Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 December 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ डिसेंबर २०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत
आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. आपल्या
सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस
घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी
घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९
शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत
वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर गरज भासल्यास राज्य सरकार
कठोर निर्बंध लावू शकतात- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार
·
ओमायक्रॉनशी लढण्यासाठी स्वयंजागरुकता आणि स्वयंशिस्त आवश्यक
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
राज्यात ३१ नवे ओमायक्रॉन बाधित
तर कोविडचे एक हजार ६४८ रुग्ण, मराठवाड्यात एकाचा मृत्यू, २९ नवे बाधित
·
कायदेशीर सल्ला घेऊन राज्यपाल आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत
निणर्य देणार
·
परभणी जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू
आणि
·
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या
पहिल्या दिवसअखेर, तीन बाद २७२ धावा
****
ओमायक्रॉन
विषाणूच्या पार्श्वभूमीवर गरज भासल्यास राज्य सरकार कठोर निर्बंध लावू शकतात, असं केंद्रीय
आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी म्हटलं आहे. त्या काल सांगली इथं प्रसारमाध्यमांशी
बोलत होत्या. ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार प्रतिबंधित क्षेत्र - कंटोनमेंट
झोन तयार करणं, कडक नियमावली लावणं, हे निर्णय राज्य सरकारनं घ्यायचे असल्याचं, पवार
यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या...
केंद्रसरकार सातत्याने कोविड नियंत्रणासाठी आपल पथक पाठवत
असत त्या त्या राज्यात संख्या वाढल्या तर तिथ गाईडलाईन देत असते, त्या राज्याशी चर्चा
पण करत असते आणि एक लक्ष ठेवून असते. आता लॉकडाऊनचा विषय हा राज्य सरकारचा असतो. एखाद्या
ठिकाणी पेशंटची संख्या वाढली तर तिथल नियंत्रण करन असेल, कंटोनमेंट झोन असतील किंवा तिथली व्यवस्था असेल, ती राज्याने द्यायची
असते. गरज पडल्यास लॉकडाऊनचा विषय असेल तर राज्यसरकारला ते अधिकार आहेत, ते करु शकतात.
ओमायक्रॉन
विषाणूचा संसर्ग लवकर होतो आणि तो बरा देखील लवकर होतो, तरीही नागरिकांनी सतर्क राहण्याची
आवश्यकता, पवार यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला दोन पॅकेज मधून
विशेष मदत करण्यात आली, यातून राज्यांना आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषध खरेदी
करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
दरम्यान,
कोल्हापूर इथं बोलताना भारती पवार यांनी, शासकीय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं
वारंवार नुकसान होत असेल, तर केंद्र शासन दखल घेऊन कारवाई करेल, असा इशारा दिला. राज्यात
आरोग्य विभागासह अन्य भरती परीक्षांमध्ये घोटाळा दिसून आल्यानं, ऐनवेळी परीक्षा रद्द
झाल्या. या अनुषंगानं पवार यांनी, काळ्या यादीतील संस्थांकडे परीक्षेची जबाबदारी कशी
दिली जाते, असा सवाल उपस्थित केला. या संदर्भात राज्य सरकार नेमकी काय कारवाई करत आहे,
हे कळत नसल्याचं, त्यांनी नमूद केलं.
****
भारती
पवार यांनी काल तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं. यावेळी वार्ताहरांशी बोलताना
त्यांनी, केंद्रानं ओमायक्रॉन आणि कोविडचा वाढता संसर्ग असलेल्या महाराष्ट्र, केरळ
आणि मिझोराम इथं पथकं पाठवली असून, परिस्थितीचा आढावा घेऊन हे पथक केंद्राला अहवाल
देईल, असं सांगितलं.
****
कोरोना
विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या स्वरुपाशी लढण्यासाठी स्वयंजागरुकता, स्वयंशिस्त आवश्यक
असून, आपली सामुहिक शक्ती कोरोनाचा पराभव करेल, या विश्वासासह आपणा सर्वांना २०२२ या
वर्षात प्रवेश करायचा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रम शृंखलेच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधत होते. तामिळनाडू
मध्ये हेलिकॉप्टर अपघातात हुतात्मा झालेले देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन
रावत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा, पंतप्रधानांनी यावेळी गौरवपूर्ण उल्लेख केला.
