैरवर्तनाच्या आरोप असलेल्या मंत्र्यांना
पाठीशी घालणाऱ्या आणि शेतकरी, एसटी कर्मचारी, राज्यसेवा आयोगाचे विद्यार्थी अशा अनेक
समाजघटकांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा पापाचा
घडा भरला आहे. अशा कुचकामी सरकारचा जनता जनार्दनच योग्य वेळी निकाल लावेल, अशी टीका
राज्याचे माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे. ते
आज औरंगाबाद इथं महाविकास आघाडी सरकारच्या फसवणुकीची दोन वर्ष या अंतर्गत पत्रकार परिषदेत
बोलत होते. परिवहन मंत्र्याची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी सुरु आहे. गृहमंत्र्याला
१०० कोटी वसुलीचा आरोप झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागला, तर एका मंत्र्याला तरुणीच्या
आत्म्यहत्येला जबाबदार असल्याचा आरोप झाल्यानं मंत्रीपद सोडणे भाग पडल्याचं त्यांनी
यावेळी सांगितलं.
****
राज्यातील लघु उद्योग कोविडमुळे अडचणीत आले आहेत. त्यांना
उभे राहण्याची ताकद देण्यासाठी आणि नवीन आव्हाने पेलण्यासाठी सर्व जिल्ह्यात उद्योजकांचे
मेळावे घेण्यात येणार असल्याची माहिती लघु भारतीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र
वैद्य यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत दिली. उद्योग वाढ, आर्थिक शिस्त आणि साक्षरता,
आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि त्याच बरोबर मानव संसाधन विकास आणि रोजगार निर्मिती
या क्षेत्रात तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी
सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार
योजनेअंतर्गत एकही पात्र व्यक्ती या योजनेच्या लाभा पासून वंचीत राहू नये यासाठी
लातूर शहरात प्रभाग निहाय शिबीराचं आयोजन करण्यात येत आहे. काँग्रेस
कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरी जाऊन या संदर्भात माहिती दयावी आणि निराधाराचे अर्ज
भरून घ्यावेत असं आवाहन जिल्ह्याचे
पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केलं आहे. शासन आपल्या दारी या मोहिमे
अंतर्गत समाजातील निराधार, उपेक्षित घटकांना आधार देण्यासाठी संजय गांधी निराधार
योजनेच्या वतीने लातूर शहरातल्या प्रभाग पाच मध्ये संजय गांधी निराधार योजना
समाधान शिबिराचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलंत होते.
****
इंडोनेशिया खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात
आलं आहे.
या स्पर्धेत आज झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या
सामन्यात भारताच्या पी व्ही सिंधूचा थायलंडच्या रतचानोक इंतानोन हिनं २१-१५, ९-२१,
१४-२१ असा पराभव केला.
पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी जोडीचा
इंडोनेशियाच्या मार्कस् फर्नाल्डी गिदोन आणि केविन संजय सुकामुल्जो जोडीनं १६-२१, १८-२१
असा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment