Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 November 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ नोव्हेंबर २०२१ सायंकाळी ६.१०
****
·
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ, पावसाळी अधिवेशनाच्या
शेवटच्या दिवशी झालेल्या अभूतपूर्व गोंधळावरुन विरोधी पक्षाच्या राज्य सभेतील १२ खासदारांचं
निलंबन.
·
तिन्ही कृषी कायदे मागे घेणारं विधेयक संसदेत आवाजी मतदानानं
मंजूर.
·
राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या २२ ते २८ डिसेंबर दरम्यान
मुंबईत होणार.
·
कोविड ओमायक्रॉन विषाणू संसर्गाबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत
चिंता व्यक्त.
·
स्थानिक स्वराज्य संस्थामधील राखीव जागांवर निवडणुका लढवणाऱ्या
व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १२ महिन्यांची मुदतवाढ.
आणि
·
कानपूर इथं खेळला गेलेला पहिला कसोटी क्रिकेट सामना अनिर्णित
राखण्यात न्युझीलंडला यश.
****
संसदेच्या
हिवाळी अधिवेशनाला आज प्रारंभ झाला. अधिवेशनात आज पहिल्याच दिवशी कृषी मूल्य, पेगॅसस
हेरगिरी आदी प्रकरणांवरुन विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी केल्यानं लोकसभा आणि राज्यसभेचं
कामकाज आधी दुपारी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
दरम्यान,
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या अभूतपूर्व गोंधळावरुन विरोधी
पक्षाच्या राज्य सभेतील १२ खासदारांचं संसदेचं हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात
आलं आहे. निलंबित खासदारांमध्ये शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी आणि अनिल देसाई यांचा
समावेश आहे. याशिवाय काँग्रेसचे सहा, कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येकी
दोन खासदारांचा यात समावेश आहे.
****
संसदेनं
आज तिन्ही कृषी कायदे मागे घेणारं विधेयक आवाजी मतदानानं मंजूर केलं. केंद्रीय कृषी
मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी प्रथम लोकसभेत हे विधेयक मांडलं. त्यानंतर विरोधकांनी
केलेल्या गदारोळाच्या वातावरणात वाद - प्रतिवाद शक्य नसल्यानं हे विधेयक कोणत्याही
चर्चेविना मंजूर झाल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जाहीर केलं. लोकसभेत मंजूर
झाल्यानंतर हे विधेयक राज्य सभेत मांडण्यात आलं. या सभागृहातही गदारोळ झाला. या गदारोळातच
हे विधेयक संमत करण्यात आलं.
तत्पूर्वी,
लोकसभा आणि राज्यसभेत कामकाज सुरु होताच नवीन सदस्यांना शपथ देण्यात आली. यामध्ये राज्यातून
बिनविरोध निवडून गेलेल्या रजनी पाटील यांचा समावेश आहे. दोन्ही सभागृहांनी आज दिवंगत
सदस्यांना श्रद्धांजली वाहिली.
****
राज्य
विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत होणार आहे. विधिमंडळ
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, असं संसदीय कामकाज मंत्री
अनिल परब यांनी सांगितलं. या हिवाळी अधिवेशनात एकूण १२ विधेयकं मांडली जाणार आहेत.
तारांकीत प्रश्नांसंदर्भात येत्या गुरुवारी सभापतींकडे बैठक होणार आहे, असं परब यांनी
सांगितलं.
२४
डिसेंबरला विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची पुन्हा बैठक घेऊन अधिवेशन वाढवण्याबाबत
निर्णय होईल, असंही त्यांनी सांगितलं. अधिवेशन कालावधीत कोविड लसीच्या दोन्ही मात्रा
घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे, यासोबतच आरटीपीसीआर चाचणी देखील अनिवार्य करण्यात
आली आहे, असं ते म्हणाले.
कामकाज
सल्लागार समितीच्या बैठकीनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चार
ते पाच दिवसांचं तोकडं अधिवेशन होणार असल्याची टीका केली आहे. पहिला दिवस पुरवणी मागण्यांचा असणार आहे. अधिवेशनाचा
कालावधी वाढवण्याची आमची मागणी आहे, मात्र संसदीय कामकाजात सरकारला रस दिसत नाही, त्यामुळे
अधिवेशन टाळण्याचे प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
****
कोविडच्या
ओमायक्रॉन या विषाणू प्रकाराचा संसर्ग रोखण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत
चर्चा झाली. यावेळी सदस्यांनी या नव्या विषाणुच्या प्रसाराबाबत चिंता व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संसर्गाला वेळीच रोखण्यासाठी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची
माहिती नियमितरित्या मिळणं आवश्यक असल्याचं सांगितलं. यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवता
येईल आणि संसर्गाला आळा घालता येईल असं ते म्हणाले. केंद्र सरकारनं १२ देशातल्या प्रवाशांची
तेथून विमानात बसण्यापूर्वी ७२ तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली असून भारतात
उतरल्यावर परत एकदा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. तसंच सात दिवसांसाठी विलगीकरणही
अनिवार्य केलं आहे.
