Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04
January 2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०४ जानेवारी २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत
देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं
चिंता वाढली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला
सुरुवात झाली आहे. आपल्या सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी
अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा.
मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात,
चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि
मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६
१२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· देशात पहिल्याच
दिवशी १५ ते १८ वयोगटातल्या ३८ लाख ५७ हजार मुलांना लसीची पहिली मात्रा, राज्यातही
पावणे दोन लाख मुलांचं लसीकरण
· वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई
तसंच ठाणे महानगरपालिकेचा दहावी - बारावी वगळता, शाळेचे सर्व वर्ग बंद करण्याचा निर्णय
· राज्यात ओमायक्रॉनची बाधा झालेल्या नव्या ६८ रुग्णांची नोंद
· राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे १२ हजार १६० रुग्ण,
मराठवाड्यात दोन जणांचा मृत्यू तर ९७ बाधित
· केंद्रीय कर्मचाऱ्यांची बायोमेट्रीक हजेरी बंद, तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांवर
· राज्य लोकसेवा आयोगाची आता २३ जानेवारीला पूर्व परीक्षा होणार
· राज्यातील सर्वच शहरांमध्ये छोट्या घरांना मालमत्ता करातून सूट
देण्याचा राज्य सरकारचा विचार- उद्योगमंत्री सुभाष देसाई
आणि
· दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव २०२ धावांवर
संपुष्टात, आफ्रिकेच्या एक बाद ३५ धावा
****
देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातल्या किशोरवयीन
मुलांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाला कालपासून सुरुवात झाली. काल पहिल्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत देशभरात या वयोगटातल्या ३८
लाख ५७ हजार ४२१ मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली.
महाराष्ट्रातही सोळाशेहून अधिक लसीकरण केंद्रांवर १५
ते १८ वयोगटातल्या, एक लाख ७५ हजार
६७५ मुलांना लसीची पहिली मात्रा दिली असल्याचं, राज्य लसीकरण
अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितलं.
राज्यात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या
नियोजनाचा, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल आढावा घेतला. विद्यार्थ्यांचं
आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं सांगून, कोविड संदर्भातील मार्गदर्शक
सूचनांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश गायकवाड यांनी दिले. राज्यात इयत्ता नववी ते
बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या, ६५ लाख २३ हजार ९११ इतकी असून, सर्व विद्यार्थ्यांच्या
लसीकरणाचं नियोजन करण्यात आल्याची माहिती, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी यावेळी
दिली.
औरंगाबाद इथं
पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. औरंगाबाद शहरातल्या एक हजार ६८ विद्यार्थ्यांना
काल लसीची पहिली मात्रा मिळाली. लातूर जिल्ह्यात सहा हजार ९३९, हिंगोली जिल्ह्यात चार
हजार ४२५, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ८५२ मुलांना लस देण्यात आली.
जालना इथं
पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या लसीकरण
मोहिमेचा शुभारंभ झाला. मुलांमध्ये लस घेण्याबाबत उत्साह दिसून आल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
बीड इथंही सकाळपासून विद्यार्थ्यांनी लसीकरण केंद्रांवर
रांगा लावल्याचं दिसून आलं. परभणी तसंच नांदेड जिल्ह्यातही १५ ते १८ वर्ष वयोगटाच्या
लसीकरणाला कालपासून उत्साहात प्रारंभ झाल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
नाशिक इथं केंद्रीय आरोग्य
राज्य मंत्री डॉक्टर
भारती पवार यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ झाला. केंद्र
शासनानं सुरू केलेल्या या मोहिमेत किशोरवयीन मुलांनी
जास्तीतजास्त लसीकरण करून घ्यावं असं
आवाहन त्यांनी केलं.
****
देशभरातल्या १२ ते १५ या वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाची मागणी
केंद्र सरकारकडे केल्याची माहिती, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते काल
जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. राज्यात आरोग्य कर्मचारी तसंच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ
नागरिकांच्या बुस्टर डोससाठी आवश्यक असलेल्या कोविड लस मात्रांची मागणी केंद्र सरकारकडे
नोंदवल्याचं टोपे यांनी सांगितलं. ते म्हणाले...
पंधरा, अठराबद्दल आभार मानले.
