▼

Sunday, 20 February 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २० फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 February 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक करण्याची केंद्र सरकारला विनंती- अजित पवार

·      युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज याची जयंती काल देशभर सर्वत्र उत्साहात साजरी

·      कोरोना विषाणू प्रादुर्भावावर नियंत्रण राहिल्यास मार्चनंतर संपूर्ण राज्य १०० टक्के निर्बंधमुक्त करण्याचे कोविड कृती दलाचे संकेत

·      राज्यात कोविड संसर्गाचे एक हजार ६३५ नवे रुग्ण, मराठवाड्यात तीन जणांचा मृत्यू तर ९६ बाधित

·      रासायनिक खतांच्या वापराला उत्सुक नसलेल्या शेतकऱ्यांसाठी नॅनो युरिया सर्वोत्तम पर्याय - केंद्रीय खतं मंत्री मनसुख मांडविया

·      घटक पक्षांच्या विरोधात एकमेकांनी न बोलण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय

आणि

·      भारत - वेस्ट इंडिज यांच्यात आज अखेरचा टी ट्वेंटी क्रिकेट सामना

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक करण्याची विनंती राज्य सरकारनं केली असल्याचं उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी सांगितलं. पुणे जिल्हातल्या ओझर इथं शिवजन्म सोहळ्यानंतर मराठा सेवा संघानं आयोजित केलेल्या अभिवादन सभेत ते बोलंत होते. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. घटनात्मक तरतूदींमुळे आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा वाढवता येत नसल्यानं यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं पवार म्हणाले.

****

रयतेचा राजा, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज याची जयंती काल देशभर सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. शिव जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी देशबांधवांना शुभेच्छा देऊन शिवरायांना अभिवादन केलं. 

शिवरायांनी आपल्या अप्रतिम शौर्यानं आणि युद्ध कौशल्यानं भारताची राष्ट्र भावना चेतवली असून महाराजांचा राष्ट्रवाद आजही अनुकरणीय आहे असं उपराष्ट्रपती  एम व्यंकय्या नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

शिवाजी महाराजांचे  सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे. सत्य आणि न्याय या मूल्यांशी शिवरायांनी कधीही  तडजोड केली नाही. त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘शिवजयंती उत्सव’ कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी पार्कवरच्या शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. 

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वर्षा शासकीय निवासस्थानी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. महाराजांची  दूरदृष्टी, आदर्श राज्यकारभार आणि रणनीती प्रेरणादायी आहे. शिवछत्रपतींची शिकवण डोळ्यासमोर ठेऊन आमचे सरकार काम करीत आहे आणि पुढे देखील करत राहील असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

शिवजयंतीचं औचित्य साधून किल्ले सिंधुदुर्गवर काल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी किल्ल्यावरच्या मावळ्यांच्या वारसांना सात-बाराचं  वाटप जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

किल्ले शिवनेरीवर झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी शासनामार्फत राज्यातल्या गड- किल्ल्यांच्या मूळ रचनेला धक्का न लावता विकास करण्यात येत असल्याचं, अजित पवार यांनी सांगितलं. किल्ले शिवनेरीच्या संवर्धनासाठी २३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यातून किल्ल्याच्या परिसरात विकास कामे सुरू आहेत. किल्ले रायगड संवर्धनासाठीही मोठ्या प्रमाणात निधी दिला असून तिथंही अनेक विकास कामं सुरू असल्याचं, पवार यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद इथं क्रांतीचौकातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या २०० पुतळ्यांवर हेलिकॉप्टर द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. शिवाजी महाराजांचं युद्धकौशल्य, गुणग्राहकता, कामकाजातील समन्वय, शुद्ध हेतूने आणि आत्मीयतेने रयतेसाठी केलेले कार्य प्रत्येकाच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी असल्याचं, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी म्हटलं आहे.

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं.

महावितरणच्या परिमंडल कार्यालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे कर्मचाऱ्यांच्या पाल्यांची वेशभूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यान, पोवाडा तसंच लष्करात सेवा बजावलेल्या सुरक्षारक्षकांचा सत्कार करण्यात आला.

****

परभणी शहरात शिवजयंतीनिमित्तानं रांगोळी कलावंतांनी आपल्या कलेतून शिवरायांना अभिवादन केलं. शहरासह जिल्हाभरात अनेक ठिकाणी अन्नदान करण्यात आलं. जिल्ह्यात मानवत इथं रक्तदान शिबीरही घेण्यात आलं.

अखिल भारतीय वारकरी मंडळाने काढलेली मिरवणूक लक्षवेधी ठरली. या मिरवणूकीतील हजारों शिवभक्तांचा सहभाग, अभूतपूर्व जल्लोष अन् घोषणांनी संपूर्ण शहर शिवमय झालं होतं.

परभणी तालुक्यातील सावंगी खुर्द इथले दिव्यांग दाम्पत्य सुमेध इंगोले आणि प्रियंका इंगोले यांना काल शिवजयंतीदिनी उदरनिर्वाहाचं साधनं म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी स्वखर्चातून शिलाई मशीन भेट दिलं.

****

बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

नांदेड इथं जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

जालना शहरात शिवजयंतीनिमित्त  आमदार कैलास गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह विविध संघटना आणि सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

लातूर, उस्मानाबाद, हिंगोली,  पुणे, नाशिक, चंद्रपूर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, बुलडाणा, नवी मुंबई आणि  गडचिरोली जिल्ह्यासह राज्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

****

उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यात आणि पंजाब विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. उत्तर प्रदेशातल्या सोळा जिल्ह्यातल्या ५९ मतदारसंघात हे मतदान होणार आहे. तर पंजाब विधानसभेच्या ११७ जागांसाठी हे मतदान होईल.

****

कोरोना विषाणू प्रादुर्भावावर नियंत्रण असंच राहिलं तर, मुंबईसह संपूर्ण राज्य मार्चनंतर १०० टक्के निर्बंधमुक्त करण्याचे संकेत राज्याच्या कोविड कृती दलाचे डॉ. संजय ओक यांनी दिले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ओमायक्रोन सर्वाधिक वेगाने पसरला, मात्र या व्हेरियंटच्या कमी घातकतेमुळे महिनाभरातच ही लाट नियंत्रणात आली. त्यामुळे राज्यात १ फेब्रुवारीपासून काही गोष्टींवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. गेल्या काही आठवड्यात मुंबईसह राज्यात रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी अखेरपर्यंत राज्य निर्बंधमुक्त करण्याचे संकेत प्रशासनाने दिले होते. मात्र, ब्रिटनमध्ये डेल्टा क्रोनसारखा नवा व्हेरियंट आढळला आहे. त्या पार्श्वभूमीवर कृती दलाने सावध भूमिका घेत, संपूर्ण निर्बंधमुक्तीसाठी मार्चअखेर किंवा एप्रिल महिन्याच्या प्रारंभापर्यंत वाट पाहावी लागेल, असं म्हटलं आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ६३५ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ५६ हजार ९९४ झाली आहे. काल २९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४३ हजार ५७६ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल चार हजार ३९४ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७६ लाख ९१ हजार ६४ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ८९ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १८ हजार ३६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ९६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. तर ३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद नांदेड आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल ४१ रुग्ण आढळले. लातूर १७, नांदेड ११, उस्मानाबाद १०, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी सहा, परभणी तीन, तर जालना जिल्ह्यात २ नव्या रुग्णांची नोंद झाली.

****

रासायनिक खतांच्या वापराला फारसे उत्सुक नसलेल्या शेतकऱ्यांसाठी नॅनो युरिया हा सर्वोत्तम पर्याय असल्याचं, केंद्रीय खतं आणि रसायन मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे. मुंबईत चेंबूर इथं नॅनो युरिया उत्पादन केंद्राची काल मांडविया यांच्याहस्ते पायाभरणी करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.या प्रकल्पाची उत्पादन क्षमता प्रतिदिन दीड लाख बाटल्या नॅनो युरिया एवढी आहे, पुढच्या वर्षभरात या केंद्रातून नॅनो युरियाचं उत्पादन सुरू होईल, अशी आशा मांडवीय यांनी वर्तवली.

****

महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या विरोधात कोणीही बोलायचं नाही, असा निर्णय  आपापसात झाला असल्याचं, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडीचा निर्णय घेण्यासाठी काल झालेल्या  बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पक्षविरहीत वातावरण संपूर्ण राज्यात निर्माण व्हायला हवे, अशी सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

****

भारत आणि वेस्ट इंडिज टी ट्वेंटी क्रिकेट तीन सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना आज कोलकाता इथं खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.

****

श्रीलंकेविरुद्ध आगामी दोन कसोटी तसंच तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे.

रोहीत शर्माच्या नेतृत्वाखाली, कसोटी तसंच टी ट्वेंटी संघात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. कसोटी संघात प्रियांक पांचाल, मयांक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, कोणा श्रीकर भारत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे.

 

टी ट्वेंटी संघात ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन, वेंकटेश अय्यर, दीपक चहर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, यजुवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह आणि अवेश खान यांचा समावेश आहे.

****

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. दहा जागांसाठी जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे. पाच जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. या मतदानाची उद्या मतमोजणी केली जाणार आहे.

****

 

No comments:

Post a Comment