मात्र
परदेशातून येणारे प्रवासी थेट मुंबईत किंवा राज्यातील इतर विमानतळांवर न उतरता देशात
इतरत्र उतरून नंतर देशांतर्गत विमान सेवेनं किंवा रस्ते अथवा रेल्वे मार्गानं आल्यास
त्यांची तपासणी कशी करणार हा सध्याचा प्रश्न आहे. याबाबत पंतप्रधानांना अवगत करण्यात
यावं यावर बैठकीत चर्चा झाली.
****
राज्यातील
स्थानिक स्वराज्य संस्थामधील राखीव जागांवर निवडणुका लढवणाऱ्या व्यक्तींना जात वैधता
प्रमाणपत्र सादर करण्यास १२ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळानं
आज घेतला. यामध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या
व्यक्तींना निवडून आल्याचे घोषित झाल्यापासून १२ महिन्यांच्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र
सादर करता येणार आहे. मात्र निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या दिनांकापूर्वी
त्या व्यक्तीनं जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी समितीकडे अर्ज केलेला असणं आवश्यक आहे.
या संदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेनं काढण्यात येणार आहे.
केवळ
जात वैधता प्रमाणपत्रा अभावी महानगर पालिका तसंच नगर परिषद निवडणूक लढवण्यापासून वंचित
राहू नये म्हणून उमेदवारांना, जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत ३१ डिसेंबर
२०२२ पर्यंत वाढवण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
****
राज्यातील
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढवण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रीमंडळानं
काल मान्यता दिली. सध्या राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किमान ५० तर कमाल
७५ इतकी आहे. आता त्यात वाढ होऊन ही संख्या किमान ५५ तर कमाल ८५ अशी करण्यात आली आहे.
या सुधारणेमुळे सध्याची जिल्हा परिषद सदस्यांची संख्या दोन हजार वरुन दोन हजार २४८
इतकी तर याबरोबरच पंचायत समिती सदस्यांची संख्या देखील आपोआप चार हजार वरुन चार हजार
४९६ इतकी होईल. या संदर्भातील विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.
****
कानपूर
इथं खेळला गेलेला पहिला कसोटी क्रिकेट सामना अनिर्णित राखण्यात न्युझीलंडला यश आलं.
आज शेवटच्या दिवशी एक बाद चार धावांवरून पुढे खेळण्यास प्रारंभ केला. टॉन लॅथम, विल्यियम
सोमरविल, रचिन रविंद्र आणि एजाज पटेल यांनी चिवट फलंदाजीचं प्रदर्शन करत सामना अनिर्णित
राखण्यात यश मिळवलं. अंधूक प्रकाशामुळे पाचव्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा
न्यूझीलंडनं ९ बाद १६५ धावा केल्या होत्या.
भारताकडून
रविंद्र जडेजानं चार, रविचंद्रन अश्विननं तीन तर अक्षर पटेल आणि उमेश यादवनं प्रत्येकी
एक गडी बाद केला. पदार्पणात शतक ठोकणाऱ्या श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्कार मिळाला.
****
देशाच्या
युवा पिढीचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणीनं कालपासून नवा उपक्रम
हाती घेतला आहे. पुढील ५२ आठवडे देशभरातली आकाशवाणी केंद्र, स्थानिक महाविद्यालयं आणि
विद्यपीठातील युवा वर्गाला कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी देणार आहे. पुढील
वर्षभरात देशातील १६७ आकाशवाणी केंद्रांमध्ये एक हजारांहून अधिक शैक्षणिक संस्थांमधले
सुमारे २० हजार विद्यार्थी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत या उपक्रमात सहभागी
होणार आहेत. सर्व प्रमुख भारतीय भाषांमधून या कार्यक्रमाचं प्रसारण होईल.
****
औरंगाबाद
इथं सातव्या राज्यस्तरीय महाॲग्रो २०२२ या कृषी प्रदर्शानाचं सात ते १० जानेवारी दरम्यान
आयोजन करण्यात आलं आहे. सीएमआयएचे अध्यक्ष आणि या प्रदशनाचे संयोजन समिती सदस्य शिवप्रसाद
जाजू यांनी आज ही माहिती दिली. पैठण मार्गावर असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात
हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
//*************//
No comments:
Post a Comment