▼

Monday, 22 November 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.11.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ नोव्हेंबर २०२१ सकाळी ११.०० वाजता

****

देशात गेल्या चोवीस तासात ८ हजार नवे कोविड रुग्ण आढळले तर २४९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या २४ तासात १२ हजार रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या देशभरात १८ हजार ४४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान देशात आतापर्यंत ११६ कोटी ८७ लाखांहून अधिक तर गेल्या २४ तासात ३२ लाख ९९ हजारांहून अधिक लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य विभागानं कळवलं आहे.

****

दिवाळीच्या सुट्या संपवून आजपासून राज्यातल्या शाळा सुरु होत आहेत. मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर केवळ ८ वी ते दहावीचे वर्ग सुरू होणार आहेत.

****

आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांनी भारतात येऊन चित्रिकरण करावं असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं आहे. गोव्यात सुरु असलेल्या ५२व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या

इंडियन पॅनोरामा विभागाचं उद्घाटन काल ठाकूर यांच्या हस्ते झालं; त्यावेळी ते बोलत होते. इंडियन पॅनोरामा विभागात कथानकांवर आधारित २४, तर कथाबाह्य २० भारतीय चित्रपट दाखवले जाणार आहेत.

****

परभणी इथल्या पोलीस मुख्यालयात विविध पदांसाठी खुली सैन्य भरती होणार असल्याची बनावट जाहिरात मागच्या काही दिवसापासून सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात फिरत आहे, मात्र अशा प्रकारची कोणतीही भरती परभणी जिल्ह्यात होणार नसल्याचं स्पष्टीकरण परभणीचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिलं आहे.

****

आंध्र प्रदेशातल्या पावसामुळे विजयवाडा विभागातील, काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात येत आहेत. मात्र आदिलाबाद-हुजूर साहिब नांदेड आणि हुजूर साहिब नांदेड-आदिलाबाद या दोन रेल्वेगाड्या आज त्यांच्या नियोजित वेळेवर धावणार आहेत.

****

No comments:

Post a Comment