या
अपघातात मृत्युशी अनेक दिवस झुंज दिल्यानंतर मरण पावलेले कॅप्टन वरुण सिंह यांनी, आपल्या
शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहिलेल्या पत्राचाही, मोदी यांनी उल्लेख केला. या पत्रात
दिवंगत वरुण सिंह यांनी आपल्या यशाचा नव्हे तर आपल्या कमतरतांचा संदर्भ दिला असून,
आपल्यातल्या उणीवांवर मात करण्यासाठी, विशेष करुन विद्यार्थ्यांकरीता हे पत्र प्रेरणादायी
असल्याचं, पंतप्रधान यावेळी म्हणाले.
परीक्षांपूर्वी
आपण विद्यार्थ्यांशी चर्चा करणार असून, या कार्यक्रमासाठी माय जी ओ व्ही डाॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करता
येणार आहे. यामध्ये नववी ते बारावीचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी ऑनलाईन स्पर्धा
आयोजित करण्यात येणार आहे, यात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी
यावेळी केलं.
पुण्यातल्या
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेनं, इतर देशांच्या लोकांना महाभारताच्या
महत्त्वाविषयी परिचय करुन देण्यासाठी सुरु केलेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमाबद्दल, आणि देशविदेशातून
त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संवादातून प्रशंसा
केली.
****
आरोग्य
कर्मचारी आणि प्रत्यक्ष रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना, कोविड प्रतिबंधक
लसीचा तिसरा संरक्षक म्हणजेच बुस्टर डोस देण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेचं, मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केलं आहे. या लसीकरणाचं राज्यात
योग्य पद्धतीनं नियोजन केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
बुस्टर
डोस देण्यासंदर्भात अलिकडेच राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाली होती, आणि आमची ती मागणी
होतीच, असं मुख्यमंत्री म्हणाले. पंधरा ते अठरा वयोगटातल्या मुलांचं देखील लसीकरण केल्यामुळे,
विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी निश्चितपणे मदत होईल, तसंच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ
नागरिकांनादेखील बुस्टर डोसमुळे लाभ होईल, असं ते म्हणाले.
****
राज्यात
काल ओमायक्रॉन बाधित नवे ३१ रुग्ण आढळले. यामुळे आता राज्यातल्या एकूण ओमायक्रॉन बाधित
रुग्णांची संख्या, १४१ झाली असून, यापैकी ६१ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. काल आढळलेल्या
३१ नव्या रुग्णांपैकी मुंबईत २७, ठाण्यात दोन, तर पुण्यात तसंच अकोल्यात प्रत्येकी
एक रुग्ण आढळला. यापैकी १८ वर्षाखालील सहा आणि अन्य तीन असे नऊ रुग्ण वगळता, इतर २२
जणांचं कोविड लसीकरण पूर्ण झालेलं आहे. २९ रुग्णांमध्ये संसर्गाची कोणतीही लक्षणं नाहीत,
तर दोन रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं असल्याचं, आरोग्य विभागाच्या पत्रकात नमूद आहे.
****
राज्यात
काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ६४८ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ५७ हजार ८८८ झाली आहे. काल १७ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार
४३३ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल ९१८ रुग्ण
बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६५ लाख दोन हजार ९५७ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून
मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ६७ शतांश टक्के झाला आहे. राज्यात
सध्या नऊ हजार ८१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल २९ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला.
औरंगाबाद
जिल्ह्यात काल १२ नवे रुग्ण आढळले, लातूर जिल्ह्यात नऊ, जालना आणि परभणी जिल्ह्यात
प्रत्येकी तीन, तर उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
बीड तसंच हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवीन रुग्ण आढळला नाही.
****
अहमदनगर
जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वर इथल्या जवाहर नवोदय विद्यालयातले आणखी
३३ जण, कोरोना बाधित आढळून आले आहेत. या विद्यालयातले १९ विद्यार्थी यापूर्वी बाधित
आढळून आल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांची कोविड तपासणी करण्यात आली, त्यातून हा निष्कर्ष
समोर आला. त्यामुळे या विद्यालयातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या आता ५२ झाली आहे.
****
विधानसभा
अध्यक्षपदाच्या निवडणुकीला मंजुरी देण्यासंदर्भातलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं
पत्र, राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवलं.
त्यावर आज निर्णय होईल, अशी अपेक्षा मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. या निवडणुकीसंदर्भात
राज्यपाल सकारात्मक आहेत आणि कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय कळवू, असं त्यांनी सांगितल्याची
माहिती शिंदे यांनी दिली. विधान परिषदेच्या स्वीकृत १२ आमदारांचा मुद्दा किंवा विरोधी
पक्षांच्या १२ आमदारांचं निलंबन, यावर यावेळी चर्चा झाली नाही, असं त्यांनी स्पष्ट
केलं.
