▼

Sunday, 23 January 2022

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 January 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 January 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ जानेवारी २०२२ सायंकाळी ६.१०

****

देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.

****

** नेताजी सुभाषचंद्र बोस तसंच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन

** राज्यात शाळांचे वर्ग उद्यापासून सुरू होणार; पालकांनी पाल्यांना शाळेत जाण्याची परवानगी द्यावी- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन

** तुळजाभवानी मंदिरातल्या अकरा पुजाऱ्यांवर मंदिर प्रवेशबंदीची कारवाई

आणि

** जालना जिल्ह्यात गारगोटीच्या दगडाचं अवैध उत्खनन करणाऱ्या टोळीतल्या चौघांना अटक

****

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ सा व्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नेताजींना अभिवादन करताना, नेताजींचा त्याग आणि आणि कार्य प्रत्येक भारतीयाला सदैव प्रेरणा देत राहील, असं म्हटलं आहे.

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही नेताजींना अभिवादन केलं आहे. संपूर्ण राष्ट्र नेताजींचं आदर भावनेनं स्मरण करत असल्याचं, नायडू यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेच्या केंद्रीय कक्षात नेताजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.

दिल्लीत इंडिया गेट परिसरातल्या छत्रीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा पंतप्रधानांनी नुकतीच केली होती, या ठिकाणी नेताजींच्या होलोग्राम अर्थात छायाप्रकाशाच्या अत्याधुनिक तंत्राने त्रिमीतय प्रतिमेचं आज पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होत आहे. नेताजींचा ग्रॅनाईटचा पुतळा तयार होईपर्यंत पुतळ्याच्या नियोजित जागी ही त्रिमीतीय प्रतिमा राहणार आहे. नेताजींची जयंती पराक्रम दिन म्हणूनही साजरी होते. प्रतप्रधानांनी देशवासियांना पराक्रम दिनाच्याही शुभेच्छा दिल्या.

****

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शहाण्णववी जयंतीही आज साजरी केली जात आहे. त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. बाळासाहेब त्यांच्या अमोघ नेतृत्वासाठी कायम स्मरणात राहतील असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नेताजी तसंच बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.

मुंबईत शिवाजी पार्कमधील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक सकाळपासून येत आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांनीही शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती स्थळी पुष्पांजली वाहिली.

****

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज औरंगाबाद मध्ये विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. शहरातल्या काल्डा कॉर्नर इथल्या बाळासाहेबांच्या पुतळ्याला शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. सिडकोतल्या आविष्कार चौकात केंद्र सरकारच्या ई - श्रम कार्डाचं वितरणही आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं.

****

हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

विभागात इतरही ठिकाणी सर्व शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयं तसंच शैक्षणिक संस्थांमधून नेताजी तसंच बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं.

****

राज्यभरात आज राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा पेपर नागपूरमध्ये फुटल्याची चर्चा समाज माध्यमांमध्ये सुरू आहे. मात्र राज्य लोकसेवा आयोग- MPSC ने या वृत्ताचं खंडन केलं आहे. अशी कुठलीही घटना घडलेली नसल्याचा खुलासा MPSC ने ट्विटरवर केला आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात हा कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. ३० जानेवारीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान जनतेला संबोधित करतील. यावेळी मन की बात सकाळी अकरा वाजेऐवजी, साडेअकरा वाजता प्रसारित करण्यात येईल. 

या कार्यक्रमात समाविष्ट करता येतील अशा प्रेरणादायक यशोगाथा पाठवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. MyGov या खुल्या मंचावर किंवा नमो अॅपवर नागरिकांना संदेश पाठवता येतील. 1800-11-7800 या नि:शुल्क क्रमांकावरही हिंदी किंवा इंग्रजीत पंतप्रधानांसाठी संदेश देता येईल.

दरम्यान, पंतप्रधान उद्या दुपारी १२ वाजता, दूरदृश्य संवादप्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या बालकांशी संवाद साधणार आहेत. या बालकांना २०२१ आणि २०२२ साठीचे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ही यावेळी प्रदान केले जाणार आहेत.

****

राज्यात शाळांचे वर्ग उद्यापासून सुरू होणार आहे. स्थानिक परिस्थितीनुसार शाळा सुरू करायचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. शाळा सुरू करण्याचा निर्णय जगभरातली परिस्थिती पाहून आणि लहान मुलांबाबतच्या कृती दलाशी चर्चा करुन घेण्यात आला आहे. त्यामुळे पालकांनी पाल्यांना शाळेत जाण्याची परवानगी द्यावी, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पालकांना केलं आहे.

शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं, असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.

****

तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिरातल्या अकरा पुजाऱ्यांवर तुळजा भवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा उस्मानाबादचे जिल्हाधिकारी  कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंदिर प्रवेशबंदीची कारवाई केली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फोटो काढणं भाविकांशी उद्धट वर्तन करणं, मारहाण करणं अशा विविध तक्रारींवरुन सहा पुजाऱ्यांवर तीन महिने आणि पाच पुजाऱ्यांवर एक महिना मंदिर प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या वाघरुळ शिवारात गारगोटीच्या दगडाचं अवैध उत्खनन करणाऱ्या टोळीतल्या चौघांना तालुका जालना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलं. संशयितांकडून गारगोटीच्या दगडांसह जेसीबी, ट्रॅक्टर आणि एक कार, असा एकूण ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

****

क्रिकेट :

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना आज केपटाऊन इथं खेळला जात आहे. ****

No comments:

Post a Comment