आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ जानेवारी २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी मंदिरात आज पहाटे भाविकांची चेंगराचेंगरी
होऊन १२ जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण गंभीर जखमी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून, त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी
दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे. गृहमंत्री अमित
शहा यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज
सिन्हा यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी
५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेअंतर्गत पात्र
लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचा दहावा हप्ता, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रदान
करणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात १० कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या
खात्यात २० हजार कोटी रुपये जमा करण्यात येतील. नवीन वर्षाचा पहिला दिवस देशाच्या अन्नदात्याला
समर्पित करणार असल्याचं, पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
मावळत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचं मध्यरात्री सर्वत्र जल्लोषात स्वागत
करण्यात आलं. कोविड प्रतिबंधासाठी शासनानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन
करत, नववर्षाच्या स्वागताचा सोहळा संगीत, मेजवानी आणि आतषबाजी करून साजरा करण्यात आला.
****
नाशिक मध्ये कोविड प्रादुर्भावामुळे हॉटेलमध्ये पार्ट्यांना मनाई करण्यात
आली असताना, नाशिक तालुक्यातल्या सावरगाव इथं मल्टी क्यूसिन या हुक्का पार्लरमध्ये
छापा टाकून पोलिसांनी या हुक्का पार्लरच्या मालकासह आठ जणांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध
नाशिक तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
****
केंद्र सरकारनं येत्या तिमाहीतही अल्प बचत योजनांचे व्याजदर कायम ठेवण्याचा
निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं यासंदर्भातलं पत्रक काल जारी केलं.
****
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथला पुरवठा विभागचा नायब तहसीलदार एस के कुंभार
आणि शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष अशोक नरवडे या दोघांना एक लाख रुपयाची लाच घेताना
काल पकडण्यात आलं. मंडल अधिकाऱ्यांवरची चौकशी थांबवण्याकरता त्यांनी ही लाच मागितली
होती.
No comments:
Post a Comment