▼

Monday, 22 November 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.11.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 November 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ नोव्हेंबर २०२१ सकाळी ७.१० मि.

****

केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघरी जाऊन कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करावं. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही, हे विसरू नका. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      भविष्यात भारत फक्त स्वतःच्या नव्हे तर जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जहाजांची निर्मिती करू शकेल- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

·      राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अद्यापही कायम, प्रतिक्षा यादीतल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यास प्रारंभ

·      वीज वितरणच्या औरंगाबाद परिमंडळातल्या साडेतीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे थकबाकीमुक्ती योजनेत एक हजार आठशे अठरा कोटी बेचाळीस लाख रुपये माफ

·      मास्क नसलेल्या ग्राहकांना पेट्रोल देणाऱ्या औरंगाबाद शहरातील बाबा पेट्रोल पंपाला टाळं

·      राज्यात ८४५ तर मराठवाड्यात ३६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण

आणि

·      न्यूझीलंड विरूद्धचा तिसरा टी-ट्वेंटी क्रिकेट सामना ७३ धावांनी जिंकत भारताचा ३-० असा मालिका विजय

****

भविष्यात भारत फक्त स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाही, तर जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठीही जहाजांची निर्मिती करू लागेल असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. INS विशाखापट्टणम ही क्षेपणास्त्ररोधी विनाशिका काल भारतीय नौदलाच्या सेवेत प्रत्यक्ष दाखल झाली, त्यानिमित्त मुंबईत झालेल्या सोहळ्यात ते बोलत होते.

INS विशाखापट्टणम ही युद्धनौका १६३ मीटर लांबीची असून, आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असल्यानं, जगातली आधुनिक क्षेपणास्त्ररोधी विनाशिकांपैकी एक असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. या विनाशिकेची संरचनात्मक संकल्पना पूर्णतः भारतीय आहे, तर ७५ टक्के यंत्रसामग्री भारतीय बनावटीची आहे.

गेल्या काही काळात भारतीय नौदलात दाखल झालेल्या ४१ पैकी ३९ जहाजं आणि पाणबुड्यांची निर्मीती भारतातल्याच जहाज निर्मिती व्यवस्थापनांमध्ये झालेली आहे, यातून नौदलाची आत्मनिर्भर भारतासाठीची वचनबद्धता दिसून येते असं मत राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

कोविन या डिजिटल मंचावर एक नवीन सुविधा देण्यात आली असून याद्वारे आपण आपल्या लसीकरणाविषयी माहिती जाणून घेऊ शकता. या अॅपद्वारे पर्यटन कंपन्यांना ग्राहकांच्या लसीकरणाची स्थिती माहीत होऊ शकते तसंच या सुविधेमुळे इतर अनेक संस्था आणि कार्यालयं सुरु करण्यात सुलभता येऊ शकणार आहे, अस केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ घेण्यासाठी सध्याचे संयुक्त बँक खाते पुरेसे असून नवीन संयुक्त बँक खाते उघडण्याची गरज नसल्याचं कार्मिक खात्याचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. कुटुंबातल्या सदस्यांनी सध्या अस्तित्वात असलेल्या संयुक्त बँक खात्याची निवड केली तर बँकांनी त्यांना नकार देऊ नये, असे आदेश सिंग यांनी बँकांना दिले आहेत. कुटुंब निवृत्तीवेतन लगेच सुरू व्हावं, त्यात कुठलेही अडथळे येऊ नये यासाठी संयुक्त बँक खात्याची गरज आहे. यासाठी कमीत कमी कागदपत्र लागतात, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

****

राज्य परिवहन मंडळ- एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अद्यापही कायम आहे. काल दिवसभरात ४ हजार १४४ एस टी कर्मचारी कामावर हजर झाले. महामंडळाचं राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या संपामुळे राज्यभरातली एस टी ची वाहतूक गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाली आहे.

दरम्यान, महामंडळानं भरतीच्या प्रतिक्षा यादीतल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यास सुरुवात केली आहे. या नवनियुक्त चालकांची सेवा कालपासून सुरु झाली असून, काल राज्यातल्या विविध मार्गांवर राज्य परिवहन मंडळाच्या १६७ बस धावल्या.

दरम्यान, प्रशिक्षणार्थी चालकांची मदत घेऊन जळगाव आगारातून चोपड्याकडे निघालेल्या ४ बसवर अज्ञातांनी काल दगडफेक केली. तर धुळे तालुक्यात ४ बसवर ही काल अज्ञांतांनी दगडफेक केली. यात ४ बसचं नुकसान झालं तर एक चालक किरकोळ जखमी झाला. औरंगाबाद जिल्ह्यात पाचोडनजिकही एसटी बसवर दगडफेकीची घटना घडली.

****

भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मंत्री विनोद तावडे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काल याबाबतचं पत्र जारी केलं. याशिवाय रितुराज सिन्‍हा आणि आशा लाखडा यांचीही पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पदावर तसंच पश्चिम बंगालचे भारती घोष आणि शहजाद पुनावाला यांची पक्षाचे प्रवक्ता म्हणून नियुक्ती केली आहे.

****

 

कृषिपंपाच्या वीज बिलातल्या थकबाकीत सुमारे सहासष्ट टक्के सूट मिळवण्याची संधी राज्य शासनानं महा कृषी ऊर्जा अभियानाद्वारे दिली आहे. यात औरंगाबाद परिमंडळातल्या साडेतीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधले एक हजार आठशे अठरा कोटी बेचाळीस लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांनी चालू वीजबिल आणि सुधारित थकबाकीपैकी पन्नास टक्के रक्कम  मार्च २०२२ पर्यंत भरल्यास उरलेली थकबाकीही माफ होणार आहे. या योजनेचा लाभ घेत औरंगाबाद परिमंडळातले दोन हजार आठशे चोपन्न शेतकरी वीजबिल थकबाकीतून मुक्त झाले आहेत.

दरम्यान वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेत भाग न घेणाऱ्या आणि चालू वीजबिलांचाही भरणा न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. महावितरणवरचं आर्थिक संकट अतिशय गंभीर असल्यामुळे शेतकऱ्यांनी किमान चालू वीजबिलांचा भरणा करावा, असं आवाहन महावितरणनं केलं आहे. आतापर्यंत औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या ५३ हजार ९०१ शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्ती योजनेत सहभाग  नोंदवला आहे.

****

कोविड विषयक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध औरंगाबाद जिल्हा प्रशासन कठोर कारवाई करत आहे. मास्क नसलेल्या नागरिकांच्या वाहनात पेट्रोल भरत असल्याचं निदर्शनास आल्यानं शहरातल्या बाबा पेट्रोल पंपाला काल रात्री टाळं लावण्यात आलं तर शहरानजीकच्या चितेगाव इथल्या आरोग्य उपकेंद्रात लसीकरण मोहिमेत अडथळा निर्माण करणाऱ्या दोन नागरिकांना अटक करुन त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

राज्यात काल ८४५ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख २९ हजार, ८७५ झाली आहे. काल १७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४० हजार ७३९ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल ७३० रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६४ लाख ७५ हजार ६८२ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ६७ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ९ हजार ७९९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ३६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर एकाही रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नाही.

औरंगाबाद जिल्ह्यात १३ नवे रुग्ण आढळले. बीड १०, जालना ६, लातूर,  नांदेड तसंच परभणी जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर उस्मानाबाद जिल्ह्यात एक रुग्ण आढळला. हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथले मराठी कवी संदीप जगदाळे आणि हिंदी कवी अंचित यांना पहिला केदारनाथ सिंह स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचं हे पहिलंच वर्ष असून २५ हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. संदीप जगदाळे यांच्या असो आता चाड या कवितासंग्रहाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून बनारस इथं लवकरच हा पुरस्कार जगदाळे आणि अंचित यांना प्रदान करण्यात येईल.

****

परभणी इथे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पुढाकारातून मागच्या महिन्यात झालेल्या मोतीबिंदू तपासणी शिबिरातल्या शंभर रुग्णांची पहिली तुकडी शस्त्रक्रिया करण्यासाठी काल मुंबईला रेल्वेनं रवाना झाली. 'संकल्प मोतीबिंदू मुक्त परभणी' या अभियानांतर्गत पद्मश्री तात्याराव लहाने यांनी मागच्या महिन्यात झालेल्या शिबिरात तपासणी करून सुमारे दोन हजार रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड केली होती. या सगळ्या रुग्णांवर मुंबईत जे.जे. रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

****

कोलकाता इथं झालेल्या न्यूझीलंड विरूद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांत भारतानं ७३ धावांनी विजय मिळवला. सलग तिसऱ्या विजयामुळे भारतानं ही मालिका ३-० अशा  फरकानं जिंकली आहे.

कालच्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करताना, कर्णधार रोहीत शर्माच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर निर्धारित षटकांत १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडचा संघ १८व्या षटकात १११ धावा करुन सर्वबाद झाला.

दरम्यान, दोन्ही संघात आता दोन कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका होणार आहे. पहिली कसोटी येत्या २५ नोव्हेंबरपासून कानपूर इथं तर दुसरी कसोटी तीन डिसेंबरपासून मुंबईत खेळवली जाणार आहे.

****

मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी सुक्ष्म पाणलोटाच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडवावा, असं आवाहन कृषीभूषण विजय अण्णा बोराडे यांनी केलं आहे. काल औरंगाबाद इथं थोर स्वातंत्र्य सेनानी पद्मविभूषण गोविंद भाई श्रॉफ स्मृती पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते, जयाजी पाईकराव यांना बोराडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. स्मृती चिन्ह, शाल-श्रीफळ आणि एकवीस हजार रुपये, असं पुरस्काराचे स्वरूप आहे. बदलत्या हवामानामुळे पीक रचनेत बदल करणं आवश्यक असल्याचं बोराडे यांनी नमूद केलं. विजेच्या वाढत्या मागणीसाठी शेतात सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात येवून त्याचा मोबदला शेतकऱ्यांना द्यावा असं आवाहनही बोराडे यावेळी केलं.

पुरस्काराला उत्तर देताना, पाईकराव यांनी, हिंगोलीतील कयाधू नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी २१ सामाजिक संघटनांना सोबत घेवून काम सुरु असल्याचं सांगितलं.

****

महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट आणि नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, असा गंभीर आरोप विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी केला आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी आघाडी सरकारला प्रत्यक्षात आणता आली नसल्याचं सांगत, महाआघाडी सरकारनं पीक विमा कंपन्यांसाठी फायदेशीर अटी तयार केल्यानं राज्यातल्या तीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी या वर्षी पीक विमा काढलाच नाही, याकडे बागडे यांनी लक्ष वेधलं. उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात बंद पाळणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेतृत्वाला राज्यात संकटग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी वेळ काढता आला नाही अशी टीकाही बागडे यांनी केली.

****

हवामान

येत्या २४ तासात मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र्, कोकण , गोवा आणि विदर्भात काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. या काळात राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही वेधशाळेनं वर्तवली आहे.

****

No comments:

Post a Comment