Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03
January 2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०३ जानेवारी २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत
देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. आपल्या सर्वांना आवाहन आहे
की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या,
तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना
लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा,
सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि
मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६
१२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· देशभरात १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या किशोरवयीन मुलांच्या
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला आजपासून सुरवात
· राज्यात ओमायक्रॉनची बाधा झालेल्या नव्या ५० रुग्णांची नोंद
· राज्यात कोविड संसर्गाचे
नवे ११ हजार ८७७ रुग्ण, मराठवाड्यात तीन जणांचा
मृत्यू तर १०१ नवे बाधित
· इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करण्याच्या निर्णयावर तत्काळ अंमलबजावणी
करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
· उदगीरच्या नियोजित ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी,
प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांची एकमतानं निवड
· औरंगाबाद - मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या
सर्वेक्षणाला सुरुवात - रेल्वे
राज्यमंत्री रावसाहेब दानवे
आणि
· भारत -
दक्षिण आफ्रिकेदरम्यान आजपासून दुसरा कसोटी क्रिकेट सामना
****
देशभरात १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या किशोरवयीन मुलांच्या
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला आजपासून सुरवात होत आहे. यासाठीची नोंदणी परवा एक जानेवारीपासून सुरु
झाली. या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेने दिलेलं
ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. कोविन डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर ही नोंदणी करुन लसीकरणासाठी वेळ
निश्चित करता येईल, किंवा लसीकरण केंद्रावर थेट जाऊनही
नोंदणी करुन लस घेता येईल. या लसीकरणासाठी सर्वत्र तयारी
पूर्ण झालेली असून, या मुलांना कोवॅक्सिन लस दिली जाणार आहे.
२००७ किंवा त्यापूर्वी जन्म झालेली मुलं या लसीकरणासाठी पात्र असतील, असं आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे. सर्व सरकारी लसीकरण केंद्रांवर ही लस
मोफत दिली जाणार आहे.
राज्यात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस
देण्याबाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज सर्व संबंधितांची तातडीची बैठक
बोलावली आहे. या बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांसह
शिक्षण आयुक्त, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे
संचालक, प्राथमिक तसंच माध्यमिक शिक्षण संचालक, सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,
तसंच जिल्हा आरोग्य अधिकारी ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या दोन लाख
१३ हजार ८२३ मुलांना लस देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद शहरात चार ठिकाणी तर ग्रामीण भागात
दहा केंद्रांवर मुलांना लस देण्यात येणार आहे.
जालना जिल्ह्यात एक लाख ३१ हजार ७५५ मुलांना, तर लातूर शहरातल्या सुमारे तीस हजारावर विद्यार्थ्यांना
लस दिली जाणार आहे.
****
राज्यात काल
ओमायक्रॉनची बाधा झालेल्या नव्या ५० रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांमध्ये पुणे जिल्ह्यातल्या ४६, सांगली जिल्ह्यातल्या दोन,
तर ठाणे आणि मुंबईतल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या ५१० झाली
असून, त्यापैकी १९३ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ११ हजार ८७७ रुग्ण
आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ९९ हजार ८६८ झाली आहे. काल नऊ
रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची
एकूण संख्या, एक लाख ४१ हजार ५४२ झाली असून,
मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल दोन
हजार ६९ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६५
लाख १२ हजार ६१० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड
मुक्तीचा दर ९७ पूर्णांक २१ शतांश टक्के झाला आहे. राज्यात
सध्या ४२ हजार २४ रुग्णांवर उपचार सुरु
आहेत.
****
मराठवाड्यात काल १०१ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन, तर परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा
समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ३५ नवे रुग्ण आढळले. लातूर २७, परभणी आणि जालना जिल्ह्यात
प्रत्येकी दहा, नांदेड नऊ, बीड सहा, तर हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी
दोन रुग्ण आढळले.
****
राज्य सरकारनं यापुढे फक्त इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करण्याच्या निर्णयावर तत्काळ
अंमलबजावणी करण्याचं ठरवलं आहे. याआधी हा निर्णय एक एप्रिल २०२२ पासून लागू होणार होता.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल ट्वीट संदेशातून ही माहिती दिली. भाडेतत्वावर
घेतल्या जाणाऱ्या गाड्याही इलेक्ट्रिक पद्धतीच्याच असतील, असं त्यांनी नमूद केलं आहे.
इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीवर दिल्या जाणाऱ्या अनुदान योजनेला राज्य शासनानं यापूर्वीच मुदतवाढ दिली आहे. २०२१ च्या इलेक्ट्रिक कार
धोरणानुसार, ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत असलेली ही योजना, आता ३१ मार्च २०२२ पर्यंत राबवली
जाणार आहे. याअंतर्गत राज्य सरकार इलेक्ट्रिक कार खरेदीवर एक लाख रुपयांपर्यंत अनुदान
देईल. राज्य सरकारच्या या अनुदानासह इलेक्ट्रिक कार खरेदीवर महाराष्ट्रात अडीच लाख
रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
****
आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजाचे निकष ठरवण्यासाठी आधी निश्चित
केलेली कुटुंबाच्या वार्षिक आठ लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा कायम ठेवण्याचा निर्णय
केंद्र सरकारने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर याबाबत फेरविचार करण्यासाठी
केंद्र सरकारनं एक समिती नियुक्त केली होती, या समितीनेही आठ लाख रुपये मर्यादेवर शिक्कामोर्तब
केल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली. नीट पीजी प्रवेशासंदर्भात दाखल करण्यात
आलेल्या याचिकेवर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारनं ही माहिती दिली.
****
उदगीर इथल्या नियोजित ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या
अध्यक्षपदी, प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांची एकमतानं निवड झाली आहे. साहित्य महामंडळाच्या
उदगीर इथं झालेल्या बैठकीत सासणे यांच्या अध्यक्षपदावर एकमत झालं. २७ मार्च १९५१ रोजी
जालना इथं जन्मलेले सासणे यांनी, भारतीय प्रशासकीय सेवेत विविध पदांवर काम केलं आहे.
सासणे यांचे अनेक कथासंग्रह, कादंबऱ्या, ललित लेख संग्रह, नाटकं प्रसिद्ध आहेत. त्यांच्या
अनेक पुस्तकांना राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे पुरस्कार, तसंच इतरही मानाचे
तसंच प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले आहेत.
२०१० मध्ये वैजापूर इथं झालेलं पाचवं राज्यस्तरीय ग्रामीण मराठी
साहित्य संमेलन, वसमत इथं २०१४ मध्ये झालेलं ३५ वं मराठवाडा साहित्य संमेलन, तसंच नाशिकच्या
उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेच्या २०१६ मध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद
सासणे यांनी भुषवलं आहे. ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
एकमतानं निवड निवड झाल्याबद्दल सासणे यांनी आनंद व्यक्त केला आहे. येत्या मार्च महिन्यात
लातूर जिल्ह्यात उदगीर इथं हे संमेलन आयोजित केलं जाण्याची शक्यता आहे.
****
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मराठवाड्यातून किसान रेल्वे उपलब्ध
करून दिली जाणार असल्याचं आश्वासन, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे.
ते काल जालना इथं किसान रेल्वे तसंच नांदेड हडपसर पुणे रेल्वेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर
बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह अनेक मान्यवर
यावेळी उपस्थित होते. आसाम मधल्या जोरहट इथं पाठवलेल्या कांद्यामुळे शेतकऱ्यांना मोठा
फायदा होत असल्याचं दानवे यांनी सांगितलं. ते म्हणाले...
‘‘जालन्यामधून आसामला कांदा पाठवला. आपल्या भागामध्ये
अठराशे रुपये कांद्याचा भाव आहे. आसाम जोरहटला अठ्ठावीसशे रूपये कांद्याचा भाव आहे.
एक क्विंटलला फक्त सव्वातीनशे ते साडेतीनशे रुपये भाडे लागते, परंतू हजार रुपये क्विंटलमागे
शेतकऱ्यांचा फायदा होतो. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी आत्मनिर्भर भारतची
एक घोषणा दिलेली आहे. आत्मनिर्भर भारत,आणी आत्मनिर्भर शेतकरी व्हावा या संकल्पनेतून
ही किसान रेल्वे जालन्यातून सोडण्यात आलेली आहे.’’