त्याचबरोबर बारा ते पंधरा सुद्धा कराचं असा आग्रह त्यांना त्याठिकाणी केलेला आहे. आणी
आपल्याला आता जे काही हेल्थ वर्कर त्याच बरोबर त्यांचे इसेन्शिअल सर्व्हिसेसचे वर्कर
आणि सिक्सटी प्लस कोमॉर्बीड यांच्यासाठी जे आपल्याला लस पाहिजे. त्यासाठी कोविशील्ड
चाळीस लाख अजून जास्तीची पाहिजे आणि कोवॅक्सीन सुद्धा पन्नास लाख पाहिजे. यापद्धतीने
आपण लसीकरणाच्या संदर्भात ही मागणी आम्ही केलेली आहे.
दरम्यान, टोपे यांच्या उपस्थितीत काल जालना तालुक्यात विरेगाव
इथं, 'ॲनिमिया मुक्त गाव राज्यव्यापी मोहिमे'चा शुभारंभ करण्यात आला. आपल्या कुटुंबासोबत
आपलं संपूर्ण गावच ॲनिमियामुक्त करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, यासाठी लोकप्रतिनिधींनी
पुढाकार घेऊन ॲनिमियामुक्त गाव मोहिमेची प्रभावीपणे जनजागृती करावी, असं आवाहन त्यांनी
केलं.
****
वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई
तसंच ठाणे महानगर पालिकेनं दहावी तसंच बारावी वगळता, पहिली ते नववीच्या शाळा आणि अकरावीचे
वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद राहणार असून, या
दरम्यान ऑनलाईन पद्धतीनं अध्यापन सुरू ठेवलं जाणार असल्याचं, बृहन्मुंबई महानगरपालिकेनं
याबाबत जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या पात्र विद्यार्थ्यांना
लसीकरणासाठी शाळेत बोलावलं जाणार असल्याचं, या पत्रकात म्हटलं आहे. मुंबईत कोविड रुग्णांच्या
संख्येत गेल्या काही दिवसांपासून लक्षणीय वाढ दिसून येत आहे.
****
राज्यात काल
ओमायक्रॉनची बाधा झालेल्या नव्या ६८ रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांमध्ये मुंबईतले ४०, पुणे जिल्ह्यातले १७, नागपूर चार, पनवेल
तीन, तर कोल्हापूर, नवी मुंबई, रायगड आणि सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा
समावेश आहे. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या ५७८ झाली असून, त्यापैकी २५९ रुग्ण संसर्गमुक्त झाले
आहेत.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १२ हजार १६० रुग्ण
आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६७ लाख १२ हजार २८ झाली आहे. काल
११ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या
संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार
५५३ झाली असून,
मृत्यूदर दोन पूर्णांक १० शतांश टक्क्यांवर
कायम आहे. काल एक हजार ७४८ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६५ लाख १४ हजार ३५८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून,
कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ०५ शतांश टक्के
झाला आहे. राज्यात सध्या ५२ हजार ४२२ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ९७ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ३७ नवे रुग्ण आढळले. उस्मानाबाद १८, जालना १४, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी
दहा, परभणी सहा, तर हिंगोली जिल्ह्यात दोन रुग्णांची नोंद झाली. बीड जिल्ह्यात काल
एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
केंद्रीय कर्मचाऱ्यांची बायोमेट्रीक हजेरी ताबडतोब थांबवण्याचे निर्देश कार्मिक
विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी दिले आहेत. कोविडचा वाढता
प्रादुर्भाव लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेच्या हेतूने हा निर्णय
घेतल्याचं त्यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे. आजपासून ३१ जानेवारीपर्यंत बायोमेट्रिक पद्धतीनं हजेरी
नोंदवावी लागणार नाही. अव्वर सचिव आणि
त्यांच्या कनिष्ठांना एक दिवसाआड कार्यालयात येण्याचे आणि उर्वरित दिवशी घरुन काम
करण्याची मुभा केंद्र सरकारनं दिली आहे. या कर्मचाऱ्यांची दैनंदिन उपस्थिती
५० टक्क्यांवर आणण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्ती आणि गर्भवती
महिलांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात आली आहे.
****
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं आपल्या परीक्षांच्या नव्या
तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षा आता २३ जानेवारीला होणार आहे. दुय्यम
सेवा मुख्य परीक्षेचा पहिला संयुक्त पेपर २९ जानेवारीला, तर दुसऱ्या क्रमांकाचा पेपर
तसंच पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा ३० जानेवारीला होणार आहे. कोविड काळात वयोमर्यादा
ओलांडलेल्या उमेदवारांना परीक्षा देण्याची संधी मिळावी, म्हणून या परीक्षा पुढे ढकलण्यात
आल्या होत्या.
****
देशातल्या पहिल्या महिला शिक्षक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी मुंबईत आपल्या निवासस्थानी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केलं.
औरंगाबादसह बीड, लातूर, जालना, परभणी, हिंगोली, तसंच नांदेड
जिल्ह्यात सावित्रीबाईंना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं.
शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वतीने पालकमंत्री सुभाष देसाई
यांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
****
राज्यात सर्वच शहरांमध्ये छोट्या घरांना मालमत्ता करातून सूट
देण्याचा विचार सरकार करत असल्याचं, उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री
सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते. मुंबईत
५०० चौरस फूट क्षेत्रफळापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. यासंदर्भात
विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात देसाई म्हणाले...
हळूहळू सगळ्या राज्याला ही
सवलत मिळाली पाहिजे. ही सुरुवात झालेली आहे. मुंबईने दिशा दाखवली आहे. आता त्यासाठी
इतर शहरांमध्ये सुद्धा ही सवलत कशी मिळेल याच्यावर नक्कीच आम्ही सर्व मिळून विचार करु.
राज्यात टाळेबंदी लागू नये, अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. मात्र
त्यासाठी प्रत्येकाने खबरदारीने वागायला हवं, असं देसाई यांनी नमूद केलं. ते म्हणाले...
सर्वांची इच्छा आहे की, लॉकडाऊन
करायची पाळी येऊ नये. पण लॉकडाऊन येऊ नये असंच नुसतं वाटण पुरेस नाही तर त्यासाठी आपल्याला
खबरदारी सुद्धा बाळगली पाहिजे.
औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठकही देसाई यांच्या अध्यक्षतेखाली
काल झाली. या बैठकीत त्यांनी कोविड विषयक उपाययोजनांचा, तसंच ग्रामीण भागात राबवण्यात
येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट
सामन्यात भारताचा पहिला डाव काल २०२ धावांवर संपुष्टात आला. काल सकाळी नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी
करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार के एल राहुलच्या ५० आणि
रविचंद्रन अश्विनच्या ४६ धावा वगळता, अन्य एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही.
सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा दक्षिण आफ्रिका
संघाच्या एक बाद ३५ धावा झाल्या. दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या डावात १६७ धावांनी पिछाडीवर
आहे.
****
औरंगाबाद इथल्या स्वामी रामानंद
तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा यंदाचा वि. वा. देसाई स्मृती पुरस्कार, जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या लिखित पिंप्री इथल्या संत
तुकाराम गुरुकुल संस्थेला प्रदान करण्यात आला. स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस.बी वराडे यांच्या हस्ते, संस्थेच्या अध्यक्ष
विजया सोळुंके यांना हा पुरस्कार देण्यात आला.
****
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथंल्या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेवर माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या गटानं पुन्हा एकदा एकहाती सत्ता राखली आहे. दीनदयाळ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले. १९ संचालक
असलेल्या या बँकेच्या १५ जागांकरता ही निवडणूक झाली. पंकजा
मुंडे, राजाराम धाट, शरयू हेबाळकर यांच्यासह चार संचालकांची यापूर्वीच
बिनविरोध निवड झाली होती.
****
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर नगर पंचायतीच्या चार जागांसाठी
५८ उमेदवारांनी, तर नायगाव नगर पंचायतीच्या तीन जागांसाठी एकूण ३५ अर्ज दाखल झाले आहेत. दोन्ही
नगर पंचायती मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. आज या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी तुळजापूर या शक्ती
पीठापासून सुरुवात करणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी
सांगितलं. बालिका दिनी तुळजापूर इथं सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या
कार्यक्रमात, त्यांनी ही माहिती दिली. १५ वर्षांवरील मुलींनी कोविड लसीकरण करून घ्यावं,
असं आवाहन त्यांनी केलं.
****
No comments:
Post a Comment