Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 December 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ डिसेंबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
वस्त्रोद्योगाशी संबंधीत
उत्पादनांवर उद्यापासून लागू होणारी पाच टक्क्यांवरुन १२ टक्क्यांची जीएसटी वाढ
रद्द करण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार
यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात पवार
यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, केंद्राकडून राज्यांना मिळणारी
जीएसटी नुकसानभरपाई १४ टक्के वार्षिक वाढीसह ३० जून २०२२ नंतरही कायम ठेवण्यात
यावी, अशीही मागणी केली आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रात होणाऱ्या दरवाढीमुळे महागाई
वाढेल, व्यापारी, उलाढाल, अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम होईल, असं पवार यांनी म्हटलं
आहे.
****
देशभरात कोरोना आणि
ओमायक्रॉन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह
आठ राज्यांना खबरदारीच्या उपाय योजना राबवण्याचे आणि लसीकरण वाढवण्याचे निर्देश
दिले आहेत. सध्या महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक बाधित असले तरी
महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या नवबाधितांची संख्या वाढत आहे, असं
आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत
सांगितलं. राज्यात प्रामुख्यानं मुंबई, ठाणे आणि पुण्यात नव्याने आढळणाऱ्या
बाधितांची संख्या मोठी असल्याचं ते म्हणाले.
****
मुंबई आणि पुण्यात
ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचा दावा, ‘आयसर’च्या हवाल्यानं
राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी केला आहे. या दोन्ही
महानगरातल्या या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या ‘आयसर’ या संस्थेनं
‘ओमायक्रॉन’ संसर्गाचं सर्वेक्षण केलं आहे. लक्षणं कमी, रुग्णालयात दाखल होण्याचं
प्रमाणही कमी; तसंच मृत्यूचं प्रमाणही कमी असलं तरी हा संसर्ग वाढू नये यासाठी आपण
सर्वांनी नियम पाळणं गरजेचं आहे; असं डॉ. आवटे यांनी म्हटलं आहे.
****
२०२१ या वर्षाचा आज शेवटचा
दिवस असून, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी
ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र कोविड आणि
ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरीकांनी गर्दी न करण्याचं आवाहन
शासनानं केलं आहे. आज मध्यरात्रीपासून राज्यात नवे निर्बंध लागू होणार असून,
रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदी आदेश आहेत.
****
पुणे जिल्ह्यात कोरेगाव भीमा
इथं विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी उद्या म्हणजे एक जानेवारीला अनेक जण हजेरी
लावत असतात. पुणे महानगर परिवहन महामंडळानं नागरिकांच्या सोयीसाठी आज आणि उद्या
मोफत जादा बसेसचं नियोजन केलं आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर नागरिकांनी विजयस्तंभ स्थळी गर्दी करू नये असं आवाहन विविध
स्तरावरून करण्यात आलं आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्हा
बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणीत सिद्धीविनायक पॅनेलनं विजय मिळवला आहे. एकूण १९
जागांपैकी सिद्धीविनायक पॅनलला ११ तर महाविकास आघाडीच्या सहकर समृद्धी पॅनलला आठ
जागा मिळाल्या
****
राज्यातल्या धोकादायक आणि
जीर्ण पुलांची कामं करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून, नव्यानं
उभारण्यात येणारे पूल आणि दुरुस्ती करावयाच्या पुलांच्या कामांचे नकाशे, आराखडे
महिनाभरात विभागाकडे सादर करण्याचे निर्देश, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
यांनी दिले आहेत. राज्यातल्या सर्व पुलांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या
अध्यक्षतेखाली काल नांदेड इथं दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली, त्यावेळी ते बोलत
होते. ज्या पुलांची कालमर्यादा संपुष्टात आली आहे, अशा सर्व पुलांचं संरचनात्मक
लेख परीक्षण करण्याच्या सूचनाही, त्यांनी दिल्या.
****
हडपसर ते नांदेड या विशेष
रेल्वेची एकतर्फी फेरी करण्यात येणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड
जनंसपर्क कार्यालयानं कळवलं आहे. ही गाडी दोन जानेवारीला रात्री साडे अकरा वाजता
हडपसर इथून सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी मार्गे हुजूर साहिब नांदेड
इथं दुसऱ्या दिवशी दुपारी सव्वा वाजता पोहोचेल. ही गाडी पूर्णत: आरक्षित असेल.
****
दुबईत १९ वर्षाखालच्या आशिया
चषक एकदिवस क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका दरम्यान सुरु आहे. श्रीलंकेनं
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या
पाच बाद ५१ धावा झाल्या होत्या. भारताच्या कौशल तांबेनं दोन, तर रवीकुमार, विकी ओस्तवाल
आणि राज बावानं प्रत्येकी एक गडी बाद केला.
****
भारताचा स्कीईंगपटू आरिफ
मोहम्मद खान हा बिजिंग इथं होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेतल्या दोन वेगवेगळ्या
प्रकारांसाठी पात्र ठरला आहे. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय स्कीईंगपटू ठरला
आहे. ही स्पर्धा चार ते २० फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.
****
No comments:
Post a Comment