▼

Sunday, 23 January 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २३ जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 January 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

 

** आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासासाठी प्रशासन आणि जनतेमध्ये थेट संपर्काची गरज- पंतप्रधान नरेंद्र मोदी

** राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयातील अभ्यासक्रमासाठीच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचा वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय

** मंत्रिपदाच्या शपथेचा भंग केल्यामुळे मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची भारतीय जनता पक्षाची राज्यपालांकडे मागणी

** मुंबईत ताडदेव भागातल्या एका २० मजली इमारतीला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू

** राज्यात ओमायक्रॉन संसर्ग झालेले ४१६ नवे रुग्ण.

** कोविड संसर्गाचे ४६ हजार ३९३ नवे रुग्ण, मराठवाड्यात दोन जणांचा मृत्यू तर चार हजार १८७ बाधित

** आणि

** ** संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं निधन

****

आता सविस्तर बातम्या

***

आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासासाठी प्रशासन आणि जनतेमध्ये थेट संपर्काची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. देशभरातल्या आकांक्षित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी काल संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. लोकसहभाग आणि तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केलेल्या जिल्ह्यांची कामगिरी उत्तम असून, जिल्हाधिकाऱ्यांनी पुढच्या दोन वर्षांसाठी आपआपल्या जिल्ह्यांकरता एक आराखडा निश्चित करावा तसंच कोणतीही दहा काम निश्चित करुन ती पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावं, सर्व केंद्रीय मंत्रालयं तसंच संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री याचं सहकार्य घेऊन आपआपल्या जिल्ह्यांचा विकास साधावा असं आवाहनही, मोदी यांनी यावेळी बोलतांना केलं. राज्यातील उस्मानाबाद, हिंगोली, नंदुरबार, गडचिरोली, सिंधुदुर्ग, वाशिम, आणि यवतमाळ या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीत सहभागी झाले. 

*****

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयातील अभ्यासक्रमासाठीच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठीच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ करण्यात आलेल्या महाविद्यालयात, मुंबईच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि नायर चॅरीटेबल रुग्णालय, यवतमाळ इथल्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई इथले स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूरच्या राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे. लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि पुण्यातल्या बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निवडक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

****

मंत्रिपदाच्या शपथेचा भंग केल्यामुळे राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बरखास्त करावं आणि मंत्र्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन या मागणीचं निवेदन त्यांना सादर केलं. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अवैध बांधकामाबद्दलचा दंड आणि व्याज माफ करून महाविकास आघाडी सरकारने सरनाईक यांचा वैयक्तिक लाभ करून दिल्याचा आरोप भाजपनं केला आहे. सरकार स्थापनेवेळी मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेताना कोणाही एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक लाभ करून देणार नाही, अशी शपथ घेतलेली असते, राज्य सरकारने या शपथेचा भंग केल्याचं पाटील म्हणाले.

****

मुंबईत ताडदेव भागातल्या एका २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. काल सकाळी ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या १३ गाड्यांच्या सहाय्यानं आग विझवण्यात आली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना दोन लाख रुपये मदतीची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.

****

राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेले ४१६ नवे रुग्ण आढळले. यापैकी ३२१ रुग्ण मुंबईतले, नागपूर ६२, पुणे १३, वर्धा १२, अमरावती ६ तर भंडारा आणि नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता दोन हजार ७५९ झाली असून, यापैकी एक हजार २२५ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ४६ हजार ३९३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७४ लाख ६६ हजार ४२० झाली आहे. काल ४८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४२ हजार ७१ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९ दशांश टक्के झाला आहे. काल ३० हजार ७९५ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७० लाख ४० हजार ६१८ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९४ पूर्णांक तीन दशांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन लाख ७९ हजार ९३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल चार हजार १८७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन्ही मृत हे औरंगाबाद जिल्ह्यातले आहेत

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार २३६ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातले ७९०, तर ग्रामीण भागातले ४४६ रुग्ण आहेत. नांदेड जिल्ह्यात ८५७, परभणी ८२८,  लातूर ६१७, जालना ३६३, उस्मानाबाद ३४५, बीड ३०७,  तर हिंगोली जिल्ह्यात १४७ रुग्णांची नव्यानं नोंद झाली. 

****

हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त निमित्त काल नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्र-  कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी  स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी विद्यापीठाचे वित्त आणि लेखा अधिकारी आनंद बारपुते यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

***

राज्य शासनानं बाजार समित्यांची कार्यरत संचालक मंडळे, प्रशासक आणि अशासकीय प्रशासक मंडळांना आज पासून तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे औरंगाबाद कृषी उत्पन बाजार समितीच्या प्रशासक मंडळालाही तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.

***

औरंगाबाद जिल्हा सहकारी दुध संघाच्या सात संचालक पदाच्या निवडणुकीसाठी काल १०० टक्के मतदान झालं.  या निवडणुकीतील सात संचालकांची या अगोदरच बिनविरोध निवड झाली आहे.

***

नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या सदस्यपदी शासनानं चार नव्या सदस्यांची नियुक्ती  केली आहे. त्यामुळे आता बोर्डाच्या एकूण सदस्यांची संख्या १३ झाली आहे. नव्या सदस्यांमधे बोर्डाचे माजी अध्यक्ष शेरसिंग फौजी, गुरुचरणसिंग घडीसाज, सुरेंद्रसिंग अजबसिंग आणि सुरजिसिंग फौजी, यांचा समावेश आहे.

***

नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा काल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. सावरगाव माळ आणि पाळज आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन, सावरगाव माळ इथल्या सीसी रोडच्या कामाचा भूमीपूजन समारंभ, पाळज इथं पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम, रावणगाव इथं सभागृहाचं बांधकाम तसंच इथल्या ग्रामपंचायतीच्या इमारतीचं लोकार्पण यावेळी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

उस्मानाबादच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सुनील जाधव यांना नॅनो सॅटॅलाइट मधील डिझाईनचं पेटंट मिळालं आहे. प्राध्यापक डॉक्टर सुनील जाधव यांनी नॅनो सेटलाईट मधील साईड वॉल डिझाईन या विषयातील पेटंट मिळवण्यासाठी भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडे अर्ज केला होता. नॅनो सॅटॅलाइटचा उपयोग हवामान, शेती आणि इतर संबंधित विविध सेवांसाठी केला जातो.

****

गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली औरंगाबाद शहर बस सेवा आजपासून सुरु होणार आहे. औरंगाबाद स्मार्ट शहर बस सेवेचा आज तिसरा वर्धापन दिन आहे. अनुभवी माजी सैनिक चालक आणि वाहक यांच्याद्वारे या बस सेवेचं संचालन होणार असल्याचं महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितलं. प्रवासावेळी मास्क आणि सेनिटायझर वापरणे, कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेऊनच प्रवास करणं आणि शासकीय आरोग्य विषयक सूचनांचं पालन करणे आवश्यक असणार आहे.

****

संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. काल सकाळी त्यांचं पुण्यात निधन झालं, त्या ७१ वर्षांच्या होत्या. वयाच्या दहाव्या वर्षीच रंगभूमीवर दाखल झालेल्या कीर्ती शिलेदार यांनी ६० वर्षांच्या कारकिर्दीत संगीत कान्होपात्रा, ययाती आणि देवयानी, संशय कल्लोळ, स्वयंवर, सौभद्र, मृच्छ कटिक, मंदोदरी, एकच प्याला या सारख्या अनेक नाटकातून मध्यवर्ती भूमिका साकारल्या. त्यांच्या नाटकांचे चार हजारावर प्रयोग झाले. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं.

संगीत रंगभूमीलाच आपला श्वास, ध्यास मानणारी व्रतस्थ शिलेदार काळाच्या पडद्याआड गेली, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कीर्ती शिलेदार यांच्या निधनाने मराठी रंगभूमीला समर्पित महान कलावंत आपण गमावला असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

****

औरंगाबाद शहरातल्या कॅनॉट इथं क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याऐवजी सैनिक शाळा सुरु करण्याची मागणी करणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांचा काल राजपूत समाज बांधवांच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. विश्वनाथ राजपूत यांच्या नेतृत्वात कॅनॉट परिसरात निदर्शनं करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी ही क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांच्या अश्वारुढ पुतळ्याला विरोध सहन करणार नसल्याचं म्हटलं आहे.

****

लखनौ इथं सुरु असलेल्या सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज भारताच्या पीव्ही सिंधू आणि मालविका बनसोड यांच्यात होणार आहे.

****

 

 

No comments:

Post a Comment