****
पालघर
जिल्ह्यातल्या डहाणू, तलासरी परिसरात काल पहाटे भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर
तीन पूर्णांक नऊ तीव्रतेच्या या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू, भूगर्भात १० किलोमीटर
खोल नोंदवला गेला.
****
परभणी
जिल्ह्यात काल दोन वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. गंगाखेड लोहा राष्ट्रीय
महामार्गावर पालम जवळ काल दुपारी जीप आणि कारची एकमेकांवर धडक होऊन भीषण अपघात झाला.
या अपघातात कारमधले तिघे जागीच ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाले. अनिल जागीरदार,
शांताबाई जागीरदार आणि लक्ष्मीकांत जागीरदार अशी मृतांची नावं असून, हे सर्वजण नांदेड
इथले रहीवाशी आहेत. जखमींवर नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुसरा
अपघात जिंतूर - परभणी रस्त्यावर मैनापुरी शिवारात झाला, या अपघातात अज्ञात वाहनाच्या
धडकेत दुचाकीस्वार ३२ वर्षीय युवक जागीच ठार झाला, तर इतर दोन युवक गंभीर जखमी झाल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
'दास्तान-ए-बड़ी
बांका' या विशेष सादरीकरणातून औरंगाबादकरांनी, काल मुंबईतल्या उपनगरी रेल्वेच्या अनोख्या
दर्शनाचा अनुभव घेतला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं विभागीय केंद्र, महात्मा गांधी
मिशन आणि अभ्युदय फाउंडेशन यांच्या वतीनं सादर झालेल्या या कार्यक्रमात, धनश्री खंडकर
आणि अक्षय शिंपी यांनी हावभाव आणि संवादातून मुंबईतल्या लोकलची कथा, लेडीज डब्यातले
किस्से, लोकलच्या आत आणि बाहेर घडणाऱ्या घटना, स्टेशनवरचे संवाद आदी प्रसंग सादर केले.
****
लातूर
शहरातल्या सर्व प्रभागांमध्ये काल संजय गांधी निराधार योजना समाधान शिबीर घेण्यात आलं.
प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोईज शेख यांच्या हस्ते, शहरातल्या प्रभाग क्रमांक १४ इथं
या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. शहर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष किरण जाधव यांनी,
या योजनेपासून एकही पात्र नागरिक वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल, असं आश्वासन
दिलं.
****
दिवंगत
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद शहरात
भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कामगारांसाठी ई-श्रम कार्ड काढून देण्याच्या शिबिराचं
आयोजन करण्यात आलं आहे. हे शिबीर २९ तारखेपर्यंत चालणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात
काम करणारे नागरिक इ-श्रम कार्ड काढून घेण्यासाठी हजेरी लावत आहेत.
****
भारत
आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कालपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात,
सलामीवीर के एल राहुलच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर, भारतीय संघानं काल पहिल्या दिवसअखेर,
तीन बाद २७२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेतल्या सेंच्युरिअन इथं खेळल्या जात असलेल्या
या सामन्यात, भारतानं काल नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करायचा निर्णय घेतला.
मयंक अग्रवाल ६०, कर्णधार विराट कोहली ३५ तर चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. कालचा
खेळ थांबला तेव्हा के एल राहुल १२२ तर अजिंक्य राहणे ४० धावांवर खेळत होता. तीन कसोटी
सामन्यांच्या या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एक दिवसीय सामन्यांची मालिकाही होणार
आहे.
****
बीड
इथं काल दहा किलोमीटर अंतराची मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. आमदार विनायक मेटे, अभिनेता
देवदत्त नागे, स्नेहा कोकणे यांनी सकाळी साडे सहा वाजता हिरवा झेंडा दाखवल्यावर या
स्पर्धेला सुरुवात झाली. सर्वांना उत्तम आरोग्य मिळावं तसंच प्रत्येकानं आपल्या आरोग्याकडे
गांभिर्याने लक्ष द्यावं, या हेतूनं या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याचं, आमदार विनायक
मेटे यांनी यावेळी सांगितलं. मराठवाडा लोक विकास मंच मुंबई, कैलासवासी अण्णासाहेब पाटील
प्रतिष्ठान आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राबवलेल्या या उपक्रमात तरुणांनी
मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
****
हवामान
राज्यात
विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये येत्या दोन दिवसात हलक्या ते मध्यम
स्वरूपचा पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. खानदेशातल्या जळगावसह मराठवाड्यातल्या
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या शहरांत २८ आणि २९ डिसेंबर या येलो अलर्ट
देण्यात असून, काही भागात गारपीटीचा इशाराही देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment