Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 24 January 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ जानेवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या अनेक
भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि
१५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं
आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी
कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच
चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन
क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
·
प्रधानमंत्री
राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं पंतप्रधानांच्या हस्ते ब्लॉक चेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून
वितरण.
·
कृषी
वीज जोडणी धोरणात नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना थकीत वीज बिलात सरसकट पन्नास टक्के सूट.
·
मुख्यमंत्र्यांची
टीका नगरपंचायतींच्या पराभवातून आलेल्या नैराश्यामुळे - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत
पाटील.
·
औरंगाबाद
जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग उद्यापासून सुरु.
आणि
·
उद्या
राष्ट्रीय मतदार दिन; राज्य शासनाच्या मुख्य कार्यक्रमाचं औरंगाबाद इथं आयोजन.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आज २०२१ आणि २०२२ साठीचे ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं’ ब्लॉक चेन तंत्रज्ञानाच्या
माध्यमातून वितरण केलं. पुरस्कार मिळाल्यानंतर लोकांकडून येत असलेल्या अपेक्षांचा दबाव
घेण्यापेक्षा त्यातून प्रेरणा घ्या, असं आवाहन पंतप्रधानांनी पुरस्कार विजेत्या बालकांना
केलं. हा पुरस्कार ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना नवोपक्रम, समाजसेवा, शिक्षण, क्रीडा,
कला आणि संस्कृती आणि शौर्य या सहा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो. गौरव
पदक, एक लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. २०२२ यावर्षासाठी
देशभरातल्या २९ पुरस्कार विजेत्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. पुरस्कार विजेते प्रजासत्ताक
दिनाच्या पथसंचलनामध्येही सहभागी होणार आहेत. या पुरस्कार विजेत्यांमध्ये राज्यातल्या
नांदेड इथला कामेश्वर वाघमारे, नागपूरचा श्रीनभ अग्रवाल, मुंबईचा जिया राय, नाशिकचा
स्वयं पाटील, जळगावची शिवांगी काळे तसंच पुण्याची जुई केसकर यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी या सर्व बालकांचं अभिनंदन केलं आहे.
****
राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त
आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बालिकांचे अधिकार, मुलींच्या
शिक्षणाचं तसंच त्यांच्या आरोग्य आणि पोषणाचं महत्व, याबाबत जनजागृतीच्या उद्देशाने
२००८ पासून दरवर्षी २४ जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. बालिकांच्या
कल्याणासाठी शासनातर्फे बेटी बचाव, बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, उडान योजना यासारख्या
विविध योजना राबवल्या जात आहे. उस्मानाबाद इथं राष्ट्रीय बालिका दिनानिमित्तानं टपाल
खात्यात बालिकांची खाती काढण्यासाठी प्रस्ताव अर्ज दाखल करण्यात आले. तसंच सात बालिकांची
सुकन्या समृद्धी योजनेत खाती उघडण्यात आली.
****
राज्य सरकारने आणलेल्या कृषी
वीज जोडणी धोरणात शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास त्यांना थकीत वीज बिलामध्ये सरसकट पन्नास
टक्के सूट मिळेल असं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी
बोलत होते. महाविकास आघाडीतल्या सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन विज बिल समस्यांची जबाबदारी
घेऊन त्याचं समाधान करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
अध्यक्ष खासदार शरद पवार यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटर
वरून ही माहिती दिली. सध्या ते मुंबई इथल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गृहविलगीकरणात
आहेत. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ची तपासणी करावी असं आवाहन पवार यांनी
केलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांच्या तब्येतीची दूरध्वनीवरून
चौकशी केली.
