Monday, 3 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.01.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 January 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातल्या बालकांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली. २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेली मुलं या लसीकरणासाठी पात्र असतील, असं आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात वाळूज इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किशोरवयीन मुलांच्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. औरंगाबाद शहरातही मुलांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, राज्यात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज सर्व संबंधितांची तातडीची बैठक बोलावली आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १४५ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात २३ लाख ३० हजार ७०६ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १४५ कोटी ६८ लाख ८९ हजार ३०६ मात्रा देण्यात आल्या आहेत.

****

देशाच्या पहिल्या महिला शिक्षक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. महिलांच्या उद्धारासाठी आपलं सर्वस्व वाहून देत, सर्वसामान्य मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं आहे. स्त्रीशिक्षण, महिला सक्षमीकरण यात राज्य अग्रेसर राहील, यासाठी आपण कटिबद्ध असून, त्यासाठी सावित्रीबाईंच्या कार्य कर्तृत्वाचा सन्मान, गौरव वाढेल असे अनेकविध योजना, उपक्रम राबवण्यावर आपला भर राहील, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं साजरा करण्यात येणारा ‘सावित्री उत्सव’, आणि शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं साजरा करण्यात येत असलेल्या ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ या अभियानालाही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यातल्या नायगाव या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी जाऊन अभिवादन केलं. देश आणि देशातील स्त्रीशक्ती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ आहे, अशा शब्दात त्यांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव केला. सावित्रीबाईंचं जन्मगाव नायगावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं आश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.

****

दरम्यान, नायगाव इथं वार्ताहरांशी बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी, इतर मागासवर्ग - ओबीसी आरक्षणासाठीचा इम्पेरिकल डेटा मार्च अखेरपर्यंत संकलित होणं अपेक्षित असून, यासाठी लागणारा निधी आणि कर्मचारी वर्ग सरकारनं उपलब्ध केल्याची माहिती दिली. आयोगाने ठरवलं तर दोन महिन्यात डेटाचं काम पूर्ण व्हायला हरकत नसल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. डेटाचं काम होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात येणार असून, तोपर्यंत स्थानिक स्वराज संस्थांवर प्रशासकाची नियुक्ती कायम राहील, असंही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

महिलांची ऑनलाईन बदनामी केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागानं गुन्हा दाखल केला आहे. समाज माध्यमांमध्ये मुस्लिम महिलांची छायाचित्रं, प्रोफाइल आणि त्यांच्यासमोर किंमत लिहिलेलं प्रोफाईल प्रसारित करण्याच्या या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं दखल घेऊन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कारवाईचे निर्देश दिले होते. एका ॲपवरून ही माहिती प्रसारित होत असल्याचं समोर आलं आहे. संकलित माहितीचा प्रसार करण्यासाठी मोफत आणि अनियंत्रित प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्या ‘गिटहब’ विरुद्ध सुद्धा कारवाईचे निर्देश आयोगानं दिले आहेत.

****

वसंतदादा साखर संस्थेतर्फे दरवर्षी जाहीर करण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा काल संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव देशमुख यांनी केली. सांगली जिल्ह्यातल्या पलूस इथल्या क्रांतीअग्रणी डॉक्टर जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याला, वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार जाहीर झाला आहे. उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार उत्तर पूर्व विभागातून जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी इथल्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याला, तर उत्कृष्ट ऊस विकास आणि संवर्धन पुरस्कार उत्तर पूर्व विभागातून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या रांजणी इथल्या नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीजला जाहीर झाला आहे.

****

नांदेड-हिंगोली महामार्गावर जामगव्हाण पाटीजवळ, रायपूर इथून सोलापूरकडे कामासाठी जाणाऱ्या कामगारांची खाजगी बस उलटून झालेल्या अपघातात, १५ कामगार जखमी झाले. आज पहाटे हा अपघात झाला आहे. जखमींना नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, पाच कामगाराची प्रकृती गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

No comments:

Post a Comment