एक हजार कोटी रुपये खर्चून औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गाचं
दुहेरीकरण करणार असून, या दुहेरी मार्गाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाल्याची माहिती,
दानवे यांनी दिली. जालना-खामगाव या रेल्वेमार्गासाठी अंतिम सर्वेक्षण करण्याचं काम
सुरू असून, यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचं त्यांनी यावेळी
सांगितलं. मराठवाड्यातून दररोज चारशेहून अधिक खाजगी बस पुण्याला जातात, त्यामुळे नांदेड-हडपसर
ही नवीन एक्सप्रेस सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले...
‘‘नांदेड, परभणी, जालना,
औरंगाबादहून जवळपास साडे चारशे ट्रॅव्हल्स पुण्याला जातात. ट्रॅफिकमुळे सहा ते सात
तास लागतात. परंतू यामुळे मराठवाड्यातील जनतेची फार मोठी सोय होणार आहे.’’
दरम्यान, केंद्र शासन पुरस्कृत समृध्दी योजनेअंतर्गत, सुमारे
साठ कोटी रूपये खर्चाच्या जालना शहर भूमीगत गटार योजनेच्या मलशुध्दीकरण प्रकल्प, आणि
संरक्षण भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ, केंद्रीय राज्यमंत्री दानवे, आरोग्यमंत्री राजेश
टोपे यांच्या उपस्थितीत काल करण्यात आला.
****
वेळा अमावस्येचा सण काल मराठवाड्यात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात
साजरा झाला. काल रविवार असल्यानं, शहराकडे राहणाऱ्या चाकरमान्यांनी या सणासाठी आपापल्या
गावाकडे जाणं पसंत केलं. मार्गशीर्ष महिन्यातल्या या अमावस्येला शेतात पांडव पूजा आणि
लक्ष्मी पूजा करण्याची, तसंच जेवणासाठी इतर पदार्थांसोबत भज्जी, गव्हाची खीर आणि आंबिल
करण्याची पद्धत आहे. नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबादसह सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण
भागात काल वेळ अमावस्या पारंपरिक पद्धतीनं साजरी झाली.
****
औरंगाबादच्या विकासाला शासनाचं प्राधान्य असल्याची ग्वाही, जिल्ह्याचे
पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. जिल्ह्यात कन्नड इथं उपविभागीय कार्यालयाच्या
नूतन इमारतीचं लोकार्पण केल्यानंतर ते काल बोलत होते. कन्नड तालुक्यातल्या दळणवळणाच्या
दृष्टीकोणातून महत्त्वाच्या असलेल्या कन्नड-चाळीसगाव बोगदा, तसंच इतर पर्यायासंदर्भात
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. या कामाची
मागणी पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं देसाई यांनी सांगितलं.
सिल्लोड इथं मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन तसंच कोनाशिलेचं
अनावरणही काल देसाई यांच्या हस्ते झालं.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात नियोजित सापळी धरण रद्द
करुन कयाधू नदीवर बंधारे बांधण्याच्या मागणीसाठी, जिल्हा सिंचन संघर्ष समितीच्या वतीनं
काल तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्याचं पाणी पळवल्यास तीव्र आंदोलन
करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांसोबतच शेतकरी ट्रॅक्टर
घेऊन मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा दुसरा कसोटी क्रिकेट
सामना आजपासून जोहान्सबर्गमध्ये सुरू होणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला
पहिला सामना जिंकून भारतानं एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातल्या लोअर दुधना प्रकल्पातून
दोन्ही कालव्याद्वारे रब्बी हंगामातील पिकांसाठी १४ दिवस पाणी सोडण्यात आलं. पहिल्या
आवर्तनासाठी पाच दशलक्ष घनमीटर पाणी लागलं. कालवा लाभक्षेत्रातल्या चार तालुक्यातल्या
शेतकर्यांना या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग झाला.
****
परभणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतले प्रयोगशील शिक्षक
युवराज माने यांनी लिहिलेल्या, 'गुरुजी, तू मला आवडला', या पुस्तकाचं काल परभणी इथं
प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते प्रकाशन झालं. कोविड पार्श्वभूमीवर छोटेखानी
समारंभात झालेल्या या प्रकाशनावेळी भालेराव यांनी या पुस्तकाचं कौतुक केलं. शिक्षक
आणि विद्यार्थी यांच्यात बहरत गेलेल्या भावविश्वाचं सुंदर चित्रण या युवराज माने यांनी
या पुस्तकातून चितारलं आहे.
****
No comments:
Post a Comment