****
भाजपासोबत असताना पहिल्या
क्रमांकावर असलेली शिवसेना आता चौथ्या क्रमांकार आहे, त्यामुळे कोणासोबत सडले, याचा
विचार केला पाहिजे, असं विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं
आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केलेल्या टीकेसंदर्भात ते आज मुंबईत पत्रकार
परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी भाजपवर
केलेली टीका नगरपंचायत निवडणुकीतल्या पराभवामुळे आलेल्या नैराश्यातून केली असल्याचं,
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात
बोलत होते. भाजपचं हिंदुत्व हे ढोंग असल्याची टीका ठाकरे यांनी केली होती. हताश झालेले
मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा ऱ्हास होताना पाहून भाजपवर टीका करत असल्याचं पाटील म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पंतप्रधानांविषयी ज्या प्रकारे बोलत आहेत ते
पाहता पटोले यांच्या राजकारणाचा स्तर किती घसरला आहे याचा काँग्रेस पक्षाने विचार करावा,
असं सांगतानाच पाटील यांनी पटोले यांच्या वृत्तीचा निषेध करत असल्याचं सांगितलं. भाजपातर्फे
राज्यात ठिकठिकाणी पटोले यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
औरंगाबाद इथं पटोले यांच्या
प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. भाजपा शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांच्या
नेतृत्वात यावेळी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांना या आंदोलनकर्त्यांना
ताब्यात घेतलं.
खुलताबाद इथंही भारतीय जनता
पक्षाच्या वतीनं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून काळं
फासण्यात आलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण
भागातल्या इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग उद्यापासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात
आला आहे. कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन करुन शाळा सुरु करण्याच्या
सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात
कोविड संदर्भात साप्ताहिक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी चव्हाण बोलत होते. जिल्ह्यात पहिला
डोस जवळजवळ सर्वांनाच देण्यात आला असून दुसऱ्या डोससाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे असून
घरोघरी जाऊन लस देण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
औरंगाबाद हद्दीतील सर्व सोईसुविधेने युक्त असे कोरोना केअर केंद्र सुरु करावे तसंच
तात्काळ चार बालरोग तज्ज्ञ डॉक्टारांची तेथे नेमणूक करावी, महानगरपालिकेच्या धर्तीवर
ग्रामीण भागात देखील गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांची वेळावेळी तब्येतीची फोनद्वारे
चौकशी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिल्या आहेत.
****
राज्यात
२३ पूर्णांक ३ लाख नवीन मतदारांची वाढ झाली असून २३ पूर्णांक ९ लाख मतदार वगळण्यात
आल्याची माहिती निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
यांनी दिली आहे. उद्या राष्ट्रीय मतदार दिनाचा राज्याचा मुख्य कार्यक्रम औरंगाबाद इथं
होणार आहे. त्यासंबंधी माहिती देतांना ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत
बोलत होते. उद्या सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात
हा कार्यक्रम होणार आहे. यंदाच्या राष्ट्रीय मतदान दिनाचं घोषवाक्य ‘सर्वसमावेशक, सुलभ
आणि सहभागपूर्वक मतदान प्रक्रिया’ असं आहे. त्याअनुषंगानं
निवडणूक आयोगाचं कार्य सुरु असून राज्यातल्या पुरुष मतदारांच्या संख्येत एक पूर्णांक
८६ टक्के, महिला मतदारांच्या संख्येत एक पूर्णांक ९१ टक्के,
तृतीयपंथी मतदारांमध्ये २७ टक्के, आणि दिव्यांग
मतदारांमध्ये १८ पूर्णांक २२ टक्के वाढ झाल्याचं श्रीकांत देशपांडे यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यात आज ३३१ नवीन
कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. तर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या १०९ रुग्णांना
सुटी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातले ६१ हजार ८८८ रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाले
आहेत. तर, २ हजार २४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज एका कोरोना बाधिताचा मृत्यू
झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं आजपर्यंत दगावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार
२०५ झाली आहे.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या
अकोली शिवारात आज सकाळी ट्रक आणि दुचाकीचा भिषण अपघात झाला. या अपघातात दोन सख्या आणि
एका चुलत अशा तिघा भावांचा जागीच मृत्यू झाला. हे तिघे जण दुचाकीवरून जिंतूरकडे जात
असताना अकोली शिवारात पूलाजवळील खड्डा चुकविण्याच्या नादात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकवर
आदळल्याने हा अपघात झाला. अभिषेक मेहेत्रे, योगेश मेहेत्रे आणि रामप्रसाद मेहेत्रे
अशी मृतांची नावं आहेत.
****
No comments:
Post a Comment