Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 January 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ जानेवारी २०२२ दुपारी १.०० वा.
****
देशात पीएम गतीशक्ति नॅशनल मास्टर प्लान पायाभूत विकासाच्या कार्याला
अधिक गती देईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचा
दहावा हप्ता, आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रदान करण्यात
आला, त्यावेळी ते बोलत होते. मेक इन इंडिया या योजनेअंतर्गत देशात चिपची निर्मिती तसंच
सेमीकंडक्टर सारख्या नव्या क्षेत्राकरतात महत्वाकांक्षी योजना लागू करण्यात आल्या असल्याचं
ही त्यांनी सांगितलं.
या कार्यक्रमात १० कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यात २० हजार
कोटी रुपये जमा करण्यात आले. आतापर्यंत एक लाख ६० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. याशिवाय ३५१ कृषी उत्पादक संघटनांना मिळून
१४ कोटी रुपये अनुदानाचं वाटपही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.
****
जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी मंदिरात आज पहाटे भाविकांची चेंगराचेंगरी
होऊन १२ जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण गंभीर जखमी झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद,
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी
या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना
प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली.
जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी
दहा लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे.
दरम्यान, या चेंगराचेंगरीनंतर यात्रा काही काळ स्थगित करण्यात आली होती,
मात्र आता पुन्हा नोंदणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
****
कोरोनाच्या चाचण्यांसाठीच्या वर्तमान व्यवस्थेचा पुरेपूर वापर करून चाचण्यांचं
प्रमाण वाढवण्याचे निर्देश केंद्र सरकारनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले
आहेत. सध्या दररोज २० लाखांपेक्षा जास्त चाचण्या करण्याची देशाची क्षमता आहे. कोरोनाचा
सध्याचा वाढता संसर्ग पाहता कोरोनाची कोणतीही लक्षणं असलेल्यांची चाचणी प्राधान्यानं
केली जावी, अशी सूचनाही केंद्रानं केली आहे.
****
१५ ते १८ वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीकरण
मोहिमेला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. यासाठी कोविन या मंचावर आजपासून नोंदणी सुरु
झाली आहे. नोंदणीसाठी त्यांना आधार कार्ड किंवा शाळेचं ओळखपत्र वापरता येईल. १५ ते
१८ या वयोगटातली सहा ते सात कोटी मुलं या लसीकरणासाठी पात्र असतील.
****
भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस दोन ते १८ वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी सुरक्षित
असल्याचं उत्पादक कंपनीने म्हटलं आहे. लसीच्या नमुना चाचण्यांचा दुसरा आणि तिसरा टप्पा
पूर्ण झाला आहे. १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोवॅक्सिन देण्याला औषध महानियंत्रकांनी
यापूर्वीच परवानगी दिली असून, या विषयातल्या तज्ञ समितीने दोन वर्षावरच्या मुलांसाठी
ही लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे.
****
राज्यातले दहा मंत्री आणि २० आमदारांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याची
माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. जर यापुढेही राज्यात कोविड बाधितांची
संख्या वाढत राहिली, तर राज्य सरकार अधिक कठोर निर्बंध घालू शकतं, असं पवार यांनी काल
नाशिक इथं सांगितलं. सरकारनं जारी केलेली नियमावली कालपासून लागू झाली असून, लोकप्रतिनिधींसह
नागरीकांनी देखील नियमांचं पलन करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या निष्काळजीपणाबाबत वस्तुस्थितीदर्शक
अहवाल तातडीनं सादर करावा, अशा सूचना, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी महाविद्यालयाच्या
अधिष्ठातांना दिल्या आहेत. या महाविद्यालयातल्या ८२ शिकाऊ डॉक्टरांना कोविडची लागण
झाल्याच्या घटनेची त्यांनी गंभीर दखल घेतली आहे. वैद्यकीय महाविद्यालयातल्या या मंडळींनाच
लागण झाली तर, इतरांना वैद्यकीय सेवा कशी पुरवणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होण्यासाठी कोणत्या बाबी कारणीभूत आहेत याबाबत देशमुख
यांनी विचारणा केली आहे.
****
राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा, पदव्युत्तर-नीट पीजी काऊन्सेलिंग
२०२१ मध्ये वारंवार विलंब होत असल्याच्या पार्श्वभूमीवर निवासी डॉक्टरांची संघटना मार्डनं
आजपासून संप पुकारला आहे. मार्डच्या औरंगाबाद इथल्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भातलं निवेदन
औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय-घाटी प्रशासनाला आज सादर केलं.
आजपासून अत्यावश्यक सेवा वगळता बाह्यरुग्ण विभाग-ओपीडी, आणि इतर विभाग बंद राहणार असल्याचं
या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment